मला ऐकावेच लागेल, नाहीतर माझाच शहाणपणा निघायचा : अजित पवार  - I can't say that. I have to listen at home: Ajit Pawar | Politics Marathi News - Sarkarnama

मला ऐकावेच लागेल, नाहीतर माझाच शहाणपणा निघायचा : अजित पवार 

मिलिंद संगई 
सोमवार, 1 फेब्रुवारी 2021

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषणात माहिती देत बारामतीतील विवाहित पुरुषांना चिमटे काढले.

बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एक भाषणशैली आहे. ते रोखठोक भाषणासाठी जसे ओळखले जातात, तसे कार्यकर्त्यांना चिमटे घेत भाषण हलके फुलके ठेवण्यासाठीही परिचित आहेत. बारामतीतील एका कार्यक्रमात बोलताना पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे पाहत "आपणही सोसतो...,' असे मिश्‍किलपणे सांगितले आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. 

बारामती शहरात विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. त्या कार्यक्रमात अजित पवारांनी वरील भाष्य केले. बारामतीकरांना लवकरच भूमिगत पाइपमधून स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठा होणार आहे, त्यामुळे गॅस सिलिंडर आणण्याच्या कटकटीपासून नागरिकांची मुक्तता होणार आहे. 

याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषणात माहिती देत बारामतीतील विवाहित पुरुषांना चिमटे काढले. ते म्हणाले, आता पाइपमधून स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठ्याची सोय झाल्यानंतर पत्नीने सिलिंडर आणायला सांगितले, तरी तिला "ए, शहाणपणा करू नको, गॅस घरी येणार आहे. नुसती तोटी उघडली की गॅस सुरू,' असे उत्तर तुम्ही देऊ शकता. काही क्षण थांबून व्यासपीठावर बसलेल्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे पाहत अजित पवार मिश्‍किलपणे म्हणाले, "मला मात्र तसे म्हणता येणार नाही. मला ऐकावेच लागेल, नाहीतर माझाच शहाणपणा निघायचा,'' अशी टिपण्णी पवार यांनी करताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. 

पत्नीचा धाकच असा असतो की उपमुख्यमंत्री असले तरी त्यांनाही पत्नीचा आदरयुक्त धाक असतो, हेच पवार यांनी भाषणातून दाखवून दिल्याची चर्चा कार्यक्रमानंतर रंगली होती. 

त्याच्या तीन पिढ्या आमच्यासोबत असल्या तरी गय करणार नाही 

बारामती शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहायला हवी, सुरक्षेचे वातावरण कायम असायला हवे, शहरात गुंडगिरी दादागिरी मी सहन करणार नाही, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिस अधिकाऱ्यांना सूचना केल्या. 

सावकारीच्या मुद्यावर बोलताना अजित पवार यांनी "आपण सगळे मिळून सावकारांची वाट लावून टाकू,' अशा रोखठोक भाषेत आपल्या कामाची दिशा स्पष्ट केली. ते म्हणाले, ""बारामतीत माझी भगिनी सुरक्षितच राहायला हवी, त्या बाबत कसलीच तडजोड मी मान्य करणार नाही. कोणीही कायद्याचं उल्लंघन करीत असेल आणि त्याच्या तीन पिढ्या आमच्यासोबत काम करणाऱ्या असल्या तरी त्याची गय करणार नाही.'' 

बेकायदा शस्त्रांबाबत मी मध्यंतरी वाचले. बारामतीत वाळूमाफिया असो किंवा अवैध शस्त्रे बाळगणारे असोत अशा लोकांवर मोकाअंतर्गत कारवाई करण्याच्या पोलिसांना मी सूचना दिल्या आहेत, असेही पवार यांनी या वेळी नमूद केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख