माझ्या घरावर मोर्चे काढणारे आता संजय जगतापांच्या घरावर मोर्चे काढणार का?  - Will those who are marching on my house, now march on Sanjay Jagtap's house? : shivtare | Politics Marathi News - Sarkarnama

माझ्या घरावर मोर्चे काढणारे आता संजय जगतापांच्या घरावर मोर्चे काढणार का? 

श्रीकृष्ण नेवसे 
शनिवार, 23 जानेवारी 2021

निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने व बारामतीकरांनी मदत केली, त्याची परतफेड सुरू असावी.

सासवड (जि. पुणे)  : "पुरंदर तालुक्‍यातील पुढच्या अनेक पिढ्यांचे भले पाहून आपण आंतरराष्ट्रीय विमानतळ तालुक्‍यात आणले. माझ्या घरावर त्यावेळी मोर्चे काढले, आता आमदार संजय जगताप यांच्या घरावर कोणी मोर्चे काढते का, ते मला बघायचे आहे,'' अशा शब्दांत माजी आमदार विजय शिवतारे यांनी जमीन संपादनाच्या वेळी झालेल्या विरोधाबद्दल खंत व्यक्त केली. 

पुरंदर तालुक्‍यातील शिवसेनेच्या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांना भेटण्यासाठी शिवतारे हे आज (ता. 23 जानेवारी) मुंबईहून सासवड (ता. पुरंदर) येथे आले होते. त्या वेळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी त्यांनी पुरंदरचे विद्यमान आमदार संजय जगताप यांच्यावर सडकून टीका केली. 

विमानतळाची जागा बदलून ते बारामतीच्या सीमेजवळ नेऊन ठेवणे, हे मोठे षडयंत्र आहे. विमानतळासाठी पुरंदरमधील जागा घ्यायची आणि विमानतळाचे प्रवेशद्वार बारामतीच्या बाजूला करून तिकडचा विकास साधायचा. पण, हे षडयंत्र आपण जनतेला बरोबर घेऊन हाणून पाडणार आहोत,'' असाही हल्लाबोल त्यांनी या वेळी केला. 

"गुंजवणी प्रकल्पाच्या कामाला अन्‌ विमानतळाला आडकाठी आणण्याची आणि फायदा बारामतीला करून देण्याची आमदार संजय जगताप यांची भूमिका आहे. निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने व बारामतीकरांनी मदत केली, त्याची परतफेड सुरू असावी, अशी माझी शंका असून जनतेनं खात्री करुन घ्यावी,'' असे आवाहनही शिवतारे यांनी केले. तसेच "केवळ मेहेरबानी म्हणून भलत्याच तालुक्‍याचे भले करण्यासाठी परस्पर विमानतळाची जागा बदलास आपला विरोध असल्याचेही शिवतारे यांनी सांगितले. 

"विमानतळाप्रमाणे गुंजवणी पाईपलाईन प्रकल्पाची रखडपट्टी कोणी केली, हे आता सर्वांना कळून चुकले आहे. गेली वर्षभरात बारामती, इंदापूरला कोट्यवधी रुपयांचा निधी मिळतोय आणि पुरंदरला एक रुपयाही हे आणू शकत नाहीत. त्यामुळे पुरंदरमधील ग्रामपंचायत निवडणुकीत कॉंग्रेसला जनतेनं जागा दाखविली. एकही ग्रामपंचायत ते स्वबळावर का लढले नाहीत, तशी ग्रामपंचायतही त्यांची आली नाही,'' अशी खोचक टीका शिवतारे यांनी संजय जगताप यांच्यावर केली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख