.. म्हणून पुण्याचे पोलिस आयुक्त के. व्यंकटेशम यांची बदली होणार नाही! - for these reasons Pune cp K venkatesham may not transferred | Politics Marathi News - Sarkarnama

.. म्हणून पुण्याचे पोलिस आयुक्त के. व्यंकटेशम यांची बदली होणार नाही!

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 2 सप्टेंबर 2020

राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना अखेर मुहूर्त 

पुणे : पुण्याचे पोलिस आयुक्त के. व्यंकटेशम यांची बदली महाआघाडी सरकार निश्चितपणे करणार अशी चर्चा होती. मात्र सध्याच्या बदल्यांच्या हंगामामध्ये त्यांची बदली काही दिवसांपुरती टळली आहे. व्यंकटेशम यांच्यासह ठाण्याचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांची तीन महिन्यांनंतर पोलिस महासंचालकपदी पदोन्नती असल्याने त्यानंतर त्यांना नव्या ठिकाणी नियुक्ती देण्यात येणार आहे. 

पुण्यात पोलिस आयुक्तपदी अमिताभ गुप्ता यांच्या नावाची चर्चा होती. याच गुप्ता यांनी कोरोना लाॅकडाऊनच्या काळात डीएचएफएल घोटाळ्यातील वाधवान बंधूंना महाबळेश्वर येथे जाण्यासाठीचे पत्र पोलिसांना दिले होते. त्यावरून मोठा वाद झाला होता. पण सध्या तरी त्यांना आता मुंबईतच राहावे लागेल, असे दिसते.

व्यंकटेशम यांच्याकाळात पुण्यातील शहरी नक्षलवादाच्या तपासाचा मुद्दा गाजला होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोरेगाव भिमा आणि एल्गार परिषदेच्या तपासावरून पुणे पोलिसांना लक्ष्य केले होते. तसेच चौकशीचीही मागणी केली होती. त्याच वेळी के. व्यंकटेशम यांची बदली होईल, अशी चर्चा होती. मात्र तसे झाली नाही. त्यानंतर पुणे पोलिसांच्या या तपासाला केंद्रीय गृहमंत्रालयाने उलट पारितोषिक दिले. पुण्यातही के. व्यंकटेशम यांनी विविध प्रयोग राबवून नागरिकांसाठी पोलिस दलातर्फे चांगली सेवा देण्यासाठी पुढाकार घेतला. 

राज्य सरकारतर्फे 45 वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा निर्णय आज घेण्यात आला. त्यातील काही बदल्यांची नावे पुढीलप्रमाणे

पुणे : पोलिस दलातील बहुचर्चित बदल्यांचा आदेश जारी झाला असून नाशिकचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील (कायदा व सुव्यवस्था) आणि मिलिंद भारंबे (गुन्हे) यांची मुंबईच्या सहआयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. विनयकुमार चौबे यांची अतिरिक्त पोलिस महासंचालक (लाचलुचपत प्रतिबंधक) येथे नियुक्ती झाली आहे.

पिंपरी-चिंचवडच्या पोलिस आयुक्तपदी कृष्णप्रकाश यांची नियुक्ती झाली आहे.  नाशिकच्या पोलिस आयुक्तपदी दीपक पांडे यांना संधी देण्यात आली आहे. मनोजकुमार लोहिया यांच्याकडे कोल्हापूर महानिरीक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रताप दिघावकर यांची नियुक्ती नाशिक परीक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक म्हणून झाली आहे. नाशिकचे महानिरीक्षक चेरिंग दोर्जे यांची तुरुंग महानिरीक्षक म्हणून बदली झाली आहे.    

नवी मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी बिपीनकुमारसिंह यांची नियुक्ती झाली आहे. अमरावतीच्या आयुक्तपदी नाशिकच्या अधीक्षक आरतीसिंह यांची नियुक्ती झाली आहे. मुंबईच्या गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कर्णिक यांची पश्चिम विभागाचे अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली झाली आहे. एकूण 45 जणांच्या बदल्यांच्या आदेशावर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी झाली आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख