शिक्रापूरच्या 'क्रशसॅंड' कांडाची चौकशी आयपीएस ऐश्वर्या शर्मांकडे  - Shikrapur Sand exchange incident to be Probed by IPS officer | Politics Marathi News - Sarkarnama

शिक्रापूरच्या 'क्रशसॅंड' कांडाची चौकशी आयपीएस ऐश्वर्या शर्मांकडे 

भरत पचंगे
शुक्रवार, 31 जुलै 2020

शिक्रापूर पोलिस स्टेशनमध्ये जप्त करण्यात आलेल्या बेकायदा वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकमध्ये 'क्रशसॅंड' भरण्याचा व चुकीचा पंचनामा करण्याचा प्रकार उघडकीला आला आहे. त्यामुळे महसूल व पोलिस प्रशासनाचे धिंडवडे उडवले जात आहेत. पोलिस व महसूल विभाग एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचाही आरोप होत आहे.

शिक्रापूर : शिरुर तालुक्यातील शिक्रापूर येथील पोलिस ठाण्याच क्रशसॅंड बदलण्याच्या प्रकरणाची खात्यांतर्गत चौकशी सुरु झाली आहे. याबाबत जो कुणी जबाबदार अधिकारी वा कर्मचारी असेल त्यावर कठोर पोलिस कारवाई करणार आहोत, अशी माहिती उपविभागिय पोलिस अधिकारी ऐश्वर्या शर्मा यांनी दिली आहे. या संदर्भातले पोलिस टाण्यातले  सी.सी.टिव्ही फुटेजही तपासण्याचे काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.     

शिक्रापूर पोलिस स्टेशनमध्ये जप्त करण्यात आलेल्या बेकायदा वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकमध्ये 'क्रशसॅंड' भरण्याचा व चुकीचा पंचनामा करण्याचा प्रकार उघडकीला आला आहे. त्यामुळे महसूल व पोलिस प्रशासनाचे धिंडवडे उडवले जात आहेत. पोलिस व महसूल विभाग एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचाही आरोप होत आहे. 'सकाळ'ने या प्रकरणात आवाज उठवला आहे. त्यानंतर काल संबंधित  ट्रकचा फेरपंचनामा करण्यात आला.  पूर्वीच्या पंचनाम्यात तब्बल पाच ब्रास वाळू कमी दाखविल्याचे त्यात निष्पन्न झाल्याने या संपूर्ण प्रकरणाचे गांभिर्य वाढले. त्यामुळे दोन्ही खात्यांच्या संगनमताचा विषय ऐरणीवर आला आहे. दोन्ही खात्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. 

''या संपूर्ण प्रकाराचे गांभिर्य ओळखून सदर प्रकरणाची खात्यांतर्गत चौकशी आम्ही नुकतीच सुरू केली असून शिक्रापूर पोलिस स्टेशनमधील आवारातील गेल्या काही दिवसांचे सीसीटिव्ही फुटेज आम्ही मिळवले आहे.  त्या फुटेजमध्ये ज्यांनी पोलिस स्टेशनच्या आवारातील ट्रकमध्ये वाळू ऐवजी 'क्रशसॅंड' टाकण्याचा प्रकार केला आहे, त्यांचा शोध घेऊन सहभागी कर्मचारी-अधिकारी यांच्यावर खात्यांतर्गत कारवाई करणार आहोत," अशी माहिती उपविभागिय पोलिस अधिकारी ऐश्वर्या शर्मा यांनी दिली.

संबंधित ट्रक स्थानिक गुन्हे शाखेने पकडला असला तरी दंडात्मक कारवाई जास्त व्हावी म्हणून पोलिसांनी सदर ट्रक पंचनाम्यासाठी महसूल विभागकडे दिला होता. त्यानंतर चक्क पोलिस स्टेशनच्या आवारातच 'क्रशसॅंड' भरण्याचा प्रकार घडल्याने आम्ही तातडीने खात्यांतर्गत चौकशी सुरु केली असून दोषींवर कारवाई निश्चित होईल, असे त्यांनी सांगितले.  पोलिस स्टेशनमध्ये उभ्या असलेल्या ट्रकमध्ये बिनदिक्कतपणे क्रशसॅंड भरण्यामुळे पोलिस खात्याची इमेज खराब होत असल्याचेही त्यांनी मान्य केले. 

अधिका-यांमुळे आमचे बळी जाताहेत हो....!

वाळूचा पंचनामा करायला सांगितलेले तलाठी यांनी पहिला पंचनामा केला तर क्रशसॅंड टाकण्याचे काम शिक्रापूर पोलिस स्टेशनमधील कर्मचा-यांनीच केल्याचेही शिक्रापूर पोलिस खासगीत सांगत आहेत. हे काम त्या-त्या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनांशिवाय होणे अशक्य असल्याचेही बोलले जात आहे. या प्रकरणात दोन्ही विभागातील कर्मचाऱ्यांचा बळी जाणार अशी भिती तलाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर व्यक्त केली आहे. 

तिसरा पंचनामाही होणार?

वाळू मोजण्यात पहिली चुक महसूल विभागाच्या कर्मचा-यांची झाली तर दूसरी चुक सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांची झाली आहे. त्यामुळे याबाबत मुळ ट्रक मालकावर हा अन्याय होत असल्याचा युक्तीवाद शिरुर शहरात एका पक्षाच्या संघटना पातळीवर सध्या केला जात आहे.. याच पार्श्वभूमीवर याबाबत मुळ ट्रक मालकाच्या उपस्थितीत तिसरा पंचनामा करण्याच्या हालचाली सुरू आहेत, अशी माहिती शिरुर तहसिल कार्यालयातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. 

 

Edited By - Amit Golwalkar

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख