मोहिते पाटील-शिंदे यांच्यातील नेतृत्वाचा फैसला करणार पंढरपूरचा निकाल! - Who will lead Solapur district will be decided after the Pandharpur by-election results | Politics Marathi News - Sarkarnama

मोहिते पाटील-शिंदे यांच्यातील नेतृत्वाचा फैसला करणार पंढरपूरचा निकाल!

सुनील राऊत 
बुधवार, 28 एप्रिल 2021

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेतेमंडळींनी जाहीर सभांमधून मोहिते पाटील यांच्यावर अनेकदा टिकाटिपण्णी केली.

नातेपुते (जि. सोलापूर) : पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची पोटनिवडणूक भारतीय जनता पक्षाचे समाधान आवताडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे भगिरथ भालके यांच्यात झाली असली तरी ही निवडणूक खऱ्या अर्थाने मोहिते पाटील विरोधात शिंदे अशीच झाली आहे. या पोटनिवडणुकीच्या निकालाचा परिणाम राज्यातील सरकारवर होणार नसला तरी जिल्ह्याचे नेतृत्व ठरवणार असणार आहे. जिल्ह्याची आर्थिक सत्ताकेंद्र असलेल्या सोलापूर जिल्हा बँकेसह विविध सहकारी संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले नेतृत्व पंढरपूर आणि मंगळवेढ्याची जनता कोणाच्या बाजूने कौल देते, हे पाहावे लागणार आहे.  

या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशी लढत झाली असली तरी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, त्यांचे चिरंजीव आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्याविरोधात आमदार संजय शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार अशीच नेतृत्वाची लढाई पहायला मिळाली. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार भगिरथ भालके आणि भाजपचे उमेदवार समाधान आवताडे एकमेकांच्या निशाणावर आलेच नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेतेमंडळींनी जाहीर सभांमधून मोहिते पाटील यांच्यावर अनेकदा टिकाटिपण्णी केली.

पोटनिवडणुकीचा निकाल का महत्त्वाचा?

पंढरपूर-मंगळेवढा पोटनिवडणुकीचा निकाल हा मोहिते पाटील आणि शिंदे गटासाठी महत्त्वाचा आहे. कारण, जिल्ह्यात आगामी काळात महत्वाच्या संस्थांच्या निवडणुका आहेत. या पोटनिवडणुकीच्या विजयाचे फासे ज्याच्या बाजूने पडणार आहे, त्याचा भावनिकदृष्टया फायदा होणार आहे. या पोटनिवडणुकीच्या निकालामुळे जिल्ह्याचे नेतृत्व कोण करणार हेही ठरणार आहे. कारण, पुढील काळात सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, जिल्हा सहकारी दूध संघ (दूध पंढरी), सोलापूर जिल्हा परिषद याच्याबरेाबर अनेक सहकारी संस्थांच्या निवडणुका आहेत. त्याच्यावर या विजयाचा परिणाम पडणार आहे. 

उजनीच्या पाण्याचा राजकीय घडामोडींवर परिणाम होणार

पोटनिवडणुकीच्या मतदानानंतर उजनी धरणातील पाच टीएमसी पाणी पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यासाठी उचलण्याचा निर्णय झाला आहे. त्याचा प्रस्ताव सोलापूरचे पालकमंत्री आणि इंदापूरचे लोकप्रतिनिधी दत्तात्रेय भरणे यांनी मांडला असला तरी त्यामागे उपमुख्यमंत्री अजित पवार असल्याची भावना सोलापूर जिल्ह्यात बळावत आहे. या निर्णयाचा परिणाम भविष्यातील सोलापूर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींवर निश्चितपणे दिसणार आहे. 

भाजप लाभ उठवण्याची शक्यता

नीरा उजवा कालव्याचे पाणी नीरा डाव्या कालव्यात वळविल्याचा आरोप होत असताना उजनीचे हे पाच टीएमसी पाणी उचलण्याच्या या निर्णयामुळे सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसविषयी नाराजीची भावना निर्माण झालेली आहे. याचा राजकीय लाभ विरोधी पक्ष असलेला भाजप उठवल्याशिवाय राहणार नाही. सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी, राजकीय पक्ष, गट-तट बाजूला ठेवून पाण्यासाठी एकी करून लढण्याची गरज निर्माण झालेली आहे. 

अकलूज नगरपालिकेचा मुद्दा ऐरणीवर

पंढरपूर पोटनिवडणुकीच्या निकालानंतर माळशिरस तालुक्यातील अकलूज नगरपालिका आणि नातेपुते नगरपंचायत नव्याने निर्माण करण्याचा रेंगाळलेला प्रश्न राज्य सरकारला त्वरित सोडवणे गरजेचे आहे. अकलूज नगरपालिका आणि नातेपुते नगर पंचायतीचा पहिला अध्यादेश 12 सप्टेंबर 2019 रोजी राज्यपाल यांच्या सहीनिशी निघालेला आहे. यानंतर या ग्रामपंचायतींच्या 15 जानेवारीला निवडणुका होऊन नवीन सरपंच, उपसरपंच यांच्या निवडी झाल्या आहेत. या दोन्ही ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपालिका, नगर पंचायतीमध्ये लवकर न झाल्यास राज्य सरकारविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख