To Ban Mobile Apps is Childish Act Claims Jitendra Awhad | Sarkarnama

चिनी अॅपवर बंदी घालणे हा पोरकटपणा : जितेंद्र आव्हाड

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 1 जुलै 2020

आव्हाड यांनी ट्वीटरद्वारे मोदींवर आणि केंद्र सरकारवर टीका केली आहे. अॅपवर बंदी घालणे हा पोरकटपणा आहे. आपण वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे सदस्य आहोत, असे सांगत या अॅपवर बंदी घालणे शक्य आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

पुणे : तिथे मॅप बदलले जात आहेत, आणि आपण इथे ॲप वर बंदी घालतोय. काय पोरकटपणा आहे? असा सवाल राज्याचे गृहनिर्माण मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीटरवरुन विचारला आहे. 

भारत आणि चीनच्या सैन्यात पूर्व लडाखमध्ये गल्वान खोऱ्यात झालेल्या संघर्षात भारताचे 20 जवान हुतात्मा झाले होते. यानंतर देशभरात चीनविरोधी वातावरण निर्माण झाले आहे. केंद्रातील मोदी सरकार काहीच कार्यवाही करीत नसल्याने विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरले होते. आता केंद्र सरकारने लोकप्रिय टिकटॉक अॅप आणि यूसी ब्राऊजरसह 59 चिनी अॅप्सवर बंदी घातली आहे. मात्र, यातील काही अॅप्स वगळता इतर सर्व अॅप्स सुरूच राहतील, असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करीत आहे. टिकटॉक आता गुगलचे प्ले स्टोअर आणि अॅपलच्या अॅप स्टोअरमधून हटविण्यात आले आहे. 

केंद्र सरकारने घातलेली बंदी ही माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 मधील कलम 69 अ अंतर्गत घातली आहे. या कलमानुसार सरकारला देशाची सुरक्षा, एकात्मता याला धोका निर्माण करणाऱ्या संगणकीय स्त्रोतांवर बंदी घालता येते. याचबरोबर त्यांच्यावर गुन्हाही दाखल केला जाऊ शकतो. टिकटॉकने म्हटल्याप्रमाणे सरकारने चिनी अॅप्सवर बंदी घालण्याचा घेतलेला निर्णय हंगामी असेल तर, त्यावर फेरविचार होऊ शकतो. यामुळे टिकटॉकसह इतर 59 अॅप्सवरील बंदी तात्पुरती की कायमस्वरुपी याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. 

याबाबत आव्हाड यांनी ट्वीटरद्वारे मोदींवर आणि केंद्र सरकारवर टीका केली आहे. अॅपवर बंदी घालणे हा पोरकटपणा आहे. आपण वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे सदस्य आहोत आणि आपण स्वाक्षरी केलेल्या कराराच्या कलम २ आणि १४ (सी) - २ या कलमांनुसार ही बंदी शक्य आहे का?, असा सवाल उपस्थित करत, कशाला ही धूळफेक? असेही आव्हाड यांनी म्हटले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख