राज्याचे पद देत भाजपने रोखला जालिंदर कामठेंचा राष्ट्रवादी प्रवेश 

राष्ट्रवादीच्या वरीष्ठ पातळीवरून हालचाली होण्याआधीच भाजपच्या वरीष्ठ पातळीवरून वेगवान हालचाली झाल्या.
Jalindar Kamthe appointed as the President of BJP West Maharashtra
Jalindar Kamthe appointed as the President of BJP West Maharashtra

सोमेश्वरनगर (जि. पुणे) : राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून भाजपवासी झालेले जालिंदर कामठे यांच्या घरवापसीची चर्चा सुरू झालेली असतानाच भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीने त्यांची आता थेट राज्यपातळीवर पाठवणी केली आहे. कामठे यांची आज (ता. 22 जानेवारी) भाजपच्या पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कामठे यांना पुण्यात नियुक्तीपत्र दिले. बढती मिळाल्यामुळे कामठे यांची राष्ट्रवादी प्रवेशासंदर्भातील चर्चाही थांबण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. 

जालिंदर कामठे हे कोंढवा बुद्रूक ग्रामपंचायतीचे दहा वर्षे सरपंच होते. कॉंग्रेस विद्यार्थी संघटना, विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष होते. पुणे जिल्हा कॉंग्रेसचे ते 1995-1999 पर्यंत अध्यक्ष होते. त्यावेळी कामठे यांच्या बंगल्यावरच 1999 मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना झाली. राष्ट्रवादीकडून कामठे हेच पुणे जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष बनले. पुणे जिल्हा राष्ट्रवादीचे 2014 ते 2018 कालावधीत अध्यक्ष बनले. तर 2018 पासून राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस बनले. 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीतून भाजपात आऊटगोईंग सुरू झाले होते. अशातच पुरंदर तालुका जागावाटपात राष्ट्रवादीकडून कॉंग्रेसकडे गेला. त्याच वेळी "जिल्ह्यातील चांडाळचौकडींना कंटाळून भाजपत जात आहे' असे जाहीर करत त्यांनी भाजपत प्रवेश केला. परंतु अनपेक्षित राजकीय घडामोडींनंतर भाजपला वगळून महाआघाडी सरकार अस्तित्वात आले. कामठे भाजपत फारसे सक्रीयही नव्हते. जिल्ह्यात, राज्यात संघटनात्मक काम केलेले असतानाही भाजपकडून केवळ पुणे जिल्ह्यातील कोअर कमिटीत त्यांची वर्णी लावण्यात आली होती. 

दरम्यान, नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये पुरंदरमध्ये राष्ट्रवादीला अनेक ठिकाणी फटका बसला. नव्या सत्तासमीकरणांवर कोरडे ओढू शकणारा कामठे यांच्यासारखा नेता राष्ट्रवादीत हवा, अशी चर्चा समाजमाध्यमांत झाली. राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षांनीही कामठेंच्या घरवापसीचा दुजोरा दिला होता. त्यामुळे कामठे हे पुन्हा राष्ट्रवादीत येतील, असे वातावरण तयार झाले होते. असे असतानाच राष्ट्रवादीच्या वरीष्ठ पातळीवरून हालचाली होण्याआधीच भाजपच्या वरीष्ठ पातळीवरून वेगवान हालचाली झाल्याचे समजते. 

"सरकारनामा'मध्ये बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर खळबळ उडताच दुसऱ्याच दिवशी भाजपकडून कामठे यांची राज्यपातळीवर नियुक्ती करण्यात आली. पुणे येथे आज चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कामठे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. या प्रसंगी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, अतुल देशमुख, प्रवीण काळभोर आदी उपस्थित होते. या नियुक्तीनंतर राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा तूर्तास थांबेल अशी चिन्हे आहेत. 

कामठे यांनी याबाबत "सरकारनामा'शी बोलताना सांगितले की, "मी राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशा चर्चा चालू होत्या. मला तसे फोनही येत होते. परंतु मी आहे तिथे व्यवस्थित आहे, हे स्पष्ट केलेच होते. उलट भाजपच्या वरीष्ठ नेत्यांनी मला राज्यपातळीवर काम करण्याची संधी दिली आहे. मी पक्षाचे, पंतप्रधानांचे विचार तळागळापर्यंत पोचविण्यासाठी कार्यरत राहणार आहे,' असे स्पष्ट केले. 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com