मराठा आरक्षणासाठी निघणार ४ फेब्रुवारीला संघर्ष यात्रा

येत्या पाच फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार असून, आरक्षणाचा लढा तीव्र करण्यासाठी पुणे ते साष्ट पिंपळगाव दरम्यान मराठा संघर्ष यात्रेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी दिली.
Maratha Rally
Maratha Rally

पुणे : मराठा आरक्षणाबाबत सरकारची भुमिका दुटप्पी असून, न्यायालयामध्ये आरक्षणाला स्थगिती मिळाली आहे. येत्या पाच फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार असून, आरक्षणाचा लढा तीव्र करण्यासाठी पुणे ते साष्ट पिंपळगाव दरम्यान मराठा संघर्ष यात्रेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी दिली. 

ही संघर्ष यात्रा चार फेब्रुवारी रोजी पुण्यातून निघणार आहे. ती पाच फेब्रुवारी रोजी जालना येथे पोचेल, असे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. या पत्रकार परिषदेस मराठा क्रांती मोर्चा, पुणे जिल्ह्याचे समन्वयक राजेंद्र कोढंरे, रघुनाथ चित्रे पाटील, राजेंद्र कुंजीर, सचिन आडेकर, नाना निवंगुने, हनुमंत मोटे, अनिल ताडगे, धनंजय जाधव, मीना जाधव, प्राची दुधाने, दीपाली पाडाळे, किशोर मोरे, बाळकृष्ण वांजळे, जिवन बोराडे, अमर पवार आदी उपस्थित होते. 

येत्या चार फेब्रुवारीला सकाळी दहा वाजता कोथरुड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून ही यात्रा सुरु होणार आहे.  शिवाजीनगरमार्गे, येरवडा, नगर रस्ता, वाघोली, शिक्रापूर, रांजणगाव, शिरूर, सुपा, नगर, अमळनेरमार्गे बीड येथे मुक्काम करण्यात येणार आहे. शुक्रवारी (ता. ५) सकाळी दहा वाजता बीड येथून पुन्हा यात्रेला सुरुवात होइल. बीड ते पाडळसिंगी, गेवराई, शहागडमार्गे जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील साष्ट पिंपळगाव येथील आंदोलनाला पाठिंबा दिला जाणार आहे. 

मराठा आरक्षणासाठी २३ मार्च १९८२ रोजी स्व.आण्णासाहेब पाटील यांनी पहिले आत्मबलिदान दिले. तेव्हापासुन सुरु असलेला हा लढा तीन-चार वर्षांत तीव्र झाला. लढवय्या मराठ्यांनी संयम न सोडता शांततेत ५८ मोर्चे काढले. शांततापूर्व लढ्यात ४२ मराठा तरुण आरक्षणासाठी शहीद झाले. तसेच १४ हजार ५२३ मराठा तरुणांवर गुन्हे दाखल झाले. राज्य सरकारने आरक्षण जाहीर केले. परंतु त्याला न्यायालयात स्थगिती मिळाल्यामुळे मराठा तरुणांच्या नोकरीच्या नियुक्त्या प्रलंबित असून, मराठा विद्यार्थ्यांचे प्रवेश लटकले आहेत. साष्ठ पिंपळगावातील मराठ्यांनी ठिया आंदोलनातून संघर्ष सुरु केला आहे. त्यांना पाठिंबा देवून या लढ्याला बळकटी देण्यासाठी मराठा समाजाने संघर्ष यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चातील समन्वयकांनी केले आहे. 
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com