...अन्‌ अजित पवारांनी स्वतःच गोणपाट उचलून कामाचा दर्जा तपासला!  - ... And Ajit Pawar himself picked up the gonapat and checked the quality of work! | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांच्यासह सहा जणांवर म्हसवड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे

...अन्‌ अजित पवारांनी स्वतःच गोणपाट उचलून कामाचा दर्जा तपासला! 

मिलिंद संगई 
रविवार, 31 जानेवारी 2021

मला काम दर्जेदार लागते, याची माहिती असतानाही असे काम केले तर खपवून घेणार नाही.

बारामती : विकासकामे दर्जेदारच व्हायला हवीत, असा कायम आग्रह धरणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे किती बारकाईने प्रत्येक कामाची पाहणी करतात, याचा प्रत्यय रविवारी (ता. 31 जानेवारी) पुन्हा एकदा आला. 

अधिकारी व पदाधिकारी यांच्या समवेत अजित पवार यांनी रविवारी भल्या पहाटे बारामती शहरात सुरु असलेल्या विविध विकासकामांना भेटी दिल्या. दिवस उजाडत असतानाच अजित पवार यांचा ताफा शहरातील नीरा डावा कालव्याच्या अस्तरीकरणाच्या सुरु असलेल्या कामाजवळ येऊन थांबला. 

अस्तरीकरणाच्या कामाबद्दल अजित पवार यांनी समाधान व्यक्त केले खरे, मात्र शेजारी केलेल्या पायऱ्याच्या कामाबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या पायऱ्यांवर सिमेंटच्या कामाला ओल राहावी, यासाठी गोणपाट झाकून ठेवले होते. पवार यांनी स्वतःच खाली वाकून ही गोणपाट दूर करत कामाचा दर्जा पाहिला. मात्र, पायऱ्या व्यवस्थित सिमेंटने भरल्या नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. 
ही बाब खटकल्यानंतर उपस्थित कंत्राटदार आणि संबंधित प्रशासनाचे अधिकारी आणि पदाधिकारी सर्वांनाच पवार यांचे खडे बोल ऐकून घ्यावे लागले. संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बांधकामातील खडान्‌खडा माहिती असलेल्या अजित पवारांचे त्याने काही समाधान झाले नाही. 

"मला काम दर्जेदार लागते, याची माहिती असतानाही असे काम केले तर खपवून घेणार नाही,' अशी तंबी द्यायलाही ते काही विसरले नाहीत. जाहीर भाषणात या बाबत स्वतः अजित पवार यांनी माहिती देत जनतेच्या पैशातून जी विकासकामे होतात, त्याचा दर्जा चांगला राहायला हवा, यासाठी प्रत्येक बारामती भेटीमध्ये मी स्वतः कामावर जाऊन कामाचा दर्जा तपासतो, हेही त्यांनी आवर्जून सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख