Sarkarnama Exclusive शरद पवारांच्या बैठकीत सुरेश धस यांना प्रवेश नाकारला - Suresh Dhas Denied Entry in Sharad Pawar Meeting at Pune | Politics Marathi News - Sarkarnama

Sarkarnama Exclusive शरद पवारांच्या बैठकीत सुरेश धस यांना प्रवेश नाकारला

महेश जगताप
मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत ऊस तोडणी कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटमध्ये बैठक सुरु आहे. ऊस तोडणी कामगारांमध्ये आपला प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे भाजपचे आमदार सुरेश धस यांना या बैठकीत प्रवेश नाकारण्यात आला. 

पुणे : ऊस तोडणी कामगारांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी बोलवण्यात आलेल्या बैठकीत आज नाट्यमय घडामोडी घडल्या. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत ऊस तोडणी कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटमध्ये बैठक सुरु आहे. ऊस तोडणी कामगारांमध्ये आपला प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे भाजपचे आमदार सुरेश धस यांना या बैठकीत प्रवेश नाकारण्यात आला. 

मजुरीच्या दरात वाढ करण्याच्या मागणीसाठी ऊस तोडणी कामगार संघटना साखर कारखानदारांशी वाटाघाटी करत आहेत. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह इतर संघटनांच्या प्रतिनिधींना बैठकीस बोलावण्यात आले आहे. सुरेश धस हे गेले काही दिवस आक्रमकपणे या मजुरांचे प्रश्न मांडत आहेत. तसेच तोडगा निघाल्याशिवाय मजुरांना साखर कारखान्यावर जाऊ नये, असे आवाहन ते करत होते. तसेच मजुरी दरात शंभर टक्क्यांहून अधिक वाढीची आक्रमक मागणी त्यांनी केली होती. 

त्यांच्या या मागणीमुळे पंकजा मुंडे यांच्याशी त्यांचे मतभेद झाल्याचे दिसून येत होते. ऊस तोडणी कामगारांमध्ये धस हे आपले नेतृत्व प्रस्थापित करण्याचे प्रयत्न करत असल्याचे लक्षात आल्यानंतर पंकजा मुंडे समर्थक त्यांच्यावर टीका करत होते. तसेच पंकजा व धस यांच्यातही आधीप्रमाणे सख्य नसल्याचे या निमित्ताने दिसून आले. शरद पवारांसोबत बैठक झाल्याशिवाय ऊस तोडायला जाऊ नका, असे आवाहन धस करत होते. मात्र, त्यांना बैठकीत प्रवेश नाकारल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे. 

तुमच्या घामाच्या, रक्ताच्या, कष्टाच्या मजुरीमध्ये वाढ जाहीर झाल्याशिवाय हा संप मिटणार नाही. मंगळवारी साखर संघ आणि मजुरांच्या संघटनांची बैठक खासदार शरद पवार यांच्या बरोबर होणार आहे. त्या बैठकीमध्ये निर्णय होणार असल्याने तोपर्यंत मजुरांनी गावीच थांबावे, कारखान्याकडे जाऊ नये असे आवाहन भाजप आमदार सुरेश धस यांनी गेल्या आठवड्यात केले होते.

धस यांनी शनिवारी आष्टीत पत्रकार परिषद घेतली होती.  ऊसतोडणी मजुरांच्या दरांमध्ये दीडशे टक्के वाढ मिळावी, मुकादमच्या कमिशनमध्ये साडेआठरा रुपयांवरुन ३७ रुपये वाढ द्यावी आणि वाहतूक ठेकेदारांना ५० टक्के वाढ मिळावी यासह कारखान्यांवर सार्वजनिक स्वच्छतागृह असावेत आदी मागण्या केल्या. साखर संघाने मंगळवारी पुणे येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी येथे सर्व संघटना व साखर संघ यांची खासदार शरद पवार यांच्या सोबत बैठक आयोजित केली आहे. गोरगरीब वंचित, शोषित ऊसतोड मजुरांच्या पोटापाण्याच्या हा प्रश्न महत्त्वाचा असून या बैठकीत निर्णय होणार असल्याने ऊसतोड मजुरांनी आपली जागा सोडू नये, असे धस यांनी म्हटले होते. 

कोयता बंद हा संप संपलेला नाही. दोन दिवस मजुरांनी कोणाच्याही दडपशाहीला बळी पडू नये. ऊसतोड मजुरांच्या गरिबीचा गैरफायदा घेऊन धाक दाखवून मजुरांना कारखान्याकडे घेऊन जायचा प्रयत्न करू नका, असा प्रयत्न कुणी वाहतूकदार ठेकेदार यांनी केल्यास त्यांचे वाहनाचे, मालमत्तेचे नुकसान झाल्यास तेच जबाबदार राहतील, असा इशाराही सुरेश धस यांनी दिला होता. 
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख