सरसंघचालकांच्या धनुष्यातून शिवसेनेचा राज्यपालांवर व भाजपवर तीर - Shivsena Targets Governor Bhagatsinh Koshyare and BJP | Politics Marathi News - Sarkarnama

सरसंघचालकांच्या धनुष्यातून शिवसेनेचा राज्यपालांवर व भाजपवर तीर

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020

दसऱ्याच्या दिवशी नागपूरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मेळाव्यात सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या भाषणाचा आधार घेत शिवसेनेने महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला आहे.

पुणे : दसऱ्याच्या दिवशी नागपूरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मेळाव्यात सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या भाषणाचा आधार घेत शिवसेनेने महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला आहे. भारतीय जनता पक्षाचे जे लोक मंदिरासाठी थाळ्या बडवत आहेत व छाती पिटत आहेत त्यांनी सरसंघचालकांकडून हिंदुत्वाचे धडे घ्यायला हवेत, असे शिवसेनेने आपले मुखपत्र 'सामना'मधील अग्रलेखातून भाजप आणि राज्यपाल कोश्यारी यांना अप्रत्यक्ष सुनावले आहे. 

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचेही या अग्रलेखात कौतुक करण्यात आले आहे. या दोन्ही मेळाव्यांतील भाषणांमधला हिंदुत्वाचा दुवा समान असल्याचा दावा या अग्रलेखात करण्यात आला आहे. "दसऱ्याच्या निमित्ताने दोन मेळावे गाजले. पहिला नागपूरचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वार्षिक विजयादशमी मेळावा, दुसरा अर्थातच मुंबईतील शिवसेनेचा दसरा मेळावा. कोरोनामुळे दोन्ही मेळावे बंद सभागृहांत झाले, पण मेळाव्यांच्या प्रमुख सूत्रधारांनी मांडलेले हिंदुत्वाबाबतचे विचार देशभर पोहोचले आहेत. दोन्ही व्यासपीठांवरील भाषणे म्हणजे सडेतोड तोफखानेच ठरले!,'' असे सामनाच्या अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे. 
 
''सरसंघचालक मोहन भागवत यांनी दसरा मेळाव्यात हिंदुत्वाची व्याख्या स्पष्ट करून सांगितली आहे. हिंदुत्व ही जणू आपलीच मक्तेदारी, जे भाजपबरोबर नाहीत ते हिंदू नाहीत अशा विपृत विचारसरणीपर्यंत काही ठेकेदार पोहोचले असतानाच सरसंघचालकांनी त्या ठेकेदारांचे दात नागपुरात घशात घातले आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल श्रीमान भगतसिंग कोश्यारी यांनी संघाची काळी टोपी घालून उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाचे धडे देण्याचा प्रयत्न करून पाहिला. मत्यास उद्धव ठाकरे यांनी खणखणीत उत्तर दिलेच, पण आता सरसंघचालकांनीही यावर खडे बोल सुनावले आहेत,'' असेही अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे. 

"शिवतीर्थावरील मेळाव्यात  मुख्यमंत्र्यांनी भाजपातील हिंदुत्वाच्या राजकीय ठेकेदारांना सुनावले आहे की, हिंदुत्व म्हणजे काय ते सरसंघचालकांकडून शिका. यावर पुढे जाऊन श्री. ठाकरे यांनी खडसावले आहे की, घंटा बडवणं, थाळ्या पिटणं हे आमचं हिंदुत्व नाही. त्याने काही होत नाही. मुंबईला पाकव्याप्त काश्मीरची उपमा देणाऱया नटीचा आदरसत्कार करणे हे काही आमच्या हिंदुत्वात बसत नाही. मुख्यमंत्री ठाकरे यांनी मारलेला हा टोला राजभवनाला अस्वस्थ करणारा आहे,'' असे म्हणत अग्रलेखातून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका करण्यात आली आहे. 

मुख्यमंत्री ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या भाषणात आधार घेत शिवसेनेने भाजपच्या हिंदुत्वाचीही खिल्ली उडवली आहे. "वीर सावरकरांचे गाईबाबतचे मत वेगळे होते. गाईला ते हिंदुत्वाचे प्रतीक मानायला तयार नव्हते. गाय हा एक उपयुक्त पशू किंवा प्राणी आहे एवढेच त्यांचे मत, पण भाजपातील हिंदुत्ववाद्यांनी गाईवरून हिंदू-मुसलमानांत दंगली भडकवल्या व राजकारण केले. ‘माय मरो आणि गाय जगो’ हे आमचे हिंदुत्व नाही. महाराष्ट्रात गोमाता आणि गोव्यात जाऊन खाता? हेच का तुमचे हिंदुत्व? असा टोकदार भालाच उद्धव ठाकरे यांनी भाजपला खुपसला आहे. भाजपशासित अनेक राज्यांत गाई कापल्या जातात व खाल्ल्या जातात हे वास्तव आहे. त्यामुळे भाजपचे गाईचे हिंदुत्व तकलादू आहे," अशी टीका या अग्रलेखाद्वारे करण्यात आली आहे. 

भाजपच्या मंदीरे खुली करण्यासाठी केलेल्या आंदोलनाचाही समाचार  या अग्रलेखातून घेण्यात आला आहे. "राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भाजपची मातृसंस्था आहे. त्यामुळे सरसंघचालक काय सांगतात ते अनेकदा दिशादर्शक ठरते. संघाचा हिंदू विचार कधीच लपून राहिला नाही. अयोध्येत राममंदिराचे भूमिपूजन झाले, त्या सोहळय़ास सरसंघचालक मोहन भागवत विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते. अयोध्येत राममंदिर व्हावे ही संघाची भूमिका होतीच, पण ‘कोरोना’ महामारीची पर्वा न करता सर्व मंदिरे खुली करा, असे श्री. भागवत कधीच सांगणार नाहीत. मंदिरांत गर्दी झाली तर महामारीचे संकट वाढेल असा विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवणाऱ्यांपैकी सरसंघचालक आहेत,'' असे या अग्रलेखाद्वारे सुनावण्यात आले आहे.
Edited By - Amit Golwalkar

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख