पवारांनी शिंदेंना दिले रु. 20 हजार, उरले 4 हजार...नंतर काय झाले? 

आमच्यात ताटातूट करण्याचा प्रयत्न अनेकांनी केला.
Former Union Home Minister Sushilkumar Shinde shared his memories of Sharad Pawar
Former Union Home Minister Sushilkumar Shinde shared his memories of Sharad Pawar

सोलापूर : अनुसूचित जातीसाठी त्यावेळी आरक्षित असलेल्या करमाळा विधानसभा मतदार संघातील निवडणूक लढण्यासाठी शरद पवार यांनी मला वीस हजार रुपये दिल्याची कबुली सुशीलकुमार शिंदे यांनी या कार्यक्रमात दिली.

निवडणुकीचा खर्च जाऊन त्या वेळी चार हजार रुपये शिल्लक राहिले. ही रक्कम परत करण्यासाठी मी शरदरावांकडे गेलो, त्यांनी ही रक्कम कॉंग्रेसचे तत्कालीन नेते नामदेवराव जगताप यांना देण्यास सांगितले. राजकारणात मी जे काय आहे, ते फक्त शरद पवारांमुळेच आहे, अशी स्पष्टोक्ती सुशीलकुमार शिंदे यांनी आज (ता. 13 फेब्रुवारी) पुन्हा एकदा दिली. 

सोलापूर जिल्ह्यातील नान्नज येथील दत्तात्रेय काळे यांनी विकसित केलेल्या किंगबेरी या नवीन द्राक्ष वाणाचा लोकार्पण सोहळा आज (ता. 13 फेब्रुवारी) ज्येष्ठ नेते शरद पवार व कॉंग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्यावेळी शिंदे यांनी ही आठवण सांगितली. 

शरद पवारांविषयी बोलताना शिंदे आज चांगलेच खुलले होते. ते म्हणाले की, माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला एवढे मोठे करण्याचा हा अद्‌भूत चमत्कार शरदरावांमुळे शक्‍य झाला. शरदरावांचे माझ्यावर राजकीय प्रेम असो वा नसो, आमच्यात अद्यापही मैत्री आहे. आमच्यात ताटातूट करण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. ताटातूट करण्याचा प्रयत्न करणारे आमच्यासोबत मांडीला मांडी लावून बसणारे व जवळचेच आहेत. शरदरावांनी अशा व्यक्तींना कधीही थारा दिला नाही. यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराचा वारसा घेऊन शरदराव काम करत असल्याने त्यांनी अशा गोष्टींना थारा दिला नसल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. 

शरदराव आणि माझ्यात कसलेही अंतर नाही. शरदरावांनी मला आताच द्राक्ष भरविल्याचे तुम्हीही पाहिले आहे. त्यावरून तुमच्या लक्षात आलेच असेल असा दाखलाही शिंदे यांनी त्यांच्या भाषणातून या वेळी दिला. 

पवार यांच्याविषयीचा आणखी एक किस्सा शिंदेंनी कार्यक्रमात सांगितला. "आम्ही 1978 मध्ये सर्वजण कॉंग्रेस पक्षात एकत्र होतो. त्यावेळी कॉंग्रेसमध्ये फाटाफूट झालेली नव्हती. सोलापुरातील कारंबा गावाजवळ शरद पवारांनी माझ्यासाठी पाच एकर शेती बघितली. शेतीकडे लक्ष देण्याची सूचनाही त्यांनी मला केली. त्यावेळी मी नकार दिला होता.

तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्या सरकारमध्ये मला मंत्रिपदासाठी डावलण्यात आले. मंत्रिपदाची संधी हुकल्याने मी शेतीकडे लक्ष द्यायचा निर्णय घेतला आणि बारा एकरापासून शेतीला सुरुवात केली. आता ती 34 एकरांपर्यंत वाढत गेली आहे. माझ्या शेतीमालाला शरदरावांमुळे इतरांपेक्षा अधिक दर मिळत गेला. माझी शेती बघण्यासाठी पवार बलराम जाखड यांना घेऊन आले होते. शरदरावांनी मला शेतीचे वेड लावले,' अशा शब्दांत शिंदे यांनी आठवणींना उजाळा दिला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com