फूट नव्हे तर 'त्या' दोन्ही राजांच्या स्वभावाच्या ठिणग्या : शिवसेनेने सुनावले

उदयनराजे व संभाजीराजे हे छत्रपतींच्या गादींचे वारसदार आहेत व मराठा आरक्षणाच्या लढ्यात दोन्ही 'राजे' आघाडीवर आहेत. या दोन भूमिकांमुळे सातारा व कोल्हापूरकर घराण्यांत आरक्षणाबाबत वाद आहेत किंवा लढाईत फूट पडली आहे असे जे पसरवले जात आहे ते खरे नाही. या ज्यांच्या त्यांच्या स्वभावाच्या ठिणग्या आहेत, असे म्हणत शिवसेनेने दोन्ही राजांच्या भूमीकांचे समर्थन केले आहे.
Chatrapati Sambhaji Raje and Chatrapati Udayan Raje
Chatrapati Sambhaji Raje and Chatrapati Udayan Raje

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देता येत नसेल तर सगळ्याच समाजांचे आरक्षण रद्द करा, असे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी ठणकावले आहे. त्याच वेळी कोल्हापूरचे छत्रपती खासदार संभाजीराजे यांनी 'सातारकरां' पेक्षा वेगळी भूमिका घेतली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आड येणाऱ्यांना ठोकून काढा, असे संभाजीराजे यांनी साफ सांगितले आहे. उदयनराजे व संभाजीराजे हे छत्रपतींच्या गादींचे वारसदार आहेत व मराठा आरक्षणाच्या लढ्यात दोन्ही 'राजे' आघाडीवर आहेत. या दोन भूमिकांमुळे सातारा व कोल्हापूरकर घराण्यांत आरक्षणाबाबत वाद आहेत किंवा लढाईत फूट पडली आहे असे जे पसरवले जात आहे ते खरे नाही. या ज्यांच्या त्यांच्या स्वभावाच्या ठिणग्या आहेत, असे म्हणत शिवसेनेने दोन्ही राजांच्या भूमीकांचे समर्थन केले आहे.

सातारा तसेच कोल्हापूरच्या 'राजां' नी घेतलेल्या भूमिकांचा वेगळा अर्थ कोणी काढू नये. छत्रपती शिवरायांनी कष्ट व शौर्यातून निर्माण केलेले हे महाराष्ट्र राज्य जातीपातीच्या लढाईत फाटू नये याची काळजी सगळ्यांनीच घेतली पाहिजे. ''जातीला पोट असेल, पण पोटाला जात नसते'' हे शिवसेनाप्रमुखांचे अजरामर विधान आहे. त्याचाही अर्थ यानिमित्ताने समजून घेतला पाहिजे, असे शिवसेनेने 'सामना' या आपल्या मुखपत्रातील अग्रलेखात म्हटले आहे. 

''सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकले नाही. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिल्याने राज्य सरकारच्या सर्व मेहनतीवर पाणी पडले. राज्यातील विरोधी पक्षांचे लोक त्याचे खापर सध्याच्या सरकारवर फोडत असतील तर ते सकल मराठा समाजाशी द्रोह करीत आहेत. भाजप नेत्यांनी हा प्रश्न घेऊन पंतप्रधान मोदींचे मन वळवायला हवे. सध्या श्री. मोदी यांनी मनात आणले तर अशक्य ते शक्य होण्याचा कालखंड आहे, पण 'मराठा आरक्षणाची कोंडी फोडण्यासाठी वेळ द्या' असे पंतप्रधान मोदी यांना पत्र पाठवूनही वेळ मिळत नसेल तर राज्यातील भाजप पुढाऱ्यांना महाविकास आघाडीस दोष देण्याचा अधिकार नाही,'' असेही शिवसेनेने भाजपला सुनावले आहे. 

'छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जाती व बारा बलुतेदार अशा बहुजन समाजाला एकत्र केले. आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाजाने एकत्र येऊन लढा दिला पाहिजे, असे खासदार संभाजीराजे सांगत आहेत. महाराष्ट्र सरकारने जे केले ते सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले नाही. त्यामुळे समाजात निराशा आणि वैफल्य आले आहे व त्याच उद्विग्नतेतून सातारचे छत्रपती उदयनराजे यांनी सगळ्यांचेच आरक्षण रद्द करा, गुणवत्तेनुसार मेरिटवर सर्वांची निवड करा, अशी भूमिका घेतली. मराठा समाजाची आर्थिक स्थिती बरी नाही, मराठा समाजातील विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळूनही वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश नाही की नोकऱ्यांत प्राधान्य नाही. त्यामुळे मराठा समाजातील मुलांना नैराश्य येत असल्याचे खासदार उदयनराजे यांचे मत आहे,' असे या अग्रलेखात नोंदविण्यात आले आहे. 

'येथे एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. कोल्हापूर तसेच सातारच्या छत्रपतींनी आता घेतलेल्या भूमिका या मूळच्या शिवसेनेच्याच आहेत. हात जोडून न्याय मिळत नसेल तर हात सोडा, अन्याय करणाऱ्यांना ठोकून काढा असे संभाजीराजे म्हणतात. ही भूमिका शिवसेनेचीच आहे, पण याप्रश्नी याचे उत्तर मिळायला हवे. मराठा संघटनांच्या कार्यकर्त्यांनी बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर ढोल वाजविले ते कशासाठी? श्री. पवार हे स्वतः मराठा समाजाचेच प्रतिनिधी आहेत व फडणवीसांचे सरकार राज्यात असताना पवार मराठा मोर्चात सामील झाले होते,' असेही 'सामना'ने निदर्शनास आणून दिले आहे.

सातारा तसेच कोल्हापूरच्या 'राजां' नी घेतलेल्या भूमिकांचा वेगळा अर्थ कोणी काढू नये. छत्रपती शिवरायांनी कष्ट व शौर्यातून निर्माण केलेले हे महाराष्ट्र राज्य जातीपातीच्या लढाईत फाटू नये याची काळजी सगळय़ांनीच घेतली पाहिजे. 'जातीला पोट असेल, पण पोटाला जात नसते' हे शिवसेनाप्रमुखांचे अजरामर विधान आहे. त्याचाही अर्थ यानिमित्ताने समजून घेतला पाहिजे, अशी भूमीका शिवसेनेने घेतली आहे.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com