पंढरीचे राजकीय सत्ताकेंद्र ‘विठ्ठल’मध्ये अजित पवार लक्ष घालणार; पाटील-भालके वादाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

पोटनिवडणुकीनंतर विठ्ठल कारखान्याची सूत्रे अजित पवार यांच्या हाती जाणार, हे आता स्पष्ट झाले आहे.
Ajit Pawar will monitor the work of Vitthal Sahakari Sugar Factory
Ajit Pawar will monitor the work of Vitthal Sahakari Sugar Factory

पंढरपूर : पंढरपूर तालुक्याचे आर्थिक आणि राजकीय सत्ता केंद्र म्हणून ओळख असलेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या कारभारात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घातले आहे. पवार यांनीच गुरुवारी (ता. ८ एप्रिल) जाहीर सभेत तसे स्पष्ट केले. त्यामुळे विधानसभा पोटनिवडणुकीनंतर विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीची सूत्रे अजित पवार यांच्या हाती जाणार, हे आता स्पष्ट झाले आहे.

(कै.) यशवंतराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली (कै.) औदुंबरअण्णा पाटील यांनी गुरसाळे येथील माळरानावर  1977 मध्ये विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली होती. औदुंबरअण्णा पाटील यांनी अवघ्या काही वर्षातच विठ्ठल कारखाना राज्यात नावारूपाला आणला होता. परंतु 1996  मध्ये झालेल्या कारखान्यावरील सत्तांतरामध्ये (कै.) वसंतराव काळे हे विठ्ठल साखर कारखान्याचे अध्यक्ष झाले. त्यानंतर 2000 पासून ते 2019 पर्यंत तब्बल 19 वर्षे आमदार भारत भालके यांचे कारखान्यावर वर्चस्व होते. त्यांच्या अकाली निधनानंतर त्यांचे पुत्र भगिरथ भालके हे कारखान्याचे अध्यक्ष झाले आहेत.

औदुंबरअण्णा पाटील यांची कारखान्यावरील सत्ता गेली आणि कारखान्याच्या आर्थिक स्थितीला घर घर लागली. गेल्या 20 ते 25 वर्षांमध्ये फायद्यात असलेला कारखाना आज सुमारे 550 ते 600 कोटींच्या कर्जात आहे. वाढत्या कर्जामुळे कारखान्याचे आर्थिक चाक रुतून बसले आहे. कारखान्याकडे ऊस गाळप हंगामासाठी भांडवल उपलब्ध होत नसल्याने त्याचा थेट परिणाम कारखान्याच्या ऊस गाळपावर झाला आहे. प्रतिदिनी 10 हजार टन गाळप क्षमता असलेला कारखाना मागील काही हंगामात जेमतेम 3 ते 4 हजार टनाने चालला आहे. त्यामुळे कारखान्याच्या आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. 

आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर कारखान्याची धुरा भगिरथ भालके यांच्या हाती देण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली मागील वर्षीचा गाळप हंगाम झाला. परंतु त्यांनाही कारखाना पूर्ण क्षमतेने चालवणे शक्य  झाले नाही. आजही ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफआरपी आणि कामगारांचे पगार थकलेले आहेत. अशा अडचणीच्या काळातच विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. 

आमदारकी आणि  कारखान्याचे अध्यक्षपद हे भालकेंकडे ठेवणे किती योग्य आणि अयोग्य याबाबत स्वतः अजित पवारांचे त्या विषयी विचारमंथन सुरु आहे. दरम्यान, कारखान्याच्या निवडणुकीपूर्वीच विठ्ठल परिवारात कुरबुरी सुरु झाल्या आहेत. त्यातून (कै.) औदुंबर पाटील यांचे नातू विठ्ठल कारखान्याचे संचालक युवराज पाटील यांनी ऐन विधानसभा पोटनिवडणुकीच्या तोंडावर भगिरथ भालकेंच्या विरोधात बंड पुकारले. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या वादावर पडता टाकत विठ्ठल परिवारातील युवराज पाटील, कल्याण काळे यांना एकाच व्यासपीठावर आणले आहे.

कल्याण काळे यांचा आज अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेशही झाला. याच वेळी अजित पवार यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत व त्यानंतर कारखान्याच्या कारभारात आपण स्वतः लक्ष घालणार असल्याचे जाहीरपणे सांगितले. त्याला उपस्थित पंढरपूरकरांनी दादही दिली. एकूणच पंढरपूरच्या पोटनिवडणुकीनंतर होणाऱ्या विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीची आणि कारखान्याच्या कारभाराची सूत्रे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हाती असतील, हे आता स्पष्ट झाले आहे.

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com