संजय राऊतांना भीती कुणाची वाटते...शरद पवार की अमित शहांची?  - Whom does Sanjay Raut fear? Sharad Pawar or Amit Shah? | Politics Marathi News - Sarkarnama

संजय राऊतांना भीती कुणाची वाटते...शरद पवार की अमित शहांची? 

सरकारनामा ब्यूरो 
शनिवार, 31 ऑक्टोबर 2020

लोकांमध्ये मिसळणारा पवारांइतका लोकनेता मी गेल्या काही वर्षांत पाहिलेला नाही.

पुणे : "भीती कशाला पाहिजे कोणाची? मला वाटत नाही शरद पवार किंवा अमित शहा हे भीतीदायक आहेत म्हणून. एक मात्र खरं की त्यांच्या त्यांच्या पक्षातील लोकांना त्यांची भीती असणे गरजेचे आहे. शरद पवारांची भीती असण्याची कारण नाही, त्यांच्याइतका लोकांमध्ये जाणारा लोकनेता मी पाहिलेले नाही,' असे सडेतोड उत्तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिले. 

पुण्यात आज (ता. 31 ऑक्‍टोबर) श्रमिक पत्रकार संघात खासदार राऊत यांच्या वार्तालाप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राऊत यांना "तुम्ही गेल्या काही वर्षांपासून दिल्लीत आहात. मुंबईतही असता. शरद पवार की अमित शहा यांच्यापैकी अधिक भीतीदायक कोण वाटतंय,' असा प्रश्‍न राऊत यांना विचारण्यात आला होता. त्या वेळी राऊत यांनी आपल्या बेधडक अंदाजात वरील उत्तर दिले. 

राऊत म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री शहा आणि ज्येष्ठ नेते पवार यांची भीती बाळगण्याचे कारण नाही. ते भीतीदायक आहेत, असे मला वाटत नाही. पण त्यांच्या पक्षातील लोकांना त्यांची भीती असणे आवश्‍यक आहे. लोकांमध्ये मिसळणारा पवारांइतका लोकनेता मी गेल्या काही वर्षांत पाहिलेला नाही. लोकं बाळासाहेब ठाकरेंनाही फार घाबरायचे. त्यांची एकेकाळी दहशत होती, असे म्हटले जायचे. पण, जेव्हा लोकं बाळासाहेबांना भेटायचे, तेव्हा लोक त्यांच्या प्रेमात पडायचे. पवारसाहेब हेही अनेक प्रसंगात लोकांमध्ये जाऊन फिरत असतात. त्यामुळे त्यांची भीती कशाकरिता? कुणी पाप केले असेल तर नक्कीच भीती वाटेल, असे टोलाही त्यांनी खास राऊत शैलीत लगावला. 

राज्यपालांना टोला 

वाढीव वीजबिलाच्या प्रश्‍नावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नुकतीच राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांची भेट घेतली. त्या वेळी कोश्‍यारी यांनी राज यांना "वीजबिलासंदर्भात तुम्ही एकदा शरद पवारांशी बोलून घ्या' असा सल्ला दिला होता. त्याबाबत संजय राऊत म्हणाले की भारतीय जनता पक्षाचे लोक शरद पवारांना नेता मानतात. आता राज्यपाल कोश्‍यारी हेसुद्धा पवार यांना नेता मानायला लागले, याचा आम्हाला आनंद आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत मी शरद पवारांना भेटणार आहे, त्या वेळी त्यांना राज्यपालांनाही मार्गदर्शन करायला सांगणार आहे, असा टोला राऊत यांनी राज्यपालांना लगावला. 

पुढील महिन्यात सरकार एक वर्षे पूर्ण करेल 

शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस या तीन पक्षाचे महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले. तेव्हा उद्धव ठाकरे यांचे सरकार लवकर कोसळेल, अशी भाकिते केली गेली. पण सरकार पडले तर नाहीच मात्र पुढील महिन्यात हे सरकार आपला एक वर्षाचा कालावधी पूर्ण करत आहेत, असेही राऊत यांनी विरोधकांना सुनावले. 
Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख