राज्य सरकारने पन्नास हजार कोटींचे पॅकेज जाहीर करावे : फडणवीस यांची मागणी - State Government Should Declare Fifty Thousand Crore Package Demands Devendra Fadanavis | Politics Marathi News - Sarkarnama

राज्य सरकारने पन्नास हजार कोटींचे पॅकेज जाहीर करावे : फडणवीस यांची मागणी

उमेश घोंगडे 
शुक्रवार, 22 मे 2020

राज्य सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज राज्यभर आंदोलन करण्यात आले. कोरोनाचा मुकाबला करण्यास राज्य सरकार अपयशी ठरत आहे. शेतकरी अडचणीत आहे. त्यांना मदतीची गरज आहे. कोरोनाग्रस्ताला सरकारी रूग्णालयात खाटा उपलब्ध नाहीत असे विविध आरोप यावेळी करण्यात आले

पुणे : कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी राज्यातील शेतकरी व कोरोनाग्रस्तांसाठी मदत म्हणून राज्य सरकारने ५० हजार कोटी रूपयांचे पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

राज्य सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज राज्यभर आंदोलन करण्यात आले. कोरोनाचा मुकाबला करण्यास राज्य सरकार अपयशी ठरत आहे. शेतकरी अडचणीत आहे. त्यांना मदतीची गरज आहे. कोरोनाग्रस्ताला सरकारी रूग्णालयात खाटा उपलब्ध नाहीत. खासगी रूग्णालयात दाखल झाल्यास रूग्णांची अर्थिक लूट करण्यात येत आहे. सरकार मात्र काहीच न करता गप्प आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला.

राज्य सरकारने ठोस काहीच केले नाही

कोरोनाचा मुकाबला करताना राज्य सरकारने गेल्या साठ दिवसात ठोस असे काहीच केले नाही. राज्यात आणि मुंबईत रोजच रूग्णांची संख्या वाढत आहे. मुंबईतील स्थिती रोज भीषण बनत चालली आहे. मुंबईत बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये उभारण्यात आलेल्या रूग्णालयाची क्षमता एक हजार लोकांची आहे. मुंबईत वाढणाऱ्या रूग्णांची संख्या लक्षात घेता ही सुविधा अत्यंत अपुरी आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. 

राज्य सरकारने गेल्या दोन महिन्यात योग्य नियोजन केले असते तर राज्यात आजची भीषण परिस्थिती उदभवली नसती.मुबंई-पुण्यातले लोक एकिकडे भीतीग्रस्त आहेत. लोकांचे जीव जात आहेत. ग्रामीण भागात शेतकरी हवालदिल झाला आहे. पिके रानात पडून आहेत. शेतकऱ्यांचे हाल भीषण आहेत. त्यातच ग्रामीण भागातदेखील कोरोना पाय पसरू लागला आहे. एकूण ही सारी परिस्थिती राज्य सरकाला योगपरित्या हाताळता येत नसल्याचे गेल्या काही दिवसात स्पष्ट झाल्याचे फडणवीस यावेळी म्हणाले.

राज्याकडून पॅकेज नाही

छत्तीगडपासून कर्नाटकपर्यंतच्या सर्व राज्यांनी आपापल्या राज्यातील शेतकरी तसेच कारोनापिडीतांसाठी विशेष अर्थिक पॅकेज दिले आहे. या साऱ्या राज्यांचा विचार केल्यास महाराष्ट्र सर्वात प्रगतीपथावर असलेले राज्य आहे. मात्र, या क्षणापर्यंत राज्य सरकारने एक दमडीदेखील पॅकेजसाठी खर्च केली नाही. केंद्र सरकारने दिलेल्या मदतीशिवाय राज्यातील जनतेला काहीच मिळालेले नाही. स्वत: मदत करण्याऐवजी केंद्र सरकारकडून मदत मागण्यापलीकडे राज्य सरकार काहीही करीत नसल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.

दरम्यान, भाजपाच्या वतीने आज नागपूरसह, मुंबईतील मुख्यालय, पुणे, कोल्हापूरसह, आौरंगाबाद, नाशिक, जळगाव, सोलापूर आदीसह राज्यात सर्वत्र राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. फडणवीस यांनी नागपूरमधून तर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर येथून आंदोलनात भाग घेतला

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख