सोमेश्वरनगर (जि. पुणे) : विधानसभेच्या 1967 च्या निवडणुकीत सर्वसामान्य लोकांना बदल हवा होता. लोक विरोधकांसोबत असल्यासारखे दाखवायचे; परंतु फिरताना आम्हाला हळूच हात करून "आम्ही तुमच्यासोबत आहोत' असा दिलासा द्यायचे. पण, जिल्ह्यातील अनेक नामवंत साहेबांना तिकीट देण्याच्या विरोधात होते.
विरोधकही प्रस्थापित आणि सहकार ताब्यात असणारे होते. त्यामुळे साशंकता होती. पण सामान्य मतदारांनी, तरुणांनी साथ दिली आणि परिवर्तन झाले. या दिवशी (ता. 22 फेब्रुवारी) बारामतीत गुलाल उधळत लोकांनी उस्फुर्त मिरवणूक काढली आणि त्या मिरवणुकीचा भाग बनता आले, याचा आज अभिमान वाटतो, अशी आठवण माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे 1964 पासूनचे सहकारी बी. जी. काकडे यांनी सांगितली.
बारामती मतदारसंघाने 1967 मध्ये शरद पवार नावाचा उमेदवार 22 फेब्रुवारी रोजी विधानसभेत पाठविला आणि आज तो उमेदवार "पवारसाहेब' या नावाने महाराष्ट्राचा व देशाचा इतिहास बनला आहे. या घटनेला 54 वर्ष झाली असून त्यानिमित्ताने त्या निवडणुकीच्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. आज ते राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते, देशातील अग्रभागी नेते, समाजातील सर्वस्पर्शी नेतृत्व असले तरी हे नेतृत्व बारामतीकरांनी 22 फेब्रुवारी 1967 मध्ये निवडून पुढे आणले होते.
या निवडणुकीत सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष (स्व.) बाबालाल काकडे यांचा पराभव शरद पवारांनी केला होता. त्यानंतर आजतागायत विधानसभा, लोकसभा, राज्यसभा अशा सर्व निवडणुकांमध्ये ते अपराजित राहिले. मुख्यमंत्री बनून पुरोगामी महाराष्ट्राचा, यशवंतराव चव्हाणांचा वारसा पुढे नेला, तर देशाला सक्षम संरक्षणमंत्री आणि कृषिमंत्री त्यांच्या रूपाने लाभला.
यानिमित्ताने काकडे म्हणाले, ""एका न्यायालयीन बाबीसाठी 1964 मध्ये पवारसाहेबांचे बंधू ऍड. वसंतराव पवार यांना भेटण्यासाठी काटेवाडीला गेलो होतो. त्या प्रसंगी पवारसाहेबांची भेट झाली. ते विद्यार्थी कॉंग्रेसचे राज्याचे सरचिटणीस होते. त्यांच्याकडे 6464 क्रमांकाची ऍम्बेसिडर होती, त्यामध्ये फिरण्याचा योग आला. बंधू शेकापकडून जिल्हा बोर्डासाठी उभे असतानाही त्यांनी कॉंग्रेसचे काम केले होते, हे यशवंतराव चव्हाणांनी पाहिले होते. त्यामुळे 1967 च्या विधानसभा निवडणुकीत चव्हाणांकडे जिल्ह्याचे शिष्टमंडळ जाऊन पवारांसारख्या नवख्या व्यक्तीला तिकीट देऊ नये, असे सांगत होते. मात्र, चव्हाणांनी पवारांवर विश्वास टाकत एक जागा गेली तरी चालेल; पण तिकीट त्यांनाच देणार, असे स्पष्ट केले आणि पूर्ण ताकदही दिली.
बारामती तालुक्याच्या पश्चिम भागात बाळासाहेब गिते, शिवाजीराव भोसले, मी, कृष्णराव खासेराव अशा अनेकांनी त्यांना मनापासून साथ दिली. पूर्व भागात ज. ना. ढोले, बुवासाहेब गाडे, उद्धवराव इंगोले, धोंडिबा सातव, माजी आमदार मुळीक, स्वातंत्र्यसैनिक जगन्नाथ कोकरे, ढाकाळकर, गावडे अशा अनेकांची साथ लाभली.
विरोधक पश्चिम भागातील प्रस्थापित असल्याने या भागात प्रचार करण्याचे आव्हान होते. शारदाबाई पवार, आप्पासाहेब पवार प्रचाराला येत असल्याचे आठवत आहे. साहेबांच्या गावोगावी छोट्या सभा व्हायच्या. त्यावेळी लोक विरोधकांना तुमच्यासोबत म्हणायचे आणि आम्हाला आतून हात करून दिलासा द्यायचे. लोकांना बदल हवा होता. कारण, 1966 मध्ये या निवडणुकीची रंगीत तालीम झाली होती.
जिल्हा परिषदेसाठी झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेस पुरस्कृत (स्व.) भगवानराव काकडे यांनी प्रस्थापित असलेल्या ब. द. गायकवाड यांचा पराभव केला होता. यामधून आम्हाला पुढील विजयाची चुणूक जाणवली होती. त्यानुसार आमदारकीच्या निवडणुकीत तालुक्यात पूर्ण परिवर्तन झाले. यानंतर बारामती शहरात साहेबांची विजयी मिरवणूक काढण्यात आली. त्यावेळी आम्हाला त्यात सहभागी होता आले.
त्यानंतर यशवंतराव चव्हाण स्वतः कृष्णराव खासेराव काकडे यांच्या घरी निंबुतला आले होते. त्यावेळी पवारसाहेबही सोबत होते. आम्ही लोकांनी पवारसाहेबांना निवडून आणल्याबद्दल चव्हाणांनी आमचे कौतुक केले होते.
निवडून आल्यावरही साहेब साधेपणाने राहायचे. त्यांचे परदेशात असलेले बंधू बापूसाहेब यांनी एक गाडी दिली होती. त्या गाडीत आम्ही साहेबांसोबत मुंबईला कित्येकदा गेलो आहे. ते काम करत बसायचे आणि आम्ही आमदार निवासात थांबायचो. पुढे जाऊन ते इतके मोठे होतील, असे त्यावेळी कुणाला वाटले नव्हते. परंतु अथक परिश्रम आणि बुद्धिच्या जोरावर त्यांनी देश पादाक्रांत करून दाखवला. आज ती पहिली निवडणूक आठवते, तेव्हा त्यांच्यासोबत असल्याचा अभिमान वाटतो.

