परिचारकांनी दंड थोपटले अन्‌ भालकेंचा २०१९ चा, तर पंतांनी पवारांसमोर ठोकलेला शड्डू पुन्हा घुमला!  - Shaddu knocking by MLA Prashant Paricharak discussed again in Pandharpur | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

परिचारकांनी दंड थोपटले अन्‌ भालकेंचा २०१९ चा, तर पंतांनी पवारांसमोर ठोकलेला शड्डू पुन्हा घुमला! 

भारत नागणे  
सोमवार, 3 मे 2021

शड्डू ठोकण्याला पंढरपूरच्या राजकारणात इतिहास आहे. तो अगदी मुंबईपर्यंत गाजला आहे.  

पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीच्या निकालानंतर भाजपचे विजयी उमेदवार समाधान आवताडे आणि आमदार प्रशांत परिचारक यांनी पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर उत्साही कार्यकर्त्यांनी आवाहन करताच आमदार प्रशांत परिचारक यांनी दंड थोपटले आणि  २०१९ च्या निवडणुकीतील विजयानंतर आमदार भारत भालके यांनी याच शिवाजी चौकात ठोकलेला शड्डू पुन्हा एकदा चर्चेत आला. तत्पूर्वी आमदार सुधाकरपंत परिचारक यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासमोर मुंबईत जाऊन ठोकलेल्या शड्डूच्या आठवणीही ताज्या झाल्या. 

आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनामुळे लागलेल्या पोटनिवडणुकीचा निकाल रविवारी (ता. २ मे ) जाहीर झाला. त्यात भाजपचे आवताडे यांनी भारतनानांचे चिरंजीव भगिरथ यांचा अटीतटीच्या लढतीत ३७१६ मतांनी पराभव केला. विजयानंतर आवताडे, परिचारक हे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी शिवाजी चौकात आले होते. अभिवादनानंतर काही उत्साही कार्यकर्त्यांनी दंड थोपटा, अशी आमदार परिचारकांना साद घातली. त्यानंतर परिचारकांनीही उपस्थित कार्यकर्त्यांकडे पाहात दंड थोपटले.

भारत भालके यांनी २०१९ च्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर थोपटलेल्या दंडाचा बदला म्हणून प्रशांत परिचारक यांनीही रविवारी (ता. २ मे) दंड थोपटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. पण, शड्डू ठोकण्याला पंढरपूरच्या राजकारणात इतिहास आहे. तो अगदी मुंबईपर्यंत गाजला आहे.  

काय आहे दंड थोपटण्यामागची राजकीय पार्श्वभूमी

माजी आमदार औदुंबर पाटील यांचे पुत्र राजाभाऊ पाटील यांनी 1995 च्या निवडणुकीत बंडखोरी करत काँग्रेसचे उमेदवार सुधाकर परिचारक यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्यावेळी औदुंबर पाटील हे सोलापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते. एकीकडे मुलाची बंडखोरी, तर दुसरीकडे पक्षशिस्त अशा कात्रीत ते अडकले होते. परंतु राजकीय तत्वनिष्ठ आणि शरद पवार यांच्यावर एकनिष्ठ प्रेम करणाऱ्या औदुंबरअण्णांनी पक्षनिष्ठा म्हणून स्वतःच्या मुलाविरोधात काँग्रेसचे उमेदवार सुधाकर परिचारक यांचा प्रचार केला होता. त्यावेळी परिचारकांना निवडून आणण्यात औदुंबर पाटील यांचा मोठा वाटा होता, तरीही परिचारकांनी त्यांच्यावर पुत्रप्रेमाचा आरोप केला होता. 

तुमच्या राजाभाऊला पाडून आलोय

विधानसभेच्या १९९५ च्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवार सुधाकर परिचारक हे ज्येष्ठ नेते शरद पवारांना भेटण्यासाठी मुंबईला गेले होते. त्यावेळी सुधाकर परिचारकांनी शरद पवार यांच्यासमोर शड्डू मारत ‘तुमच्या राजाभाऊला पाडून आलोय,’ अशी खोचक टिप्पणी केली होती. त्यांची ही खोचक टिप्पणी औदुंबर पाटलांसह त्यांच्या कार्यकर्त्यांना असह्य झाली होती. तेव्हापासून 2019 पर्यंत पाटील विरुध्द परिचारक या दोन गटांत निवडणुका झाल्या. 

भालकेंनी काढला वचपा

विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीत थेट सुधाकर परिचारक विरुध्द (कै.) औदुंबरअण्णा पाटील यांचे शिष्य भारत भालके यांच्यात लढत झाली. या लढतीमध्ये भारत भालके यांनी सुधाकर परिचारकांचा धक्कादायक पराभव केला. त्यानंतर 25 वर्षांपूर्वी पवारांसमोर श़ड्डू ठोकणाऱ्या परिचारकांचा पराभव केल्यानंतर भारत भालकेंनी शिवाजी चौकात दंड थोपटून 25 वर्षापूर्वींचा वचपा काढला होता. 

परिचारकांनी बदला घेतला

आमदार भारत भालकेंच्या निधनानंतर पोटनिवडणूक झाली, त्याचा रविवारी निकालही लागला. या वेळी मात्र परिचारकांनी भालकेंचा राजकीय बदला घेण्यासाठी समाधान आवताडे यांना पाठिंबा दिला. अटीतटीच्या या लढतीमध्ये अवताडे यांनी (कै.) भारत भालके यांचे पुत्र भगिरथ भालके यांचा पराभव केला. भारत भालके यांनी मागील दीड वर्षापूर्वी थोपटलेल्या दंडाचा बदला म्हणून काल आमदार प्रशांत परिचारकांनाही भालके यांच्या विरोधात दंड थोपटून मागील राजकारणाचा वचपा काढला, अशी चर्चा पंढरपूरच्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख