भालकेंनी आवताडेंचे लीड कमी केले : मतमोजणीच्या २९ फेऱ्या पूर्ण, आता ९ फेऱ्यांकडे लक्ष - At the end of the 29th round in Pandharpur, Avtade is leading with 6140 votes | Politics Marathi News - Sarkarnama

भालकेंनी आवताडेंचे लीड कमी केले : मतमोजणीच्या २९ फेऱ्या पूर्ण, आता ९ फेऱ्यांकडे लक्ष

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 2 मे 2021

मतमोजणीच्या उर्वरीत ९ फेऱ्या ह्या मंगळवेढा तालुक्यातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या ३५ गावांतील होत आहे.

पंढरपूर : अत्यंत चुरशीने सुरू असलेल्या मतमोजणीत पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाच्या २९ फेरीअखेर भाजपचे समाधान आवताडे यांनी ६१४० मतांची आघाडी घेतली आहे. समाधान आवताडे यांना २७ व्या फेरीअखेर ७१४२ मतांची आघाडी होती. त्यात राष्ट्रवादीचे भगिरथ भालके यांनी सुमारे १००० मतांची आघाडी कमी केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मताधिक्क्यात कमी-जास्तपणा होत आहे.

दरम्यान, पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या निकालासाठी एकूण ३८ फेऱ्यात आहेत. त्यातील २९ फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. आता उर्वरीत ९ फेऱ्यांकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मंगळवेढा शहरातील मतमोजणी झाली असून आता ग्रामीण भागातील मतांची मोजणी करण्यात येत आहे. त्यामुळे आता पुढील नऊ फेऱ्यांवर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचा निकाल अवलंबून असणार आहे. 

मतमोजणीच्या उर्वरीत ९ फेऱ्या ह्या मंगळवेढा तालुक्यातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या ३५ गावांतील होत आहे. त्या गावांतील पाणीप्रश्नाचा मुद्दा निवडणुकीत पेटला होता. मंगळवेढा उपसा सिंचन योजना ह्या परिसरातील आहे. त्यामुळे पाणी प्रश्नावर येथील जनतेने कोणावर भरवसा ठेवला आहे, हे तासाभरात समजणार आहे. 
पंढरपुरात रविवारी (ता. 2 मे) सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीस सुरूवात झाली. एकूण 14 टेबलवरून 38 फेऱ्यांद्वारे मतमोजणी केली जात आहे. आतापर्यंत संपूर्ण पंढरपूर तालुका आणि मंगळवेढा तालुक्यातील १२ फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत.

प्रशांत परिचारकांनी शब्द पाळला

दरम्यान, विधानसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे भारत भालके यांना पंढरपूर तालुक्यात निर्णायक सुमारे ६००० मतांची आघाडी मिळाली होती. ती भारत भालके यांना विजयासाठी महत्वाची ठरली होती. यंदाच्या पोटनिवडणुकीत मात्र भाजपचे आवताडे यांनी हे मताधिक्य कमी करून ९०० मतांची आघाडी घेतली आहे. 

पंढरपूर तालक्यातून मिळालेली आघाडी पाहता भाजपचे उमेदवार प्रशांत परिचारक ह्यांनी आवताडे यांच्यासाठी जोरदारपणे ताकद लावल्याचे दिसून येत आहे. कारण, त्यांच्या भूमिकेविषयी काही जणांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. मात्र, निर्णायक मताधिक्क देत त्यांनी सर्वांना चोख उत्तर दिले आहे. कारण, गेल्या वेळी भारतनानांना पंढरपूर तालुक्यातून सहा हजार मतांची आघाडी मिळाली होती. ती कमी करून आवताडे यांना लीड देण्यात परिचारक यांना यश आले आहे.

भगिरथ भालके यांना पंढरपूर तालुक्यात कमी मते मिळण्यामागे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उमेदवारही कारणीभूत असू शकतो. कारण त्यांच्यासाठी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी व प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी मतदारसंघात तळ ठोकला होता. तसेच, विठ्ठल साखर कारखान्यच्या काही संचालकांनीही भालके यांची साथ सोडत स्वाभिमानीच्या उमेदवाराच्या पाठीशी ताकद लावली होती. त्याचा फटका भगिरथ भालके यांना बसू शकलेला असू शकतो. त्यासाठी गावनिहाय मतांचे विश्लेषण करावे लागेल.

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांनी भालके यांच्यासाठी सभा घेतल्या होत्या. विशेषतः अजित पवार यांनी पंढरपुरात दोन दिवस मुक्काम ठोकत परिचारक गटाला आपल्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न केला होता, मात्र, सर्वांच्या गाठीभेटी घेऊन त्याचा तेवढासा फायदा भगिरथ यांना झालेला दिसत नाही.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख