सेना उपनेते आढळराव यांच्याआधीच खासदार जाधव बार उडवून मोकळे झाले - shivsena MP Sanjay Jadhav targets NCP before Adhalrao patil | Politics Marathi News - Sarkarnama

सेना उपनेते आढळराव यांच्याआधीच खासदार जाधव बार उडवून मोकळे झाले

सरकारनामा ब्यूरो 
गुरुवार, 27 ऑगस्ट 2020

या दोन्ही पक्षांत स्थानिक पातळीवर अधिक समन्वय वाढविण्याची गरज 

पुणे : शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांतील स्थानिक नेत्यांतील रुसवेफुसवे समोर येऊ लागले आहे. शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय जाधव यांनी राष्ट्रवादीच्या दादागिरी विरोधात जाहीरपणे राजीनामा देण्याची घोषणा केली. त्यामुळे या दोन पक्षांत आलबेल नसल्याचे पुन्हा उघड झाले. पुणे जिल्ह्यातील शिरूर मतदारसंघातील माजी खासदार व शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी चार दिवसांपूर्वीच मलाही राष्ट्रवादीच्या विरोधात बोलायचे आहे, जरा थांबा, असे पत्रकारांना सांगितले होते. त्याच्या आधीच जाधव हे बार उडवून मोकळे झाले.

पारनेर येथील शिवसेनेचे नगरसेवक राष्ट्रवादीत घेण्याचा मुद्दा दोन महिन्यांपूर्वी गाजला होता. शिवसेनेने हा प्रतिष्ठेचा मुद्दा केल्यानंतर हे नगरसेवक घेत नसल्याचे राष्ट्रवादीला जाहीर करावे लागले. सिन्नरमध्येही असाच प्रकार घडला. अधुनमधुन स्थानिक पातळीवर राजकीय चकमकी या दोन पक्षांत सुरू असतात. अशीच खदखद आढळराव यांच्याही मनात होती. शिक्रापूर येथील शिवसेनेच्या ताब्यातील ग्रामपंचायीला राष्ट्रवादीची सत्ता असलेली पुणे जिल्हा परिषद निधी देत नसल्याची तक्रार आढळरावांनी केली होती. त्यावरून बरेच राजकारण झाले. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्या विरोधात आढळराव यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत कोल्हे यांच्यावर तोंडसुख घेण्यात आले. स्वतः आढळराव काही कोल्हेंच्या विरोधात बोलले नाहीत. पण त्यांच्या इतर समर्थकांनी कोल्हे यांना मतदारसंघात फिरूही न देण्याचा इशारा दिला.

आढळराव यांना राष्ट्रवादीच्या विरोधात खदखद व्यक्त करायची होती. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात चर्चा होणार होती. मात्र प्रताप जाधव यांनी थेट ठाकरे यांना पत्र पाठवून राजीनामा देण्याची तयारी दाखविल्याने त्याचा मोठाच गाजावाजा झाला. पारनेरमधील शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी यांनीही पक्षनेतृत्त्वाने राष्ट्रवादीची चाल ओळखावी, असा सल्ला दिला होता. त्यामुळे राष्ट्रवादीच्या विरोधात स्थानिक शिवसेना नेत्यांच्या तक्रारी पुढे येण्यास सुरवात तर झाली नाही ना, अशी शंका येत आहे. जिंतूर येथील बाजार समितीच्या प्रशासक मंडळाचा साधा मुद्दा राजकारणात चर्चेला आहे. 

राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या म्हणण्यानुसार संजय जाधव हे दबावाचे राजकारण करत आहेत. परभणीत महाआघाडीतील तीनही पक्षांत चांगला समन्वय आहे. परभणी जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीला पूर्ण बहुमत असताना शिवसेनेला तेथे सत्तेत वाटा दिला आहे. तसेच दुसऱ्या बाजार समितीवर शिवसेनेसे प्रशासक मंडळ नेमण्याचे ठरले आहे. असे असताना जाधव यांचे राजकारण हे भाजपला पोषक असल्याची टीका राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी केली. 

ही टीकाटिप्पणी पाहिल्यानंतर या दोन पक्षांतील स्थानिक नेत्यांत वारंवार समन्वय साधण्याची जबाबदारी राज्यातील नेत्यांना घ्यावी लागणार आहे. अन्यथा असे स्फोट वारंवार होण्याची शक्यता आहे. जाधव यांच्या पवित्र्यानंतर आता आढळराव पाटील हे राष्ट्रवादीच्या विरोधातील असंतोष व्यक्त करणार की शांत राहणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख