गावाने सरपंच करण्याचे ठरविले; पण नियतीने ते हिरावले  - Accidental death of Sarpanch's post candidate Ashok Tarte | Politics Marathi News - Sarkarnama

गावाने सरपंच करण्याचे ठरविले; पण नियतीने ते हिरावले 

प्रताप भोईटे 
गुरुवार, 4 फेब्रुवारी 2021

सरपंचपदाचे आरक्षणही त्यांच्या बाजूने निघाले होते.

न्हावरे (जि. पुणे) : नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेले अशोक बाबासाहेब तरटे यांना (वय 55, रा. निर्वी) सरपंच करण्याचे गावकारभाऱ्यांनी ठरविले होते. सरपंचपदाच्या आरक्षणाचा निकालही त्यांच्याच बाजूने लागला. येत्या 9 तारखेला होणाऱ्या बैठकीत त्यांच्या सरपंचदाच्या निवडीवर शिक्कामोर्तब होणार होते. मात्र, नियतीला ते मंजूर नसावे. कारण, सरपंच होण्यापूर्वीच एका अपघाताच्या माध्यमातून त्यांच्यावर काळाने घाला घातला. तरटे यांच्या पाठीमागे आई-वडील, पत्नी, एक मुलगा, मुलगी असा परिवार आहे. 

शिरूर तालुक्‍याच्या निर्वी ग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अशोक तरटे हे निवडून आले होते. तरटे यांनी यापूर्वी निर्वी ग्रामपंचायतीचे सदस्य आणि विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे अध्यक्ष म्हणूनही पाच वर्षे कामकाज पाहिले होते. त्यामुळे पॅनेलप्रमुख तथा गावकारभाऱ्यांनी त्यांना सरपंचपदाची संधी देण्याचे ठरविले होते. सरपंचपदाचे आरक्षणही त्यांच्या बाजूने निघाले होते. त्यामुळे येत्या 9 तारखेला होणाऱ्या निर्वी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत प्रथम तरटे यांना संधी देण्यात येणार होती. मात्र, नियतीला ते मान्य नसावे. 

कारण, अशोक तरटे हे मंगळवारी (ता. 2 फेब्रुवारी) आपल्या सहकाऱ्यांसमवेत काही कामानिमित्त कराड (जि. सातारा) गेले होते. मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कराड-कडेगाव रस्त्याने ते पायी चालत असताना त्यांना एका दुचाकीने धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना कराड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा बुधवारी (ता. 3 फेब्रुवारी) पहाटे मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे त्यांच्यासह गावाचेही त्यांना सरपंच करण्याचे स्वप्न भंगले. निर्वी गावात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

सरपंच होण्यापूर्वीच अशोक तरटे यांच्यावर काळाने झडप घातल्याने ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच निर्वी-न्हावरे परिसरात शोककळा पसरली होती. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख