शरद पवारांच्या सासूरवाडीचा असाही दबदबा ! 

शरद पवार हे 1991 मध्ये सुप्रिया सुळे यांच्या लग्नाची पत्रिका घेऊन सासुरवाडीला आले होते. जाताना गाव पाणीपुरवठा योजना देऊन गेले.
Sharad Pawar help chaudharwadi which village of father-in-law
Sharad Pawar help chaudharwadi which village of father-in-law

सोमेश्वरनगर (पुणे) : चौधरवाडीत पंधरा वर्षांपूर्वीपर्यंत चांगल्या जमिनीत ज्वारी, तर माळाला कुसळे उगवायची. परंतु गावाने एकी केली आणि गावाच्या जावयाचे घर गाठले. जावयाने सहकारी पाणीपुरवठा योजनांची स्थापना करायला लावली आणि अजित पवारांमार्फत गावाला फारसा त्रास न होता तीन योजना कार्यान्वित केल्या. यामुळे शंभर टक्के जिराईत असणारे गाव आज साठ-सत्तर टक्के बागाईत झाले आहे. जिथे ज्वारीसुद्धा होत नव्हती, तिथे गेली 15 वर्ष ऊस पिकत आहे. 

चौधरवाडी (ता. बारामती) या गावचे जावई दस्तुरखुद्द माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हे आहेत. चौधरवाडी हे भारताचे कसोटीपटू (स्व.) सदू शिंदे यांचे गाव. त्यांच्या कन्या प्रतिभा शिंदे यांचा शरद पवार यांच्याशी 1 ऑगस्ट 1967 रोजी विवाह झाला. या शिंदे कुटुंबापैकी दोन कुटुंब चौधरवाडीत आजही राहत आहेत. मुख्यमंत्री असलेल्या पवारांकडे 1990 मध्ये लोक गेले आणि स्वतंत्र ग्रामपंचायतीची मागणी केली. त्यानंतर लगेचच चौधरवाडी ग्रामपंचायतीची निर्मिती झाली. 

शरद पवार हे 1991 मध्ये सुप्रिया सुळे यांच्या लग्नाची पत्रिका घेऊन सासुरवाडीला आले होते. जाताना गाव पाणीपुरवठा योजना देऊन गेले. अजित पवार यांनीही ग्रामसचिवालय, शाळा इमारत, ओढा खोलीकरण, जलसंधारण, संरक्षण भिंत अशी अनेक कामे देऊन साहेबांच्या सासरवाडीला जपले. ग्रामस्थांनीही पवार कुटुंबीयांना शक्‍यतो दरवेळी शंभर टक्के मतदान करून कर्तव्य निभावले. 

जमिनी आहेत पण पाणी नाही; म्हणून ग्रामस्थ 2005 मध्ये पवार यांना भेटले. पवारांनीही काही सूचना केल्या. अजित पवारांनी वीजकंपनी, पाटबंधारे अशा सगळ्या अधिकाऱ्यांची विशेष बैठक घेऊन त्वरीत अंमलबजावणी केली. पुणे जिल्हा बॅंकेचे धोरण बदलून पुरेसे कर्ज उपलब्ध करून एकाच वेळी तीन योजनांना परवानगी दिली. एक रूपया खर्च न करता आम्हाला विजेचे 19 खांब मिळाले, अशा शब्दांत सुरेश पवार यांनी ऋण व्यक्त केले. 

यादवराव शिंदे, तानाजी भापकर म्हणाले, "सध्या आमची अडीचशे ते तीनशे एकर जमीन भिजते आहे. त्या भिजण्यामुळे जे योजनेत नाहीत, त्यांच्याही शेतीला पाझरपाणी मिळते. गाव 70 टक्के बागाईत बनले आहे. अडीचशे एकर ऊस, कांदा, गहू, टोमॅटो, भाजीपाला पिकतो आहे.'' 

अजितने तुमचे पैसे भरलेत 

यशवंत ग्रामसमृद्धी योजनेसाठी दहा टक्के निधी लोकवर्गणीतून भरावा लागायचा. प्राथमिक शाळेच्या नव्या इमारतीसाठी दीड लाख रुपये लोकवर्गणी घेऊन चौधरवाडीकर शरद पवार यांच्याकडे गेले. त्यावर पवार म्हणाले, "अरे तुमचे पैसे अजितने भरले आहेत. आता आणलेले पैसे ग्रामसचिवालयासाठी भरा,' असे सांगितले. ग्रामस्थ एकदम भारावूनच गेले आणि आणलेले पैसे ग्रामसचिवालयासाठी भरले. 

भाऊबिजेचा अनोखा रंग 

शक्‍यतो दरवर्षी भाऊबिजेची साडीचोळी घेऊन चौधरवाडीचे ज्येष्ठ पवारसाहेबांच्या मुंबई अथवा गोविंद बागेतील घरी जातात. प्रतिभाताईंकडून थेट बंगल्यात प्रवेश मिळतो. शरद पवार यांनी मंदिराला सभामंडप दिला होता. त्यानंतर एका भाऊबिजेला प्रतिभाताई म्हणाल्या, "झालं का रे मंदिर तुझं?' त्यावर आम्ही "पाडव्याला गावफंडाचे पैसे आल्यावर रंग दिला की पूर्ण होईल,' असे सांगितले. त्यावर ताईंनी, "अप्पा माझ्या खात्यावरली रक्कम वापरा आणि रंगकाम पूर्ण करा,' असे भगीरथ पवार यांना सांगितले, अशी आठवण ज्येष्ठ ग्रामस्थ पोपटराव पवार यांनी सांगितली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com