एखादा भामटा निघाला म्हणून सगळेच भामटे नसतात : राजू शेट्टींची सदाभाऊ खोतांवर टीका

आता मी एकटा कुठे कुठे पळणार.
Former MP Raju Shetty criticizes MLA Sadabhau Khot
Former MP Raju Shetty criticizes MLA Sadabhau Khot

मंगळवेढा  (जि. सोलापूर) : ‘‘शेतकऱ्यावरील अन्यायाविरोधात हे पक्षीय उमेदवार रस्त्यावर उतरले नाहीत, तर पहिल्यांदा रस्त्यावर उतरण्याचे काम स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केले आहे. आता मी एकटा कुठे कुठे पळणार, यासाठी शेतकऱ्यांची फौज तयार केल्याशिवाय पर्याय नाही.

शिरोळच्या जनतेने माझ्यावर विश्वास ठेवला; म्हणून देशाला शेतकरी नेता मिळाला. एखादा भामटा निघाला; म्हणून सगळेच भामटे निघत नाहीत,’’ असा टोला नाव न घेता सदाभाऊ खोत यांना लगावत माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले,‘‘असे असले तरी आपण आपला प्रयत्न सोडायचा नाही. आपण वर्गणी देवून निवडून दिलेल्या उमेदवाराने काम न केल्यास त्याचा शर्ट काढायला, तुमच्याबरोबर मी सर्वात पुढे असेन.’’ 

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीतील उमेदवार सचिन शिंदे यांच्या प्रचारनिमित्त शेट्टी हे मंगळवेढा तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. तालुक्यातील अरळी येथील सभेत ते बोलत होते. या वेळी पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र युवा आघाडीचे अध्यक्ष अॅड. राहुल घुले, जिल्हाध्यक्ष महमूद पटेल, तानाजी बागल, विष्णुपंत बागल, रणजित बागल, तालुकाध्यक्ष श्रीमंत केदार, शहराध्यक्ष हर्षद डोरले, अनिल बिराजदार, शंकर संगशेट्टी, अनिल अंजुटगी, आप्पासाहेब पाटील, सिद्धाराम व्हनुट्टगी, बाळासाहेब कपले उपस्थित होते.


‘‘शेतकऱ्यांच्या हालापेष्टांना केंद्र व राज्य सरकार जबाबदार आहे. पंढरपूरच्या पोटनिवडणुकीतून राज्य आणि केंद्र सरकारचा एकाच वेळी काटा काढायची संधी मिळाली आहे. एफआरपी थकविणाऱ्या उमेदवारांचा काटा काढून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उमदेवारास संधी द्यावी.

शेतकऱ्यांना कर्ज झाले तरी त्यांना तोंड लपवावे लागते. नाहीतर खर्चात काटकसर करावी लागते. इथे मात्र शेतकऱ्यांच्या एफआरपीची रक्कम थकवून उमेदवारांच्या खर्चात मात्र काटकसर नाही. शेतकऱ्यांच्या एफआरपीची कोट्यवधीची रक्कम थकवून निवडणूक खर्चासाठी मात्र दोन्ही पक्षाच्या उमेदवाराकडे पैसे आहेत. पाच वर्षे पैसे गोळा करायचे आणि ते पैसे निवडणुकीवर खर्च करायचे, अशाचा काटा काढायची संधी पोटनिवडणुकीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळाली आहे,’’ असे प्रतिपादन राजू शेट्टी यांनी केले. 

संत दामाजी कारखान्यातील सभासदाची मालकी हक्क रद्द करुन कारखाना खिशात घालायचा प्रयत्न होत असेल, त्याचा जाब विचारण्याची धमक स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उमेदवारामध्ये आहे. दरोडेखोर लाखो रुपये लुटत असताना साखर कारखानदार मात्र कोट्यवधी रुपयांचा दरोडा दिवसाढवळ्या टाकत असून अशा  उमेदवारांचा काटा काढावा. जेवणावळी व दारूला बळी पडू नका. केंद्र व राज्यातील सरकारला धडा शिकवण्याची हीच संधी आहे, असे आवाहनही शेट्टी यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com