'स्वाभिमानी' उधळणार सांगलीच्या 'सिंघम'च्या बदलीचा डाव? - Will Swabhimani Can Stall Chandrakant Gudewar's Transfer | Politics Marathi News - Sarkarnama

'स्वाभिमानी' उधळणार सांगलीच्या 'सिंघम'च्या बदलीचा डाव?

संपत मोरे
बुधवार, 8 जुलै 2020

माजी मंत्री आमदार सुरेश खाडे यांनी गुडेवार यांची बदली करावी, अशी मागणी केली होती. त्यांनी  'गुडेवार प्रामाणिक अधिकारी आहेत. माझा आणि त्याचा वाद नाही. त्यांनी जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी व सदस्यांशी  समन्वय साधत कारभार करावा.' अशी भूमिका घेतली आहे.

पुणे : सांगली जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांच्या सिंघम स्टाईलच्या कारभाराने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. त्यांची बदली व्हावी म्हणून राजकीय पक्षाचे नेते प्रयत्न करत आहेत.त्यांच्या बदलीसाठी लोकप्रतिनिधी प्रयत्न करत असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मात्र 'गुडेवार यांच्या बदलीचा डाव आम्ही उधळून लावू.'अशी भूमिका घेतली आहे.

माजी मंत्री आमदार सुरेश खाडे यांनी गुडेवार यांची बदली करावी, अशी मागणी केली होती. त्यांनी  'गुडेवार प्रामाणिक अधिकारी आहेत. माझा आणि त्याचा वाद नाही. त्यांनी जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी व सदस्यांशी  समन्वय साधत कारभार करावा.' अशी भूमिका घेतली आहे. सांगली जिल्हा परिषदेच्या इतिहासात शिस्तप्रिय अधिकारी कमी वेळा आले आहेत. गुडेवार यांच्या कामाच्या पद्धतीचा धसका कामचुकार अधिकारी आणि चुकीच्या कामाला पाठीशी घालणाऱ्या राजकारणी लोकांनी घेतला आहे.

चंद्रकांत गुडेवार यांची बदली होण्यासाठी अनेकजण प्रयत्न करत आहेत. यात राजकीय नेते, लोकप्रतिनिधी आघाडीवर आहेत.गुडेवार यांच्या कामाचे कौतुक सामान्य जनतेकडून होत असताना तशाच प्रकारचे कौतुक राजकीय नेत्यांकडून अपेक्षित आहे. मात्र तसे घडताना दिसत नाही. लोकप्रतिनिधींना गुडेवार नकोसे झाले आहेत. त्यांची बदली व्हावी म्हणून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे पत्रे पाठवली आहेत. जिल्हा परिषदेचे पदाधिकारी लोकप्रतिनिधींकडे तक्रार करतात आणि लोकप्रतिनिधी त्यांचे ऐकून बदलीसाठी प्रयत्न करत असल्याचे चित्र आहे.

दरम्यान चंद्रकांत गुडेवार यांच्या बदलीसाठी अनेकजण हात धुवून मागे लागले असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मात्र त्यांची बदली करू नका असे म्हटले आहे ."सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार हे जिल्हा परिषदेच्या नियमानुसार कामकाज करत आहेत. त्यामुळे चुकीचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना भिती वाटत आहे. सांगली जिल्ह्यातील जनता गुडेवार यांच्या कामाबद्दल समाधानी आहे. लोकांना ताबडतोब न्याय मिळत आहे. मात्र ज्यांचे हात चुकीच्या कामांनी बरबटलेले आहेत असे लोक राजकीय नेत्यांच्याकडे जाऊन गुडेवार यांची बदली करा, अशी मागणी करत आहेत,'' असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने म्हटले आहे.

एका चांगल्या अधिकाऱ्याची केवळ तो चांगले काम करतोय, म्हणून त्याची बदली करणे हे आपल्या जिल्ह्याला शोभणारे नाही. गुडेवार यांच्या बदलीने चुकीचा संदेश जाईल. काहीही झाले तरी आम्ही त्यांची बदली होऊ देणार नाही. तो डाव आम्ही उधळून लावू." असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष महेश खराडे आणि भागवत जाधव यांनी दिला आहे.

संपादन : अमित गोळवलकर

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख