पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत मोहिते पाटील-शिंदे गटाची नेतृत्वासाठी लढाई - Fight in Mohite Patil-Shinde group in Pandharpur by-election for leadership | Politics Marathi News - Sarkarnama

पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत मोहिते पाटील-शिंदे गटाची नेतृत्वासाठी लढाई

  प्रमोद बोडके
बुधवार, 7 एप्रिल 2021

जिल्ह्याचे बहुतांश राजकारण या दोन्ही नेत्यांभोवती फिरत होते.

सोलापूर : भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस एकत्रित आले. राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर विधानसभेची पहिलीच पोटनिवडणूक पंढरपुरात होत आहे. त्यामुळे पंढरपूरच्या जनादेशाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. पंढरपुरातला राजकीय सामना थेट राष्ट्रवादीचे भगिरथ भालके विरुद्ध भाजपचे समाधान आवताडे यांच्यात होत असला तरी मोहिते पाटील विरुद्ध शिंदे यांच्या राजकीय खेळीमुळे पंढरपूर-मंगळवेढ्याचे मैदान राज्यात गाजत आहे. 

सोलापूर जिल्ह्यात अकलूजचा सहकार महर्षी सहकारी साखर कारखाना आणि पंढरपूरचा विठ्ठल सहकारी साखर कारखाना, असे दोन महत्त्वाचे साखर कारखाने सुरुवातीला होते. मोहिते-पाटील यांच्या ताब्यात एक, तर माजी आमदार औदुंबरअण्णा पाटील यांच्या ताब्यात एक, असे दोन कारखाने दोन दिग्गज नेत्यांकडे असल्याने जिल्ह्याचे बहुतांश राजकारण या दोन्ही नेत्यांभोवती फिरत होते. काँग्रेसमध्ये झालेल्या फाटाफुटीत औदुंबरअण्णा पाटील यांनी यशवंतराव चव्हाण यांची साथ देणे पसंत केले, तर मोहिते पाटील गटाने वसंतदादा पाटील यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला.  

मोहिते पाटील विरोधाला शिंदे-पाटील यांच्या नात्याची किनार 

पंढरपूरचे औदुंबरअण्णा पाटील यांचे वाढते प्रस्थ रोखण्यासाठी विजयसिंह मोहिते-पाटील यांनी पंढरपूरच्या मैदानात सुधाकरपंत परिचारक यांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या साथ दिली. त्यामुळे औदुंबरअण्णा यांच्यासारख्या मोठ्या प्रस्थाचे राजकीय महत्व कमी होत गेले. (कै.) विठ्ठलराव शिंदे यांच्या भगिनी या औदुंबरअण्णा पाटील यांचे मोठे बंधू जनार्दन पाटील यांच्या पत्नी असल्याने शिंदे आणि औदुंबरअण्णा पाटील यांचे नाते हे जवळचे आहे. शिंदे आणि मोहिते यांच्या राजकीय युद्धामध्ये शिंदे आणि पाटील यांच्या या नात्याचीही किनार आहे. 

भालके यांच्या राजकीय नेतृत्वाचा उदय

विधानसभा मतदारसंघाची 2009 मध्ये पुनर्रचना झाल्यानंतर विजयसिंह मोहिते-पाटील यांनी आमदारकीसाठी सुरुवातीला माढ्यातून प्रयत्न केला. तिथे राजकीय मेळ बसत नसल्याने त्यांनी शेवटच्या क्षणी पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची निवड केली. आजपर्यंत मोहिते पाटील यांनी परिचारक गटाला केलेली मदत पाहता 2009 च्या निवडणुकीत मोहिते-पाटील यांना परिचारक गटाची मदत होईल, असा सर्वांचा अंदाज होता. शेवटच्या क्षणी राजकीय गणिते बदलली आणि या निवडणुकीतून भारत भालके यांच्या राजकीय नेतृत्वाचा उदय झाला. 

परिचारक-मोहिते पाटील समीकरण पुन्हा जुळले

बदलत्या समीकरणात आमदार प्रशांत परिचारक यांची आमदार संजय शिंदे यांच्यासोबत राजकीय मैत्री जुळली. मोहिते पाटलांनीही पंढरपूरच्या मैदानात परिचारक सोडून भारत भालके यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला परिचारक आणि नंतर मोहिते पाटील हे दोघेही भाजपच्या झेंड्याखाली एकत्र आल्याने पंढरपूरची समीकरणे पुन्हा एकदा परिचारक-मोहिते पाटील या जुन्या पद्धतीप्रमाणे जुळली आहेत. 

सोलापूर जिल्ह्याचा नेता कोण?

करमाळ्याचे अपक्ष आमदार संजय शिंदे यांनी सरकार स्थापनेत राष्ट्रवादी काँग्रेसची सोबत पसंत केल्याने पंढरपूरच्या या पोटनिवडणुकीत भालके आणि शिंदे एकत्रित आले आहेत. सोलापूर जिल्ह्याचा नेता कोण? हे पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालातून ठरणार असल्याने राज्य सरकार विरोधातील जनादेशासोबतच सोलापूर जिल्ह्यातील नेतृत्वाचा कौलही या निवडणुकीतून स्पष्ट होणार आहे. 
 
तिसरा चेहरा महत्वाचा

पंढरपूरच्या निवडणुकीत दोन दिग्गज उमेदवारांच्या विजय पराजयात तिसरा चेहरा हा नेहमीच महत्त्वाचा ठरला आहे. मागील दोन निवडणुकीत समाधान आवताडे हा तिसरा चेहरा म्हणून पुढे आले आहेत. (कै.) भारत भालके यांच्या राजकारणाची सुरुवातही तिसरा चेहरा म्हणूनच झालेली आहे. या निवडणुकीत अपक्ष उमेदवार सिद्धेश्वर आवताडे, शैला गोडसे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे नशीब आजमावत आहेत. भाजपचे समाधान आवताडे आणि राष्ट्रवादीचे भगिरथ भालके या दोन मुख्य प्रतिस्पर्ध्यांच्या निकालात कोणता तिसरा चेहरा निर्णायक ठरतो? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख