पुणे : विद्यमान नेत्यांच्या नातेवाईकांना निवडणुकीत उमेदवारी द्यायची नाही, हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला निर्णय पुण्यात गिरीश बापट, जगदिश मुळीक, माधुरी मिसाळ, यांनाही लागू होणार का, असा प्रश्न आहे. बापट वगळता या नेत्यांचे निकटवर्तीय विद्यमान नगरसेवक आहेत.
गुजरातमध्ये महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुतणी सोनल मोदी यांना अहमदाबाद महापालिकेची निवडणूक लढविण्याची इच्छा होती. त्यांनी भाजपकडे तिकीटही मागितलं होतं. पण पक्षाने उमेदवारीसाठी लावलेल्या नवीन नियमांच्या आधारे त्यांना तिकीट नाकारलं आहे. त्याची देशभर चर्चा सुरू आहे.
पुण्यात विद्यमान खासदार गिरीश बापट यांच्या स्नुषा स्वरदा या निवडणुकीची तयारी करत आहेत. दुसरीकडे पुणे भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांचे बंधूही विद्यमान नगरसेवक आहेत. ते पण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांची भावजय मानसी देशपांडे विद्यमान नगरसेविका आहेत. त्या आगामी महापालिका निवडणुकीत पुन्हा उमेदवारी मागण्याची शक्यता आहे. माजी आमदार व ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांच्या मातोश्री नगरसेविका आहेत. त्यांनाही पुन्हा उमेदवारी मिळणार का, असा सवाल पुढे येण्याची शक्यता आहे. मोदींच्या पुतणीला जो नियम भाजपने लावला, तोच नियम या नेत्यांच्या नातेवाईकांच्या लावण्याचे धाडस देेवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील दाखवणार का, याची उत्सुकता आहे.
भाजपसह सर्व राजकीय पक्षांमध्ये घराणेशाही दिसून येते. त्यावरून अनेकदा टीकाही होती. गुजरातमध्ये महापालिका निवडणुकींची रणधुमाळी सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुतणी सोनल मोदी यांनी अहमदाबादच्या बोदकदेव वॉर्डातून भाजपकडं तिकीट मागितले होते. पण पक्षाने प्रसिध्द केलेल्या उमेदवारी यादीमध्ये त्यांचे नाव नसल्याचे समोर आले आहे. सोनल मोदी या पंतप्रधान मोदींचे बंधू प्रल्हाद मोदी यांच्या कन्या आहेत. मागील काही वर्षांपासून त्या पक्षामध्ये सक्रीय आहेत. सोनल यांना उमेदवारांसाठीच्या नवीन नियमांमुळे तिकीट नाकारण्यात आल्याचे पक्षाचे तेथील प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत आर. पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
गुजरात भाजपने पक्षातील नातेवाईकांचा विचार उमेदवारीसाठी केला जाणार नसल्याचे नुकतेच जाहीर केले आहे. हाच नियम सोनल यांनाही लावण्यात आला आहे. तसेच तीन वेळा नगरसेवक असलेले आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या कार्यकर्त्यांनाही उमेदवारी देणार नसल्याचे पक्षाने आधीच स्पष्ट केले आहे.

