केडगाव (जि. पुणे) : "मी आमदार होण्यामध्ये पुणे जिल्हा सहकारी बॅंकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार रमेश थोरात यांचा मोठा वाटा आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये मी त्यांच्यामुळे आलो. खरं तर मला रमेश थोरात यांच्याकडे यायला उशीर झाला. तुषार थोरात यांच्या वाढदिवसाला जमलेली गर्दी दौंड तालुक्यात परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही. अशी गर्दी कमी लोकांच्या नशिबी असते,'' असे नगर जिल्ह्यातील पारनेरचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार नीलेश लंके यांनी सांगितले.
माजी आमदार थोरात यांचे चिरंजीव, युवा नेते तुषार थोरात यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात आमदार लंके बोलत होते.
लंके म्हणाले, "तुषार थोरात व रोहित पाटील हे नशीबवान युवा कार्यकर्ते आहेत. या दोघांना फार मोठी राजकीय पार्श्वभूमी लाभलेली असल्याने त्यांचे भविष्य उज्ज्वल आहे. रोहित आर. पाटील यांच्यात राज्याचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे. तुषार हे रमेशअप्पांच्या पाऊलावर पाऊल ठेऊन काम करत आहे. हिऱ्याच्या पोटी जन्माला यायला नशीब लागते. आमच्या खानदानीत कोणी ग्रामपंचायत सदस्य नव्हते. आमचा सगळा एकखांबी तंबू आहे.''
रोहित आर. पाटील म्हणाले, "रमेशअप्पा थोरात व आर. आर. पाटील यांचे घनिष्ठ संबंध होते. आज या कार्यक्रमाचा पाहुणा नाही, तर मी दौंड तालुक्याचा पाहुणा म्हणून मी इथे आलो आहे. तुषार थोरात आपण समाजातील सर्व घटकांसाठी दूरदृष्टी ठेऊन काम कराल, त्यांना न्याय द्याल, अशी आशा बाळगतो.''
या वेळी माजी आमदार रमेश थोरात, युवा नेते रोहित आर. पाटील, अप्पासाहेब पवार, वैशाली नागवडे, डॉ. वंदना मोहिते, राणी शेळके, रामभाऊ टुले, सत्वशील शितोळे, भाऊसाहेब ढमढेरे, ऍड. दौलत ठोंबरे, उत्तम आटोळे, नितीन दोरगे, भिवाजी गरदडे, कुंडलिक खुटवड, विजय म्हस्के, प्रकाश नवले आदी उपस्थित होते.
सचिन शेळके यांनी प्रास्ताविक केले, तर दिलीप हंडाळ यांनी सूत्रसंचालन केले. तुषार थोरात यांनी आभार मानले.

