या कारणांमुळे बारामती हा स्वतंत्र जिल्हा होणार नाही : जिल्हानिर्मितीच्या निव्वळ अफवा - For these reasons Baramati will not be an independent district | Politics Marathi News - Sarkarnama

या कारणांमुळे बारामती हा स्वतंत्र जिल्हा होणार नाही : जिल्हानिर्मितीच्या निव्वळ अफवा

मिलिंद संगई
शुक्रवार, 31 जुलै 2020

बारामती जिल्हा करण्याचा कोणताही प्रस्ताव सध्या ना शासनदरबारी आहे किंवा विद्यमान राज्यकर्त्यांचीही पुणे जिल्ह्यातून बारामती वेगळी व्हावी अशी अजिबात इच्छा नाही, असे स्पष्ट करण्यात आले.

बारामती : येत्या काळात बारामती जिल्हा होणार या बातम्या म्हणजे निव्वळ अफवा असल्याचे राज्याच्या उच्चपदस्थ नेत्याने स्पष्ट केले आहे. लवकरच पुणे जिल्ह्याचे विभाजन होऊन त्यातून बारामती जिल्हा होणार व त्यात इतर जिल्ह्यांतील काही तालुके समाविष्ट होणार या सोशल मिडियातील वृत्ताने खळबळ माजली आहे. मात्र ही अफवाच आहे.

बारामती जिल्हा करण्याचा कोणताही प्रस्ताव सध्या ना शासनदरबारी आहे किंवा विद्यमान राज्यकर्त्यांचीही पुणे जिल्ह्यातून बारामती वेगळी व्हावी अशी अजिबात इच्छा नाही, असे स्पष्ट करण्यात आले.

राजकीयदृष्टया बारामती ही पुणे जिल्ह्यात राहणेच सोयीचे असल्याने बारामती जिल्हानिर्मिती शक्यच नसल्याचे संबंधित नेत्याने नाव प्रसिध्द न करण्याच्या अटीवर स्पष्ट केले आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही बारामती जिल्ह्याला तीव्र विरोध असल्याने बारामती जिल्हा होण्याची शक्यताही धूसरच आहे.

बारामती तालुक्यासह शिरूर, भोर, वेल्हे, इंदापूर, दौंड, पुरंदर, फलटण, माळशिरस या तालुक्यांचा समावेश होणार असल्याची चर्चा वर्षानुवर्षे सुरू आहे.  बारामतीत त्यासाठीच्या सर्व पायाभूत सुविधा आहेत. अतिरिक्त पोलिस अधीक्षक कार्यालय, अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय, वैद्यकीय महाविद्यालय, मुख्य वीज अभियंता कार्यालय अशी कार्यालये आहेत. या कार्यालयांचे नामकरण अतिरिक्त ऐवजी जिल्हा कार्यालय करावयाचे, इतकाच खर्च येथे करावा लागणार आहे. त्यामुळे बारामती हा जिल्हा होणार, अशा वावड्या अधुनमधून उठत असतात. ही वावडी पुन्हा एकदा उठल्याने काही तालुक्यांतून बारामतीत समावेश होण्यास विरोध असल्याची वक्तव्ये स्थानिक नेते करू लागले आहेत. प्रत्यक्षात असा कोणताच प्रस्ताव नसताना हा विरोधही लटकाच असल्याचे उघड आहे.  

पुणे स्मार्ट सिटी आहे. पुण्याचा नावलौकीक जगभर पसरलेला आहे. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड या दोन महापालिका आणि ग्रामीण भाग यांचा पुणे जिल्ह्यात समावेश आहे. येथून 21 आमदार आणि चार खासदार निवडून जातात. शरद पवार आणि अजित पवार यांचे लक्ष राज्यभर असले तरी पुण्यात त्यांचे विशेष लक्ष असते. राष्ट्रवादीसाठीही पुण जिल्हा ताब्यात ठेवणे हे राजकीयदृष्टया फायदेशीर आहे.  बारामती जिल्हा करुन राजकीयदृष्टया काहीच उपयोग नाही, उलट पुणे जिल्ह्यात जितके जास्त आमदार निवडून येतात, तितके राज्याची सत्ता मिळवताना त्याचा फायदा होतो. समजा बारामती हा जिल्हा झाला तर बारामतीच्या नेत्यांची  पुणे जिल्ह्यावर सत्ता का, असाही सवाल राजकीय विरोधक करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुण्याशी नाते तोडण्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मनात नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. 

पुणे जिल्हा ताब्यात असल्यानंतर राज्याच्या राजकारण फरक पडतो ही बाब विचारात घेता, पुणे जिल्ह्याचे विभाजन करुन बारामती जिल्हा करण्याच्या मनःस्थितीत स्वताः अजित पवारच नसल्याने असे काही घडणार नाही हे स्पष्ट आहे. जिल्ह्यात या संदर्भात विविध मतांतरे असली तरी जो पर्यंत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष सत्तेत आहे तो वर बारामती हा स्वतंत्र जिल्हा निर्मिती होणे शक्य नाही अशी आजची परिस्थिती आहे. बारामतीला जिल्ह्याच्या ठिकाणाप्रमाणे सर्व सोयी आहेत. याचा अर्थ बारामती हा स्वतंत्र जिल्हा होईल, अशी स्थिती बिलकूल नसल्याचे या नेत्याने स्पष्ट केले.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख