पूजा चव्हाणचा मोबाईल मिळवण्याचा प्रयत्न करणारी 'ती' व्यक्ती कोण? - Who wanted Pooja Chanvan's Mobile Phone | Politics Marathi News - Sarkarnama

पूजा चव्हाणचा मोबाईल मिळवण्याचा प्रयत्न करणारी 'ती' व्यक्ती कोण?

पांडुरंग सरोदे
रविवार, 14 फेब्रुवारी 2021

पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येच्या घटनेनंतर महाआघाडी सरकारमधील एक राज्यमंत्राचे नाव या प्रकरणामध्ये पुढे येत आहे. त्यातच तिचा फोन ताब्यात घेण्याचा जो आटापीटा केला जात होता, त्यातून या प्रकरणाचे रहस्य अधिकच वाढले आहे

पुणे  : टिकटाॅक स्टार पूजा चव्हाण हिने आत्महत्या केल्यानंतर एक व्यक्ती तिचा फोन मिळवण्यासाठी धडपडत होती. मात्र, दार बंद असल्याने हा फोन मिळवता आला नाही. हा फोन कुणाला आणि कशासाठी हवा होता, हा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. पूजाचा मोबाईल अन्य कुणाच्याही हातात जाऊ देऊ नका, असे ही व्यक्ती पूजाचा चुलतभाऊ व त्याच्या मित्राला सतत बजावत असल्याचे समोर आले आहे. 

पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येच्या घटनेनंतर महाआघाडी सरकारमधील एक राज्यमंत्राचे नाव या प्रकरणामध्ये पुढे येत आहे. त्यातच तिचा फोन ताब्यात घेण्याचा जो आटापीटा केला जात होता, त्यातून या प्रकरणाचे रहस्य अधिकच वाढले आहे. पूजाचा फोन मिळवण्याचा प्रयत्न करणारी व्यक्ती कोण, तिला हा फोन कशासाठी हवा होता, व पूजाच्या फोनमध्ये नक्की असे काय होते की जेणेकरुन ही व्यक्ती हा फोन दुसऱ्या कुणाच्या हाती जाऊ देऊ नका, असे बजावत होती, असे प्रश्न आता निर्माण झाले आहेत.

पूजा इंग्रजी संभाषण कौशल्य अभ्यासक्रमासाठी पुण्यात आली होती. त्यानंतर ती वानवडी येथील एका उच्चभ्रु सोसायटीमध्ये तिचा चुलत भाऊ व त्याच्या मित्रासमवेत राहात होती. एक व्यक्ती पूजाने आत्महत्या करण्यापूर्वी काही दिवस अगोदर पूजाचा चुलत भाऊ व  त्याच्या मित्राच्या सातत्याने मोबाईलद्वारे संपर्कात होती. त्या व्यक्तीकडून पूजाच्या बारीकसारीक गोष्टींवर लक्ष ठेवले जात होते, असे या प्रकरणात व्हायरल झालेल्या आॅडिओ क्लिपमधून दिसते आहे. 

तसेच फोनवरील व्यक्तीने पूजाला आत्महत्येच्या विचारापासुन परावृत्त करावे, असेही तिच्या भावाच्या मित्राकडुन संबंधित व्यक्तीला सांगण्यात येत होते, तसेच पूजा सतत रडत होती, तिच्या मनात आत्महत्येचे विचार येत होते, असेही या व्हायरल क्लिपमधील संभाषणातून दिसून येते आहे. दरम्यान, रविवारी रात्री पूजाने तिच्या खोलीचा दरवाजा आतुन लावून घेऊन सदनिकेच्या गैलरीतुन उडी मारल्याची माहिती फोनवरील व्यक्तीला देण्यात आली. त्यानंतर फोनवरील व्यक्तीने पूजाचा मोबाईल त्वरीत ताब्यात घ्या, असे तिच्या भावाच्या मित्राला सांगितले. पूजाच्या खोलीचा दरवाजा बंद असल्याने आतमध्ये पोचता येत नसल्याचे तिच्या भावाच्या मित्राने 'त्या' व्यक्तीला सांगितल्याचे दिसून येते आहे. 

दरम्यान, गॅलरीजून उडी मारल्यानंतर पूजाला दवाखान्यात नेले. त्या ठिकाणी डाॅक्टरांनी तिला मृत घोषीत केले. या संपूर्ण काळात व अगदी शवविच्छेदन करण्यापर्यंतच्या वेळेपर्यंत फोनवरील "ती" व्यक्ती पुजाचा मोबाईल ताब्यात घेण्यास बजावत होती. पूजाच्या खोलीचा दरवाजा तोडा, ते शक्य नसल्यास दोरीने गैलरीत जाऊन मोबाईल ताब्यात घ्या, असाही मार्ग त्या व्यक्तीने सुचवला होता, असेही संभाषणातून दिसते आहे. दरम्यान, पूजाने आत्महत्या केल्यानंतर तिचा मोबाईल तिच्या कुटुंबाने आपल्या ताब्यात घेतला आहे. तपासामध्ये मोबाईलची गरज वाटल्यास पोलिसांकडून तो मोबाईल ताब्यात घेतला जाऊ शकेल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

या प्रकरणात एका राज्यमंत्र्याचा संबंध असल्याची जोरदार चर्चा सुरु असून विरोधी पक्षांनी त्यावरुन मोठ्या प्रमाणात रान उठविले आहे, असे असताना आता या प्रकरणात महिला आयोगनेही उडी घेतली आहे. संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषीवर कारवाई करण्याची मागणी आयोगाने आपल्या पत्राद्वारे पुणे पोलिसांकडे केली आहे.
Edited By - Amit Golwalkar
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख