MPSC उत्तीर्ण होऊनही नोकरी नाही; स्वप्नील लोणकरची आत्महत्या  - Swapnil Lonakar commits suicide by hanging himself as he could not get a job even after passing the MPSC exam | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.
महाड तालुक्यातील तळीये गावातील 32 घरांवर दरड कोसळली | दरडीत घरांचे मोठे नुकसान | 72 लोक बेपत्ता झाल्याचा अंदाज| पोलिसांचे पथक घटना स्थळाकडे रवाना

MPSC उत्तीर्ण होऊनही नोकरी नाही; स्वप्नील लोणकरची आत्महत्या 

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 3 जुलै 2021

स्वप्नीलने केलेली आत्महत्या ही ठाकरे सरकारसाठी नामुष्की ठरणार आहे.

पुणे : सुमारे दीड वर्षांपूर्वी राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा (एमपीएससी) उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्याचा ताणतणाव एकीकडे आणि दुसरीकडे आर्थिक ओढाताण यामुळे स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करणाऱ्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना पुण्यातील फुरसुंगी येथील गंगानगरमध्ये २९ जून रोजी घडली आहे. परीक्षा उत्तीर्ण होऊन नोकरी मिळत नसल्याने स्वप्नीलने केलेली आत्महत्या ही ठाकरे सरकारसाठी नामुष्की ठरणार आहे. आता यापुढे तरी परीक्षा सुरळीतपणे होणार का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. (Swapnil Lonakar commits suicide by hanging himself as he could not get a job even after passing the MPSC exam)  

आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे स्वप्नील सुनील लोणकर (वय 24, रा.गंगानगर, फुरसुंगी) असे नाव आहे. स्वप्नील याचे वडील सुनील लोणकर यांचा पुण्यातील शनिवार पेठेत बिल बुक बनविण्याचा प्रिटींग प्रेसचा व्यवसाय आहे. स्वप्नीलचे आईवडिल दोघे जण मिळून प्रिटींग प्रेस व्यावसाय संभाळतात. स्वप्नील लोणकरचे स्थापत्य अभियांत्रिकीच्या पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले आहे. 

हेही वाचा : राष्ट्रवादीची सत्ता घालविणाऱ्या मोहिते-पाटील समर्थक झेडपी सदस्यांचा मंगळवारी फैसला

कोरोना महामारीमुळे राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा अनेकदा पुढे ढकलावी लागली आहे. त्यातून स्पर्धा परीक्षा अभ्यास तरुणांमध्ये तणाव वाढत आहे. एकीकडे परीक्षा होत नाहीत आणि दुसरीकडे खर्च कायम आहे, त्यामुळे स्पर्धा परीक्षा देणारे तरुण दुहेरी कात्रीत सापडले आहेत. पूर्व आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊन केवळ मुलाखत न झाल्याने नोकरी मिळू शकत नाही, या तणावातूनच स्वप्नील लोणकर याने आत्महत्या केली आहे.

बुधवारी (ता. २९ जून ) सकाळी कामानिमित्त स्वप्नीलचे आई-वडील नेहमीप्रमाणे  बाहेर पडले. दुपारी साडे चारच्या सुमास स्वप्नीलची बहिण घरी आली, तेव्हा तिला स्वप्नील दिसला नाही. त्यांच्या खोलीत गेली असता स्वप्नीलने गळफास घेतल्याचे तिला आढळून आले. याबाबतची माहिती तिने आई-वडीलांना तातडीने दिली. त्यानंतर स्वप्नील यास रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, डॉक्‍टरांनी त्यास मृत घोषीत केले. 

अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्वप्नील लोणकर हा स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करत होता. राज्य लोकसेवा आयोगाची 2019 ची पूर्व आणि मुख्य परीक्षा स्वप्नील उत्तीर्ण झाला होता. मात्र, त्याची मुलाखत गेली दीड वर्षापासून झालेली नव्हती. याशिवाय स्वप्नील याने 2020 मध्येही राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली होती. ती पूर्व परिक्षाही स्वप्नील उत्तीर्ण झाला होता. मात्र, कोरोनामुळे मुख्य परिक्षा अद्याप झालेली नाही. या सगळ्या तणावातूनच त्याने आत्महत्या केल्याचे मृत्यूपुर्वीच्या चिठ्ठीत त्याने लिहून ठेवले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख