अजित पवारांचा पंढरपुरात गनिमी कावा; परिचारक समर्थकांशी साधली जवळीक - Deputy Chief Minister Ajit Pawar met BJP leaders in Pandharpur | Politics Marathi News - Sarkarnama

अजित पवारांचा पंढरपुरात गनिमी कावा; परिचारक समर्थकांशी साधली जवळीक

भारत नागणे
शुक्रवार, 9 एप्रिल 2021

अजित पवारांच्या या गाठीभेटीमुळे भाजपच्या गोटात मात्र मोठी खळबळ उडाली आहे.

पंढरपूर : पंढरपूर विधानसभेची पोटनिवडणुक राष्ट्रवादी आणि भाजपने जितकी प्रतिष्ठेची केली आहे, त्यापेक्षा जास्त उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या निवडणुकीत स्वतःची प्रतिष्ठा पणाला लावली आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यात मॅरेथॉन बैठक आणि गाठीभेटी सुरु आहेत.

अजित पवार यांनी आज पंढरपूर येथील भाजप पुरस्कृत आघाडीच्या नगराध्यक्षा आणि भाजप आमदार प्रशांत परिचारकांच्या कट्टर समर्थक साधना भोसले आणि भाजप नेते, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे समर्थक सी. पी. बागल यांच्या घरी भेट देवून राष्ट्रवादीचे उमेदवार भगिरथ भालके यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. अजित पवारांच्या या गाठीभेटीमुळे भाजपच्या गोटात मात्र मोठी खळबळ उडाली आहे.

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने पंढरपुरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. ही निवडणुक कोणत्याही परिस्थितीत जिंकायची यादृष्टीने भाजपने रणनीती आखली आहे. यासाठी भाजपचे श्रीकांत भारतीय, पक्ष निरीक्षक माजी मंत्री बाळासाहेब भेगडे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार राम सातपुते, सोलापूरचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख आदींसह अनेक राज्य व जिल्हा पातळीवरील नेते पंढरपुरात तळ ठोकून आहेत.

भाजप आमदार प्रशांत परिचारकांनीही समाधान आवताडे यांच्या विजयासाठी आपली शक्तीपणाला लावली आहे. तर, दुसरीकडे ही जागा कायम ठेवण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपली शक्ती पणाला लावली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्वतः या निवडणुकीत लक्ष घातले आहे. त्यांच्यासाठी ही निवडणूक महत्वाची आणि सोलापूरच्या पुढील राजकीय समीकरणांसाठी महत्वाची मानली जाते. त्यामुळे अजित पवार समर्थक आमदार संजय शिंदे यांच्यावर महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे गुरुवारपासून (ता. 8 एप्रिल) पंढरपुरात आहेत. भाजप नेते कल्याणराव काळे यांना गुरुवारी राष्ट्रवादीत प्रवेश देण्यात आला. त्यानंतर दिवसभर कासेगाव, खर्डी, गादेगाव येथे जाहीर सभा घेतल्या. त्यानंतर रात्री महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्या घरी जावून त्यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान दिलीप धोत्रे व मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीला मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

भाजप पुरस्कृत आघाडीच्या नगराध्यक्षा व भाजपचे आमदार प्रशांत परिचारक यांचे कट्टर समर्थक साधना भोसले व त्यांचे पती पंढरपूर मर्चंट बॅंकेचे अध्यक्ष नागेश भोसले यांच्या घरी जावून शुक्रवारी सकाळी अजित पवार यांनी चहापान घेतले. या भेटीदरम्यान भोसले यांच्यात गुप्त चर्चा झाल्याची ही माहिती आहे. त्यानंतर भाजपचे माजी तालुका अध्यक्ष श्रीकांत बागल व सी. पी. बागल यांच्या घरी जावून अजित पवारांनी त्यांच्याशीही निवडणुकीसंदर्भात चर्चा केली.
 
उपमुख्यमंत्री अजित पवार आज मंगळवेढ्यातील कार्यकर्त्यांच्या बैठका आणि गाठीभेटी घेणार आहेत. मागील विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी उमेदवाराच्या विरोधात असलेले मंगळवेढा येथील नगरपालिकेतील पक्षनेते अजित जगताप, रतनचंद शहा बॅंकेचे अध्यक्ष राहुल शहा यांच्या घरी जावून त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. उमुख्यमंत्री अजित पवारांच्या या मॅरेथॉन बैठकांमुळे पंढरपूरचे राजकारण मात्र ढवळून निघाले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख