बारामती : राजकीय नेता असला तरी स्पष्टवक्तेपणाबद्दल प्रसिध्द असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आजही बारामतीत जोरदार बॅटींग केली. कार्यकर्ते असो वा अधिकारी प्रत्येकाने आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडली पाहिजे, हे आपल्या शैलीत आज अजित पवारांनी रोखठोकपणे सुनावले.
गदिमा सभागृहात आज झालेल्या कार्यक्रमात अजित पवार यांनी चांगल्या कामासाठी कोणाला फसवू नका असे सांगतानाच मुख्यमंत्री स्वयंरोजगार निर्मिती कार्यक्रमात जर कोणी पैसे मागायचा प्रयत्न केला तर त्याला मग जेलमध्ये जावे लागेल आणि मग चक्की पिसिंग...पिसिंग...पिसिंग...अशी अवस्था होईल, असा थेट इशाराच त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला.
आपल्या कार्यपध्दतीबद्दल बोलताना आम्ही सकाळी लवकर उठून कामाला लागतो असे सांगताना ते म्हणाले, दिवस उगवण्याची वाट पाहावी लागते कारण विकासकामे उजेडात पाहता तर यायला हवीत, त्या मुळे थोडस उजाडण्याची वाट बघतो नाही तर मी रात्रीपण काम केल असत, अस त्यांनी गंमतीने सांगितल. साहेब वयाच्या ऐंशीव्या वर्षी कार्यरत असतात, मीही आता साठीला पोहोचलो सुप्रियाही पन्नाशीला आली, पण जसे दिवस जात आहेत तसा माझा कामाचा उत्साह वाढतो आहे....काही कळनांच....थोडस थांबून...कामाचा बर कां...दुसरा नाही वाढत, अस म्हणताच सभागृहात हास्याचा स्फोट झाला. बारामतीत स्थानिकांना वेळ द्यायचा असतो पण
जनतेच्या पैशाच्या कामातून होणा-या विकासकामांवर लक्ष ठेवाव लागत अस अजित पवार यांनी सांगतच, आजच सकाळी एक काम दर्जेदार नसल्याच माझ्या लक्षात आल्यावर संबंधितांना मी चांगल झापलं....मला असल अजिबात चालणार नाही, नीटच काम व्हायला हवं, अशी तंबी दिली. अशा शब्दात त्यांनी आपली कार्यशैली नमूद केली.
हे करताना विरोधकांचाही त्यांनी चिमटा काढला. बारामतीतील नीरा डावा कालव्याच्या अस्तरीकरणाला काहींनी विरोध केला, याने आमच पाणी जाईल अस त्यांना वाटत...पण काहीही चांगल काम सुरु झाल की त्यात बिब्बा कालवायच काम काही जण करतात...ही जित्राबं लय वाईट आहेत...यांचा अजिबात विचार करु नका...तुम्ही करत नाही ही गोष्ट तर खरीच आहे, बाहेर कुणी आल तर त्यालाही तुम्ही डिपॉझिट जप्त करुन परत पाठवता, असलं तुमच काम आहे, अशा शब्दात बारामतीकरांबद्दल त्यांनी कृतज्ञताही व्यक्त केली.
Edited By - Amit Golwalkar

