नारायण राणेंचे वक्तव्य हा राजकारणातील विनोद- शरद पवार

अमित शहा महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांच्या पायगुणाने महाविकास आघाडीचे सरकार जाईल असे वक्तव्य नारायण राणे यांनी केले होते. त्या बाबत आज बारामतीत शरद पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर पवार यांनी राणे यांच्या वक्तव्याला विनोदाची उपमा देत ते निकाली काढले.
Sharad Pawar _ Narayan Rane
Sharad Pawar _ Narayan Rane

बारामती : नारायण राणे हे आमचे जुने सहकारी आहेत पण ते विनोद करतात हे मला माहिती नव्हते. त्यांच़े कालचे वक्तव्य हा राजकारणातील विनोद आहे, या पेक्षा त्याला जास्त महत्व देण्याच कारण नाही, अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज नारायण राणे यांच्या वक्तव्याला आपण फार महत्व देत नाही हेच दाखवून दिले. 

अमित शहा महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांच्या पायगुणाने महाविकास आघाडीचे सरकार जाईल असे वक्तव्य नारायण राणे यांनी केले होते. त्या बाबत आज बारामतीत शरद पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर पवार यांनी राणे यांच्या वक्तव्याला विनोदाची उपमा देत ते निकाली काढले. 

कृषी कायद्याबाबत बोलताना पवार म्हणाले, ''अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना कृषी कायद्या संदर्भातील चर्चा 2003 मध्ये सुरु झाली, 2004 ते 2014 या काळात मी कृषीमंत्री होतो, माझ्या काळात या बाबतची चर्चा झाली होती, मात्र फरक असा आहे, घटनेतील तरतूदीनुसार शेती हा राज्यांचा विषय आहे, शेतीबाबतचा कायदा राज्याने करावा या साठी राज्यातील कृषीमंत्र्यांना बोलावून त्यांची मते मी घेतली व त्या बाबत अभ्यास करुन कायद्याचा मसूदा तयार करण्यासाठी या बाबतची समिती नेमली होती. या बाबतची जबाबदारी इंदापूरचे तत्कालिन मंत्री हर्षवर्धन पाटील व नऊ राज्यातील कृषीमंत्र्यांकडे दिली होती. त्या समितीने दिलेल्या शिफारसीनुसार मसूदा तयार झाला व तो पुन्हा राज्यातील कृषीमंत्र्यांकडे विचारार्थ पाठविला गेला. त्या नंतर नवीन सरकार आले,''

ते पुढे म्हणाले, "यात फरक असा आहे की नवीन सरकारने एकदम कायदाच तयार केला, तो संसदेत आणून गोंधळात मंजूर करुन घेतला. शेवटी कायदा करायचा असेल तर त्या बाबत चर्चा होणे अपेक्षित असते, जो विषय राज्याशी संबंधित आहे, तेथे राज्याला अधिक विश्वासात घ्यायला पाहिजे होते, पण मोदी सरकारने या बाबी दुर्लक्षित करुन थेट कायदाच आणला ही माझी मुख्य तक्रार आहे, असे शरद पवार म्हणाले. शेतीमध्ये जेथे सुधारणा करणे शक्य आहे, तेथे ती केली पाहिजे, शेतीत सुधारणा करण्याबद्दलची माझी अजिबात तक्रार नाही, काही गोष्टीबाबत नाराजी आहे, मात्र चर्चेतून यात मार्ग निघू शकतो,''

''ज्या वेळेस चार पाच राज्यातील शेतकरी सत्तर दिवस उन, पाऊस थंडी यांचा विचार न करता रस्त्यावर येऊन बसतात, त्या वेळेस सरकार संवेदनशील असले पाहिजे, स्वताः पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथसिंह किंवा नितीन गडकरी यांच्यासारख्या ज्येष्ठ मंत्र्यांनी यात चर्चा केली पाहिजे,'' अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.

पियुष गोयल हे मुंबईचे आहेत आमचे मित्रही आहेत, पण मला पियुष गोयल आणि शेती या बाबत फारस माहिती नाही, माझ्या ज्ञानात भर पडली की पियुष गोयल हे शेतीच्या विषयातील तज्ज्ञ आहेत, असा टोलाही पवारांनी लगावला. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन व शेतक-यांची अस्वस्थता विचारात घेतल्यानंतर वरिष्ठांनी यात अधिक गंभीरतेने लक्ष घालायला हवे होते, अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखवली. 

Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com