पुण्यातील सांडपाण्यातही कोरोनाचे विषाणू - Scientists at NCL has found corona virus in sewage water in Pune | Politics Marathi News - Sarkarnama

पुण्यातील सांडपाण्यातही कोरोनाचे विषाणू

वृत्तसंस्था
मंगळवार, 8 जून 2021

राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेतील (NCL) शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासात ही बाब पुढे आली आहे.

पुणे : महाराष्ट्रातील पहिला कोरोना (Covid-19) रुग्ण पुण्यात आढळल्यानंतर पहिल्या लाटेसह दुसऱ्या लाटेतही देशात पुणे शहर हॅाटस्पॅाट (Pune Hotspot) ठरले. पण दोन्हीवेळी लाटेच्या तीव्रतेचा अंदाज प्रशासनाला आला नाही. संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात असतानाच आता पुण्यातील सांडपाण्यातही कोरोना विषाणूचे अंश आढळून आले आहेत. (Scientists at NCL has found corona virus in sewage water in Pune)

राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेतील (NCL) शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासात ही बाब पुढे आली आहे. या अभ्यासात पुणे महापालिकेचाही सहभाग होता. पुण्यातील विविध ठिकाणांहून गोळा करण्यात आलेल्या सांडपाण्यामध्ये विषाणू आढळून आले आहेत. प्रायोगिक तत्वावर डिसेंबर 2020 पासून हा अभ्यास केला जात आहे. यापुढेही हा अभ्यास सुरू राहणार असून तिसऱ्या लाटेचा अंदाज बांधण्यासाठी त्याचा उपयोग होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

हेही वाचा : पंतप्रधान मोदी मुख्यमंत्री ठाकरेंचं ऐकणार का? दिल्लीतील भेटीकडं महाराष्ट्राचं लक्ष

अभ्यासासाठी महापालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांसह नदीत जाणारे सांडपाणी तसेच NCL मधील सांडपाणी प्रकल्पांमधील नमूने घेण्यात आले होते. डिसेंबर 2020 पासून सांडपाण्याचे 23 नमूने गोळ्या करण्यात आले. त्यापैकी 17 नमूने ड्रेनेजमधून नदीत जाणाऱ्या पाण्याचे होते. RT-qPCR पध्दतीने पाण्यातील कोरोना विषाणूंचा अभ्यास करण्यात आला. 

'पथदर्शी अभ्यासाचा भाग म्हणून आम्ही सांडपाण्याच्या नमुन्यांमध्ये कोविड आरएनएचे अस्तित्व शोधण्यात सक्षम आहोत,' असे NCL मधील शास्त्रज्ञ डॅा. महेश धारणे यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना सांगितले. या अभ्यासाचे सादरीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर करण्यात आले आहे. लवकरच सविस्तर अहवाल महापालिकेला दिला जाईल. 

महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पोलिओवरील नियंत्रणासाठी कोरोना महामारीच्या आधीपासून हा अभ्यास सुरू असल्याचे सांगितले. विषाणूची सार्वजनिक ठिकाणांमधील पाण्यातील स्थिती जाणून घेण्यासाठी NCL च्या मदतीने हा पथदर्शी अभ्यास हाती घेण्यात आला. यातून मिळालेले निष्कर्ष उत्सुकता वाढवणारे असून आम्ही सविस्तर प्रस्तावाची वाट बघत असल्याचे कुमार यांनी इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना सांगितले.

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख