खुद्द गृहमंत्र्यांनी भरवला त्या पोलिस अधिकाऱ्याला वाढदिवसाचा केक! (व्हिडिओ) - Home minister Celebrated police officers Birthday on Pune Mumbai Expressway | Politics Marathi News - Sarkarnama

खुद्द गृहमंत्र्यांनी भरवला त्या पोलिस अधिकाऱ्याला वाढदिवसाचा केक! (व्हिडिओ)

पांडुरंग सरोदे
सोमवार, 8 जून 2020

मुंबई महामार्गावर कर्तव्यावर असलेल्या एका पोलिस उपनिरीक्षकाचा वाढदिवस असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना पुण्याहून मुंबईला जात असताना समजले.  हे कळल्यावर ते काही काळ रस्त्यावर थांबले. त्या उपनिरीक्षकाला वाढदिवसाच्या शुभेछया दिल्या.

पुणे : सध्या कोरोनामुळे पोलिस अहोरात्र बंदोबस्तावर आहेत. मग त्यांना आपला वाढदिवस साजरा करायला कुठं वेळ मिळणार. पण पुण्याच्या एका पोलिस अधिकाऱ्याचे भाग्य इतकं की त्याचा वाढदिवस चक्क गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत साजरा झाला. खुद्द गृहमंत्र्यांच्या हस्ते वाढदिवसाचा केक खाण्याचा योग त्याच्या नशिबात होता. 

पुणे- मुंबई महामार्गावर कर्तव्यावर असलेल्या एका पोलिस उपनिरीक्षकाचा वाढदिवस असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना पुण्याहून मुंबईला जात असताना समजले.  हे कळल्यावर ते काही काळ रस्त्यावर थांबले. त्या उपनिरीक्षकाला वाढदिवसाच्या शुभेछया दिल्या. एवढंच नव्हे तर  त्याहीपुढे जाऊन त्यांनी त्या उपनिरिक्षकाला आपल्या हाताने केकही भरवला. 

खुद्द गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत आपला वाढदिवस साजरा होण्याचे अनोखे 'गिफ्ट' त्या पोलिस अधिकाऱ्याला मिळाले. त्यामुळे साहजिकच तो भारावून गेला होता. गृहमंत्री अनिल देशमुख हे कायमच सर्वसामान्य नागरिकांमध्ये, पोलिसांमध्ये मिसळतात. राज्यात कोरोनामुळे लाॅकडाऊन असतानाही देशमुख यांनी पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे २४ जिल्ह्यांचा दौरा करुन तेथील पोलिसांचे मनोबल वाढवले. आपल्या दौऱ्यात त्यांनी बंदोबस्त ड्युटीवर असलेले पोलिस कर्मचारी अधिकाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थापही मारली. 

देशमुख हे काल (रविवारी) देशमुख पुणे दौऱ्यावर होते. रात्रीच्या मुक्कामानंतर आज सकाळी ते मुंबईच्या दिशेने निघाले. आपल्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे त्यांनी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर किवळे फाठा हे बंदोबस्तावर असलेले पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी तिथे असणारे पोलिस उपनिरिक्षक श्रीकांत जाधव यांचा वाढदिवस असल्याचे देशमुख यांना कुणीतरी सांगितले. देशमुख यांनी लगेचच केक मागवला. 

जाधव यांनी मग देशमुख यांच्या उपस्थितीत पोलिसांच्या गाडीच्या बाॅनेटवर ठेवलेला केक कापला व आपला वाढदिवस साजरा केला. देशमुख यांनी पुढे येत केकचा तुकडा कापून जाधव यांना भरवला व त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व नंतरच ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख