पुणे पदवीधरसाठी महाविकास आघाडीकडून उमेश पाटलांचे नाव आघाडीवर 

पवारांचा भक्कम पाठींबा ही उमेश पाटील यांची जमेची बाजू आहे.
Umesh Patil's name from Mahavikas Aghadi for Pune Graduate Constituency
Umesh Patil's name from Mahavikas Aghadi for Pune Graduate Constituency

पुणे : पुणे पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचे तीन दिवस शिल्लक आहेत. भारतीय जनता पक्षाकडून संग्राम देशमुख यांची आज सकाळी उमेदवारी जाहीर झाली आहे. महाविकास आघाडीकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी, आघाडीतून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. या संदर्भातील निर्णय आज किंवा उद्या संध्याकाळपर्यंत जाहीर होणे अपेक्षित आहे. 

राष्ट्रवादीकडून उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार असलेले अरुण लाड हे उमेदवारी न दिल्यास पुन्हा बंडखोरी करतील की काय? अशी भीती पक्षश्रेष्ठींना होती. परंतु स्वजिल्ह्यातच प्रतिस्पर्धी उमेदवार असल्यामुळे सांगली जिल्ह्यात मतविभागणी होणार, हे उघड असल्याने लाड यांना उमेदवारी देतील का? असा प्रश्‍न आहे. त्यांनी बंडखोरी केली तरी सांगलीत मतविभागणी होऊन, त्याचा फायदा आघाडीच्या उमेदवाराला होण्याची शक्‍यता आहे. मतदार नोंदणीत पिछाडीवर असलेल्या सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादीची उमेदवारी पक्षश्रेष्ठी देतील का? याबाबतही चर्चा आहे. त्यामुळे मतांचा राजकीय हिशेब करण्यात तरबेज असलेल्या राष्ट्रवादीच्या धोरणी नेतृत्वाकडून तसे पाऊल उचलण्याची शक्‍यता कमीच आहे. 

आघाडीकडून पुणे आणि सोलापूर या दोन्ही जिल्ह्यांत कार्यक्षेत्र असलेल्या, पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटील यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जात आहे. भाजपने सांगलीत उमेदवारी दिल्याने पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्‍यता आहे. 

पवारांचा भक्कम पाठींबा ही उमेश पाटील यांची जमेची बाजू आहे. "मिस कॉल द्या व मतदार नोंदणी करा' ही भन्नाट कल्पना त्यांनी राबविली. पुणे व सोलापूर जिल्ह्यांत मिळून पन्नास हजारपेक्षा जास्त मतदार नोंदणी वाढवली. अर्थात, भाजपमधूनही पुणे शहरात हौसिंग सोसायटीनिहाय बूथ लावून मतदार नोंदणी वाढविण्याचा यशस्वी प्रयत्न झाला. परंतु भाजपकडून पुण्यातील उमेदवार नसल्याने, पवारांच्या स्वजिल्ह्यातून बहुजन मतदारांचा एकतर्फी पाठिंबा राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मिळण्याची शक्‍यता आहे. 

राष्ट्रवादीचा जो उमेदवार सर्वाधिक मतदार नोंदणी करतो, त्याला उमेदवारी मिळण्याची शक्‍यता जास्त असते. या निकषातही उमेश पाटील आघाडीवर आहेत. पाटील यांचे सासरे आणि राष्ट्रवादीचे पुणे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते विजय कोलते पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. मंत्रिपदाचा दर्जा असलेली पदे सलग अठरा वर्षे त्यांच्याकडे होती. कोलते हे शरद पवार यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. त्यांच्या पुणे जिल्ह्यातील संपर्काचा तसेच पवारांच्या जवळीकीचा उमेदवारी मिळविण्यासाठी पाटलांना फायदा होण्याची शक्‍यता आहे. 

पुणे जिल्ह्यातील मतदान राष्ट्रवादीकडे खेचून आणण्याच्या दृष्टीने अजित पवारांचे उपयोजन मूल्य वादातीत असल्याने, पक्षाला अजित पवारांना पसंत पडेल, असाच उमेदवार रिंगणात उतरवावा लागणार आहे. उमेश पाटील हे अजित पवारांच्या विश्वासातील असल्याने, तेदेखिल आपले वजन पाटलांच्या पारड्यात टाकण्याची शक्‍यता आहे. 

उमेश पाटील हे राष्ट्रवादीचे उमेदवार असतील ही खात्री झाल्याने भाजपने आपली रणनिती बदलून सांगलीच्या संग्राम देशमुख यांची उमेदवारी अंतिम केली असून त्यांच्या उमेदवारीची घोषणा आज सकाळी करण्यात आली. पश्‍चिम महाराष्ट्रातील निवडणूक असल्याने राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर उमेदवार निवडून आणण्याची प्रमुख जबाबदारी असेल. पण, आमदारांना व कार्यकर्त्यांना कामाला लावायचे असेल तर अजित पवारांना त्यांच्या स्टाईलने मैदानात उतरावे लागेल.

रयत शिक्षण संस्था, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ या सारख्या बहुतेक एकगठ्ठा मतदान असलेल्या अनेक संस्थांवर राष्ट्रवादीचा प्रभाव आहे, या शिवाय डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी, भारती विद्यापीठ या संस्थांच्या माध्यमातून झालेली मतदार नोंदणी दुर्लक्षित करून चालणार नाही. 

या निवडणुकीत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पहिल्यांदाच घड्याळाचा प्रचार करावा लागणार आहे. शिवसेनेच्या पश्‍चिम महाराष्ट्रातील नेत्यांची उमेश पाटलांना सर्वाधिक पसंती आहे. कारण, शिवसैनिकांचा राग असलेल्या किरीट सोमय्या व देवेंद्र फडणवीस यांना शिंगावर घेण्याची हिम्मत उमेश पाटलांनी दाखवली होती.

तत्कालिन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पदवीधर शासकीय कर्मचाऱ्यांना मतदार नोंदणी अनिवार्य केली होती. त्याचा परिणाम म्हणून या वेळी अंदाजे दीड लाख शासकीय कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली आहे. उमेश पाटील हे कृषी पदवीधर असल्याने व पत्नी महसूल प्रशासनात वरिष्ठ अधिकारी असल्याने पदवीधर अधिकारी, कर्मचारी यांच्या माध्यमातून शासकीय कर्मचारी वर्तुळात पाटलांना पसंती मिळू शकते. 

एकंदरीत दोन्ही बाजूच्या उमेदवारांची सांगड सध्याच्या राजकीय परिस्थितीशी जुळवण्याचा प्रयत्न केला असता, राष्ट्रवादीकडून उमेश पाटील व भाजपकडून संग्राम देशमुख यांचीच लढत होण्याची शक्‍यता अधिक आहे. मनसेने व संभाजी ब्रिगेडने उमेदवारी जाहीर केली असले तरी मुख्य लढत ही महाविकास आघाडी व भाजपमध्येच होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे आघाडीच्या उमेदवाराबाबत मतदारांमध्ये उत्सुकता आहे.

आज किंवा उद्या महाविकास आघाडीची बैठक होण्याची शक्‍यता आहे. कदाचित औरंगाबाद पदवीधरची उमेदवारी पहिल्यांदा जाहीर करून उर्वरीत शिक्षक व पदवीधर संदर्भात जागा वाटप जाहीर केले जाईल. बंडखोरीची शक्‍यता टाळण्यासाठी थेट अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीची उमेदवारी जाहीर होण्याची शक्‍यता आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com