माळशिरस (जि. पुणे) : पेहराव ही माणसाची ओळख असते. मात्र, नेहमीपेक्षा वेगळा पेहराव केल्यास तोही चर्चेचा विषय होतो. त्याचाच प्रत्यय आज (ता. 5 डिसेंबर) पुरंदर तालुक्यातील माळशिरस येथे आला. येथील धनगर समाजाच्या कार्यक्रमास आलेल्या आमदार संजय जगताप यांना धनगरी फेटा बांधून खांद्यावर घोंगडी आणि हातात काठी दिली. आमदार जगताप यांच्या या पेहरावाचीच तालुक्यात कार्यक्रमापेक्षा अधिक चर्चा होती.
माळशिरस येथील किल्ले वस्तीवरील धनगर बांधवांनी आपले श्रद्धास्थान असणाऱ्या मंदिरासमोर लोकवर्गणीतून सभा मंडपाचे काम हाती घेतले आहे. त्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तालुक्याचे आमदार संजय जगताप यांच्या हस्ते सभामंडपाचे भूमिपूजन करण्यात आले.
धनगर समाजाच्या आग्रहावरून आमदार संजय जगताप हे आज कार्यक्रमास आले. ते गाडीतून खाली उतरताच येथील धनगर बांधवांनी पारंपारिक पिवळ्या रंगाचा फेटा आमदार संजय जगताप यांना बांधला. त्यानंतर खांद्यावर शालऐवजी धनगर समाजाची ओळख असलेली घोंगडी आणि त्यानंतर हातात खास रेखीव करून घेतलेली काठी दिली. आमदार जगताप यांनीही आनंदाने या पेहरावाचा स्वीकार केला.
आमदार जगताप यांना हा पेहराव शोभून दिसत होता. त्यामुळे कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्वच तरुण कार्यकर्त्यांसह ज्येष्ठांनीही आमदार जगताप यांची ही छबी आपल्या मोबाईलमध्ये टिपली. अनेकांनी या पेहरावातील आमदार जगताप यांचा व्हिडिओ तयार करून व्हायरला केला. तो व्हिडिओ क्षणात पुरंदर तालुक्यात फिरला आणि एकच चर्चा सुरू झाली.
कार्यक्रमावेळीही आमदार जगताप यांच्या खास पेहरावाचीच चर्चा होती, त्यामुळे आमदारसाहेबांचा चेहरा खुलून दिसत होता. आमदार कार्यक्रमास आल्याने धनगर समाजाचे नागरिकही खूष होते.
आमदार संजय जगताप यांच्या पेहरावाचा व्हिडिओ कार्यकर्त्यांनी तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. धनगरी पेहरावातील संजय जगतांचा फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यामुळे माळशिरस परिसरातील हा छोटासा कार्यक्रम संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय होऊन सर्वांपर्यंत पोचला.

