अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आवताडेंनी गाठला अकलूजचा शिवरत्न बंगला 

शिवरत्न, पांडुरंग व दामाजी परिवार एकत्र आल्याने माझाच विजय होणार आहे.
BJP candidate Samadhan Avtade met Mohite Patil
BJP candidate Samadhan Avtade met Mohite Patil

पुणे : पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधान आवताडे यांनी अकलूजचा शिवरत्न बंगला गाठत मोहिते पाटील यांची भेट घेतली. या मतदारसंघातील मोहिते पाटील गटाच्या कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न आवताडे यांनी केला. या वेळी ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह आमदार रणजितसिंह, धैर्यशील मोहिते पाटील उपस्थित होते. मोहिते पाटील गटाकडूनही कार्यकर्त्यांची संपूर्ण ताकद आवताडे यांच्या पाठीशी उभी करण्याचे आश्‍वासन देण्यात आले. 

"राज्यातील एकमेव विधानसभा पोटनिवडणूक पंढरपूरमध्ये होत असून या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. येथील लढत प्रतिष्ठेची झाली आहे. भारतीय जनता पक्षाने समाधान आवताडे यांना उमेदवारी जाहीर करून युवा आणि विकासाभिमुख दृष्टीकोन असणाऱ्या उमेदवाराला उमेदवारी दिली आहे. मोहिते पाटील गटाचे सर्व कार्यकर्ते पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघ पिंजून काढून जोमाने आवताडे यांचा प्रचार करत आहेत,'' असे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले. 

भारतीय जनता पक्षाचे पंढरपूरचे उमेदवार समाधान आवताडे यांनी बुधवारी (ता. 31 मार्च) अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर येवून मोहिते पाटील यांची भेट घेतली. या वेळी कार्यकर्त्यांची बैठक बोलवण्यात आली. ज्येष्ठ नेते, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, ल्क्ष्मणराव ढोबळे, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील व सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

भाजपचे उमेदवार समाधान आवताडे म्हणाले की, कोणालाही मिळणारी सहानुभूती ही क्षणिक असते. पंढरपूर व मंगळवेढ्याची जनता सुज्ञ असून दीर्घकालीन विचार करणारी आहे. महाविकास आघाडीतील अनेक घोटाळे, भ्रष्टाचार दररोज समोर येत आहेत. त्यामुळे ही जनता भालकेंना सहानुभूती न दाखवता भाजपच्या विकासाला प्राधान्य देऊन मलाच निवडून देईल. शिवरत्न, पांडुरंग व दामाजी परिवार एकत्र आल्याने माझाच विजय होणार आहे, असा विश्‍वासही संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांनी बोलून दाखविला. 

भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील यांनी सर्व कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने आवताडे यांच्या प्रचारात उतरण्याचे आवाहन केले.   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com