अजित पवार पुणे जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत शिवसेनेला सामावून घेणार का? 

राज्याच्या राजकारणात पुणे जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीला विशेष महत्त्व आहे.
Will Ajit Pawar accommodate Shiv Sena in Pune District Bank elections?
Will Ajit Pawar accommodate Shiv Sena in Pune District Bank elections?

शेटफळगढे (जि. पुणे) :लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर राज्य पातळीवरील सर्वाधिक व्हीआयपी नेते पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळाच्या निवडणूक रिंगणात उतरतात. यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, आमदार संजय जगताप, संग्राम थोपटे, दिलीप मोहिते, अनिल भोसले हे संचालक म्हणून कार्यरत आहेत. अपवाद वगळता हे मातब्बर नेते पुन्हा निवडणुकीत उतरण्याची शक्‍यता आहे.

याशिवाय महाविकास आघाडीच्या निमित्ताने शिवसेना नेत्यांना कसे सामावून घेतले जाते, हे पाहावे लागणार आहे. तसेच, पूर्वाश्रमीचे कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे पण भाजपत गेलेले सहकार नेतेही या रणधुमाळीत उतरण्याची शक्‍यता आहे, त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुणे जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीला विशेष महत्त्व आहे. 

या पार्श्वभूमीवर तब्बल वर्षभराच्या कालावधीनंतर बॅंकेच्या थांबलेल्या निवडणूक पूर्वतयारीला आता पुन्हा सुरुवात झाली आहे. येत्या 18 जानेवारीपासून बॅंकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यानुसार बॅंकेच्या ज्या सभासद संस्थांनी अद्याप प्रतिनिधींचे ठराव जमा केलेले नाहीत. अशा संस्थांना आपल्या प्रतिनिधींचे ठराव तालुक्‍याच्या सहायक निबंधक कार्यालयात 18 ते 22 जानेवारी या कालावधीत दाखल करता येणार आहेत. 

दरम्यान, पुणे जिल्हा बॅंकेची निवडणूक यंदा चुरशीची होण्याची शक्‍यता आहे. कारण, आत्तापर्यंत कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत असलेल्या नेत्यांनी भाजपत प्रवेश केला आहे. ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर रंगत आणखी वाढणार आहे. यात गेल्यावेळी राष्ट्रवादीच्या सोबत असलेले इंदापूरचे अप्पासाहेब जगदाळे यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील गटासोबत जाणे पसंत केले. या ठिकाणी पाटील कोणाला संधी देतात, हे पाहावे लागणार आहे. तालुक्‍याचे लोकप्रतिनिधी तथा राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे हे विद्यमान संचालक आहेत, ते राष्ट्रवादीकडून पुन्हा लढण्याची शक्‍यता आहे. 

मागील पंचवार्षिकला राष्ट्रीय समाज पक्षात असलेले दौंडचे आमदार राहुल कुल यांनी तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासोबत युती करत बॅंकेची मागील निवडणूक लढवली होती. त्यात त्यांना अपयश आले असले तरी विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपत प्रवेश केला आहे, त्यामुळे पक्षाच्या आदेशानुसार त्यांना भूमिका घ्यावी लागणार आहे. बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात हे या तालुक्‍यातून संचालक म्हणून निवडून आलेले आहेत. 

पुरंदरमध्ये कॉंग्रेसचे आमदार संजय जगताप, डॉ. दिगंबर दुर्गाडे हे विद्यमान संचालक आहेत. कॉंग्रेसकडून जगताप हे स्वतः लढणार की कार्यकर्त्यांना संधी देणार, याची उत्सुकता आहे. तसेच, राष्ट्रवादी येथून दुर्गाडेंना तिकिट देणार की नवा चेहरा पुढे करणार, याकडे तालुक्‍याचे लक्ष असेल. पुरंदरमध्ये महाविकास आघाडीतील शिवसेना पक्षाची ताकद आहे, त्यामुळे राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे येथील सेनेचे लक्ष असणार आहे. 

भोरमधून कॉंग्रेसचे आमदार संग्राम थोपटे, राष्ट्रवादीचे भालचंद्र जगताप, तर वेल्ह्यातून रेवणनाथ दारवटकर, तर मुळशीतून आत्माराम कलाटे, जुन्नरमधून संजय काळे, मावळमधून बाळासाहेब नेवाळे, खेडमध्ये आमदार दिलीप मोहिते, शिरूर-हवेलीतून प्रकाश मस्के, निवृत्तीअण्णा गवारी, वर्षा शिवले हे संचालक आहेत. भोर वगळता इतरत्र राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. येथून पक्ष जुन्यालाच उभे करणार की काही नवे चेहरे देणार, याची चर्चा रंगली आहे. 

आंबेगाव तालुक्‍यातून कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील हे विद्यमान संचालक आहेत. ते पुन्हा उमेदवार असण्याची शक्‍यता आहे. येथील माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या भूमिकेकडे सर्वांच्या नजरा असतील. कारण, महाविकास आघाडीत शिवसेना हा प्रमुख पक्ष असून आढळराव हे बॅंकेत प्रवेश करण्यासाठी नक्की प्रयत्न करणार. पण, राष्ट्रवादी त्यांना दाद देणार का? हा खरा प्रश्‍न आहे. 

बारामती तालुक्‍यातून स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार हे संचालक आहेत. अपेक्षेनुसार ते पुन्हा उमेदवार असतील. पण त्यांच्यासोबत मागील वेळी संचालक असलेले मदनराव देवकाते यांनी पुन्हा संधी मिळते की पक्ष दुसऱ्या व्यक्तीला उमेदवारी देणार हे पाहावे लागेल. मात्र, तालुक्‍यातील धनगर समाजाचे प्राबल्य पाहता या समाजातून उमेदवार येण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

शिरूरचे माजी आमदार बाबूराव पाचर्णे, मावळमधून बाळा भेगडे, पुणे शहरातून खासदार गिरीश बापट व इतर नेते पक्षाच्या माध्यमातून पॅनेल करून लढणार की सोयीनुसार स्वबळ आजमावणार, हे पाहावे लागेल. 

मातब्बर पुन्हा रिंगणात 

सध्याच्या संचालक मंडळातही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, आमदार संजय जगताप, संग्राम थोपटे, दिलीप मोहिते हे संचालक म्हणून कार्यरत आहेत. राज्य पातळीवरील हे नेतेही पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्‍यता आहे, त्यामुळे बॅंकेच्या आगामी निवडणुकीला महत्त्व आहे. 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com