धवलसिंह मोहिते पाटलांच्या प्रवेशानंतरही कॉंग्रेसची वाट बिकटच ! - Even after the entry of Dhawalsingh Mohite Patil, the path of the Congress in Solapur will be tough | Politics Marathi News - Sarkarnama

धवलसिंह मोहिते पाटलांच्या प्रवेशानंतरही कॉंग्रेसची वाट बिकटच !

प्रमोद बोडके  
रविवार, 31 जानेवारी 2021

या नेत्याच्या माध्यमातून जनाधार शोधण्याची खडतर ‘धवल'क्रांती कॉंग्रेसला करावी लागणार आहे.

सोलापूर : राज्यासाठी अप्रुप ठरलेला डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या कॉंग्रेस प्रवेशाचा सोलापूर जिल्ह्यात फारसा गाजावाजा झाला नाही. एकेकाळी सत्तेच्या शिखरावर असलेली सोलापूर जिल्ह्यातील कॉंग्रेस आणि डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांना पूर्वीचा जनाधार मिळविण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे. डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या माध्यमातून सोलापूरच्या कॉंग्रेसला नेता मिळाला. या नेत्याच्या माध्यमातून जनाधार शोधण्याची खडतर ‘धवल'क्रांती कॉंग्रेसला करावी लागणार आहे.
 
आमदार राजेंद्र राऊत, आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार जयवंतराव जगताप, कल्याणराव काळे, आमदार (स्व.) भारत भालके, माजी आमदार दिलीप माने, माजी महापौर महेश कोठे यांच्यासारखे दिग्गज नेते कॉंग्रेसला सोडून अन्य पक्षात गेले. माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचा भाजप प्रवेशाचा प्रयत्न फसला. या सर्व राजकीय घडामोडी टप्प्या टप्प्याने होत असताना त्याकडे नेतृत्वाचे झालेले दुर्लक्ष कॉंग्रेसच्या आजच्या स्थितीला कारणीभूत मानले जात आहे. 

जिल्ह्यात सध्या आमदार विजयकुमार देशमुख यांनी भाजपच्या माध्यमातून आपल्या विचाराच्या कार्यकर्त्यांचे जाळे शांततेत तयार केले आहे. अपक्ष आमदार संजय शिंदे यांनीही कधी समविचारी, तर कधी राष्ट्रवादीच्या माध्यमातून आपल्या विचाराच्या कार्यकर्त्यांची फळी उभी करण्याचा प्रयत्न चालवला आहे. जिल्ह्यात सध्याच्या स्थितीत भाजप आणि राष्ट्रवादी दिवसेंदिवस भक्कम होत असताना शिवसेना आणि कॉंग्रेस मात्र दिवसेंदिवस कमकुवत होत चालली आहे. अशा स्थितीत कॉंग्रेसला आणि डॉ. मोहिते-पाटील यांना जिल्ह्याच्या राजकारणात पॉलिटिकल स्पेस शोधावी लागणार आहे. सध्याच्या स्थितीत कार्यकर्त्यांना अनेक राजकीय पर्याय उपलब्ध आहेत. कॉंग्रेस आणि डॉ. मोहिते-पाटील यांचा पर्याय आपलासा वाटण्यासाठी कशी रणनिती आखली जाते? यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. 

...तर दक्षिणचा निकाल बदलला असता

जिल्ह्यातील विधानसभेच्या 11 पैकी फक्त तीन जागा कॉंग्रेसच्या वाट्याला आल्या आहेत. त्यातही शहर मध्यमधून प्रणिती शिंदे या एकमेव आमदार 2019 मध्ये विजयी झाल्या आहेत. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी या निवडणुकीत सोलापूर दक्षिणचे कॉंग्रेस उमेदवार बाबा मिस्त्री आणि अक्कलकोटचे उमेदवार सिद्धाराम म्हेत्रे यांच्याकडे सर्वार्थाने थोडे जरी लक्ष दिले असते, तरीही किमान ‘दक्षिण'चा तरी निकाल बदलला असता अशी रुखरुख मिस्त्रींना मिळालेली मते पाहून व्यक्त होत आहे. एकेकाळी जिल्हाभर असलेली कॉंग्रेस आता अक्कलकोट, शहर मध्य आणि सोलापूर दक्षिण पुरती राहिली आहे. त्यातही एकच आमदार विजयी झाल्याने जिल्ह्यातील कॉंग्रेस शहर मध्य पुरती मर्यादित झाल्याचे दिसत आहे. 

‘प्रकाश’मय नेतृत्वाबाबत नकारात्मक सूर

कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, शहराध्यक्ष प्रकाश वाले यांच्या नेतृत्वाबद्दल पक्षातून सातत्याने नकारात्मकतेचा सूर निघत आहे. या प्रश्‍नाचे उत्तर शोधण्याऐवजी कॉंग्रेसचे नेते या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. त्याबाबत बदल किंवा असलेल्या पदाधिकाऱ्यांचे वरिष्ठांकडून समर्थन काहीच होताना दिसत नाही. त्यामुळे कॉंग्रेसमध्ये गटबाजीची भावना वाढू लागली आहे. नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्या, महापालिका या निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी अन्य पक्ष तयारी करत असताना कॉंग्रेसमध्ये मात्र मरगळ दिसत आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख