संजय काकडे व उषा काकडे यांना अटक; जामीनावर सुटका  - Sanjay Kakade Along with Wife Arrested Later released on Bail | Politics Marathi News - Sarkarnama

संजय काकडे व उषा काकडे यांना अटक; जामीनावर सुटका 

सनिल गाडेकर
गुरुवार, 5 नोव्हेंबर 2020

आपल्या मेव्हण्याला गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिल्या प्रकरणात भाजपशी संलग्न असलेले माजी खासदार संजय काकडे व त्यांच्या पत्नी उषा काकडे यांना आज सकाळी चतु:श्रृंगी पोलिसांनी अटक केली. या दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.

पुणे  : आपल्या मेव्हण्याला गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिल्या प्रकरणात भाजपशी संलग्न असलेले माजी खासदार संजय काकडे व त्यांच्या पत्नी उषा काकडे यांना आज सकाळी चतु:श्रृंगी पोलिसांनी अटक केली. या दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. संजय काकडे व उषा काकडे यांच्या विरोधात आज पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले आहे.

आपल्याला गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी युवराज ढमाले (वय ४०) यांनी आपले मेव्हणे संजय काकडे व त्यांच्या पत्नी उषा यांच्या विरोधात चतुःश्रुंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ढमाले हे बांधकाम व्यावसायिक आहेत. संजय काकडे आणि फिर्यादी यांच्यामध्ये सुरुवातीला भागीदारीत व्यवसाय होता. मात्र त्यांच्यात मतभेद निर्माण झाल्यामुळे २०१० पासून दोघे वेगळे झाले. ढमाले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ऑगस्ट २०१८ मध्ये फिर्यादी संजय काकडे यांच्या घरी गेले असता काकडे यांनी त्याला तुला संपवायला वेळ लागणार नाही, तू पैशाचा माज येऊ देऊ नकोस, तुला आणि तुझ्या कुटुंबाला सुपारी देऊन संपवेल, अशा शब्दात धमकी दिली होती.

चतुःश्रुंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शेवाळे यांनी आज सकाळी काकडे दाम्पत्याला अटक करून पोलिस बंदोबस्तात न्यायालयात हजर केले. त्याचबरोबर ढमाले यांनी फिर्याद दिल्यानुसार दाखल असलेल्या गुन्ह्याचे दोषारोपपत्र ही शेवाळे यांनी न्यायालयात सादर केले. अटक आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात यावी, अशी विनंती रिमांड रिपोर्टमध्ये करण्यात आली होती. मात्र बचाव पक्षाच्या युक्तिवादानंतर दोघांनाही १५ 5 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. 

न्यायालयाच्या परवानगीशिवाय देश सोडून जायचे नाही,  पोलिस बोलवतील तेव्हा पोलिस ठाण्यात हजर व्हायचे, तपासात पोलिसांना सहकार्य करायचे, साक्षीदारांवर कोणत्याही प्रकारचा दबाव आणायचा नाही,  पत्ता व ओळखपत्र ही कागदपत्रे न्यायालयात सादर करायची, अशा अटी त्यांना घालण्यात आल्या आहेत. 

दरम्यान, ''हा कौटुंबिक वाद असून. दोन वर्षांपूर्वी धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने आता केला आहे. या दोन वर्षात फिर्यादीबरोबर माझं व पत्नीचं साधं बोलणं देखील झालेलं नसताना मग आत्ताच हे आरोप का केले याचं आश्चर्य वाटत आहे. आता  याची न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. आम्ही न्यायालयाची प्रक्रिया पाळत आहोत." अशी प्रतिक्रिया संजय काकडे यांनी दिली. 
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख