दगडफेकीनंतर पडळकर म्हणाले, गोळ्या घातल्या तरी मी गप्प बसणार नाही - Stone pelting on Gopichand Padalkar's car in Solapur | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.
महाड तालुक्यातील तळीये गावातील 32 घरांवर दरड कोसळली | दरडीत घरांचे मोठे नुकसान | 72 लोक बेपत्ता झाल्याचा अंदाज| पोलिसांचे पथक घटना स्थळाकडे रवाना

दगडफेकीनंतर पडळकर म्हणाले, गोळ्या घातल्या तरी मी गप्प बसणार नाही

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 30 जून 2021

बैठक संपल्यानंतर मी गाडीत बसून थोडे पुढे आल्यानंतर गाडीवर मोठे दगड टाकण्यात आले.

सोलापूर : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केलेले भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर सोलापुरातील मड्डी वस्ती परिसरात बुधवारी (ता. ३० जून) सायंकाळी दगडफेक झाली. यात घटनेत कोणालाही इजा झालेली नाही, असे पडळकर यांनी या घटनेनंतर मीडियाशी बोलताना सांगितले. (Stone pelting on Gopichand Padalkar's car in Solapur)

गोपीचंद पडळकर यांनी सोलापुरातील पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महाविकास आघाडीतील नेत्यांवर खालच्या पातळीवर टीका केली होती. त्यावरून त्यांच्या भाषेबद्दल नाराजी व्यक्त होत होती.

हेही वाचा  ः शिवसेना-राष्ट्रवादीसोबतच्या आघाडीच्या बैठकीला बच्चू कडूंची दांडी

ह्या दगडफेकीसंदर्भात बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले की, मी मंगळवारपासून सोलापूर जिल्ह्यात घोंगडी बैठका घेत आहे. आज सकाळपासून सोलापूर शहर आणि ग्रामीण भागात आम्ही घोंगडी बैठका घेत आहोत. दुपारी पत्रकार परिषद झाल्यानंतर आमची मड्डी वस्तीत बैठक होती. ती बैठक काही कारणामुळे सायंकाळी साडेसहा वाजता सुरू झाली. बैठक संपल्यानंतर मी गाडीत बसून थोडे पुढे आल्यानंतर गाडीवर मोठे दगड टाकण्यात आले. त्यानंतर ते सर्वजण पळून गेले आहेत. पवारांच्या नेतृत्वाखाली राज्यात कशा प्रकारे गुंडगिरी चालते, हे राज्याला माहिती आहे. यामध्ये कोणालातरी पुढे केले असेल. माझी येथे कोणीशी ओळख नाही आणि कोणीशी शत्रुत्वसुद्धा नाही. आम्ही लोकशाही मानतो, आम्ही सुसंस्कृत आहोत, अशा वावड्या उठवणाऱ्यांचा चेहरा या प्रकारामुळे पुढे आलेला आहे. माझ्या गाडीवर दगडफेक करून माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न असेल तर माझा आवाज असा बंद होणार नाही. उद्या गोळ्या जरी घातल्या तरी मी या विषयात मागे हटणार नाही.

पवारांवरील टीकेचा हा परिणाम आहे का, या प्रश्नावर पडळकर म्हणाले की पवारांचे बगलबच्चे सध्या टेन्शनमध्य आहेत. त्यांचा बुरखा फाटत आहे. मला दररोज शिवीगाळ आणि धमक्याचे मेसेज येत असतात. त्यांनी पन्नास वर्षे असेच राजकारण केले आहे. त्यांच्या पायाखालीची वाळू सरकू लागली आहे. या प्रकरणातही त्यांचे हस्ते परहस्ते फिल्डिंग लावली असणार, असा आरोप पडळकर यांनी केला.

बाळासाहेब थोरातांच्या कन्येवर टीका

‘‘महाराष्ट्रात दीडशे घराणी प्रचंड सुसंस्कृत आहेत. त्यांचा हा अतिसंस्कृतपणा महाराष्ट्राला मागील ७० वर्षांपासून लुटतोय. यांचे आजोबा, वडिल सगळे सुसंस्कृत आणि आम्ही मात्र असंस्कृत. आम्ही काही बोलायलो गेलो तर तो सुसंस्कृतपणा नाही. मी शिक्षकाचा मुलगा आहे, त्यामुळे सुसंस्कृतपणा काय असतो, हे मला शिकवू नका. काय बोलावं आणि काय बोलू नये, हे मला कळतं. मला जे तुमचं उघडं पाडायचं आहे, ते मी करतच राहणार,’’ अशा शब्दांत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कन्या शरयू देशमुख यांना भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी उत्तर दिले.  

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कन्या शरयू देशमुख यांनी ट्विटरवरुन गोपीचंद पडळकर यांच्यावर निशाणा साधला होता. ‘‘पात्रतेपेक्षा जास्त मिळाले की असं होतं. आपल्या भाषेवरुन आपल्या संस्काराची ओळख होती. असो, ज्याचे त्याचे संस्कार’’ असे म्हणत शरयू देशमुख यांनी पडळकर यांना टोला लगावला होता. त्यानंतर सोलापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत पडळकर यांनी देशमुखांच्या टीकेला उत्तर दिले.

पवारांवर हल्लाबोल

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसीसंदर्भात राज्य सरकारला डाटा सादर करण्यास सांगितले होते. मात्र, राज्य सरकारने ते केले नाही. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा डीएनए बहुजनविरोधी आहे.म्हणूनच काँग्रेसच्या नेत्याच्या मुलाने ओबीसीविरोधी याचिका दाखल केली आहे. त्याचबरोबर मी शरद पवार आणि अजित पवारांशी मुद्दयावरुन भांडतो, असेही पडळकर या वेळी म्हणाले.

महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून समाजासमाजामध्ये तेढ वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. मूठभर लोक बहुजनांचा आवाज दाबत आहेत. ओबीसींना दिलेले संविधानिक अधिकार हिसकावून घेण्याचे प्रयत्न करत आहेत. ओबीसींमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही पडळकर यांनी केला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख