अजित पवार गरजले....मोठ्या बापाचा कुणी असेल तरी गय नाही! - Ajit Pawar Gives Warning to Private Money Lenders | Politics Marathi News - Sarkarnama

अजित पवार गरजले....मोठ्या बापाचा कुणी असेल तरी गय नाही!

मिलिंद संगई
रविवार, 24 जानेवारी 2021

मनगटशाहीच्या जोरावर जर बारामतीकरांना कोणी अडचणीत आणणार असेल आणि कायदा जुमानणार नसेल तर त्याला तडीपार करीन, मोक्का लावेन, मग तो किती मोठ्या बापाचा असला तरी त्याची गय करणार नाही, अशा शब्दात आज सावकारीच्या प्रकरणावर अजित पवार गरजले

बारामती :  मनगटशाहीच्या जोरावर जर बारामतीकरांना कोणी अडचणीत आणणार असेल आणि कायदा जुमानणार नसेल तर त्याला तडीपार करीन, मोक्का लावेन, मग तो किती मोठ्या बापाचा असला तरी त्याची गय करणार नाही, अशा शब्दात आज सावकारीच्या प्रकरणावर अजित पवार गरजले. आपल्या नातेवाईक किंवा कुणी जवळचा असेल तर त्याला आजच या प्रकारापासून दूर राहण्यासाठी समजून सांगा असा सल्ला द्यायलाही अजित पवार विसरले नाहीत.

बारामती सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक श्रीनिवास बहुळकर यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. सावकारी प्रकरणाबद्दल आपण किती गंभीर आहोत हा संदेशच आज अजित पवारांनी बारामतीकरांना दिला. 

कोरोनानंतर आज प्रथमच एका जाहिर कार्यक्रमात अजित पवार बोलले आणि त्यांना विकासाबाबत बोलतानाच सावकारीबाबत आपली भूमिका अतिशय स्पष्ट शब्दात मांडली. कायदा हातात घेणा-यांची गय करणार नाही, सावकारीमध्ये कुणी अडकला असेल तर त्याची शिफारस करण्यासाठी माझ्याकडे यायचे नाही, अशा शब्दात त्यांनी कार्यकर्त्यांनाही संदेश दिला. बारामतीच्या कायदा सुव्यवस्थेबाबत आपण किती जागरुक आहोत, हा संदेशच त्यांनी पोहोचविला. 

 सहकार अडचणीत आणण्याचा केंद्राचा प्रयत्न....
सहकारी बँकांसह इतर संस्थांवर केंद्राचे मोठ्या प्रमाणात निर्बंध येत आहेत. अनेक अडचणींना सहकारी संस्थांना सामोरे जावे लागत आहे, केंद्राचे धोरण सहकार अडचणीत आणण्याचे आहे असेच चित्र आहे. सहकारावर मर्यादा घालण्याचा हा प्रयत्न चुकीचा असल्याचेही अजित पवार म्हणाले. आज मोठ्या बँकांकडे पैसा मोठा आहे, पण खात्रीचा कर्जदार मिळत नाही आणि घोटाळ्यांच्या पार्श्वभूमीवर बँकाही सावध भूमिका घेत असल्याचे ते म्हणाले. 

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख