'या' कारखान्याने ठरवले कै. डाॅ. पतंगराव कदमांना अक्रियाशील सभासद - Sangli Sugar Factory Declared Dr. Patangrao Kadam Non Active Member | Politics Marathi News - Sarkarnama

'या' कारखान्याने ठरवले कै. डाॅ. पतंगराव कदमांना अक्रियाशील सभासद

संपत मोरे
रविवार, 2 ऑगस्ट 2020

डॉ पतंगराव कदम यांच्या नावाचा अक्रियाशील सभासद समावेश असलेली यादी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्याकडून चीड व्यक्त केली जात आहे.

पुणे : रेठरे येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाने माजी मंत्री दिवंगत नेते डॉ पतंगराव कदम यांच्या नावाचा समावेश अक्रियाशील सभासदांच्या यादीत केल्याने एकच खळबळ उडाली आहे. डॉ पतंगराव कदम यांच्या नावाचा अक्रियाशील सभासद समावेश असलेली यादी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्याकडून चीड व्यक्त केली जात आहे.

२०१५ साली कृष्णा कारखान्यात सत्तांतर झाले या सत्तांतरानंतर सत्तेत आलेल्या संचालकांनी घाटावरच्या (कडेगाव आणि खानापूर) तालुक्यातील ऊस आणायला टोळ्या देणे कमी केले. हा परिसर डॉ पतंगराव कदम यांच्या प्रभावक्षेत्रातील असल्यानेच टोळ्या देत नसल्याचा आरोप ऊस उत्पादक करत आहेत. नंतर काही दिवसांनी ऊस न पाठवलेल्या ६३६८ सभासदांना अक्रियाशील सभासद ठरवण्यासंदर्भात नोटिसा पाठवल्या जाऊ लागल्या. ऊस उत्पादक शेतकरी कारखान्याकडे ऊस न्या म्हणून येरझाऱ्या घालत होते मात्र टोळ्या मिळत नव्हत्या. त्याचवेळी ऊस पाठवत नाही म्हणून नोटिसा मिळत होत्या. सभासद अशा दुहेरी कात्रीत सापडला होता. कारखान्याचे व्यवस्थापन सभासदांशी दुटप्पी वागत होते."असे वांगीचे सरपंच आणि ऊस उत्पादक विजय होनमाने यांनी सांगितले.

कारखाना व्यवस्थापनाने डॉ पतंगराव कदम, कारखान्याचे संस्थापक नीलकंठराव कल्याणी यांची सून सुलोचना कल्याणी यांची नावे अक्रियाशील यादीत समावेश केल्यामुळे कारखान्याचे विद्यमान संचालक सुभाष पाटील यांनी चीड व्यक्त केली आहे. त्यांनी एक पत्रक प्रसिद्ध करून काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

"कारखान्याने एवढ्या सभासदांना अक्रियाशील ठरवले पण मंत्रिमंडळाने त्यांना आता क्रियाशील ठरवले आहे. याबाबत कारखान्याचे अध्यक्ष सुरेश भोसले यांचे काय मत आहे? सभासदांना जर अक्रियाशील ठरवल्याचा नोटिसा पाठवल्या तशाच नोटिसा आता ते क्रियाशील झाले म्हणून पाठवतील का?सभासदांना मतदानापासून वंचित ठरवण्याचा प्रयत्न नव्हता असे आता काही लोक म्हणत आहेत तर मग नोटिसा का पाठवल्या?कारखान्याचा वेळ आणि पैसा का वाया घालवला?" असा सवाल सुभाष पाटील यांनी विचारला आहे.

"संस्थापक पॅनेलने सभासदांना क्रियाशील ठरवण्यासाठी  प्रयत्न केला."असेही पाटील यांनी म्हटले आहे. आम्ही ऊस न्या म्हणून कारखान्याच्या मागे लागलो होतो मात्र आमचा ऊस नेला नाही.यात आमची काय चूक?"असा सवाल पांडुरंग  पाटील  यांनी विचारला आहे.
Edited By - Amit Golwalkar

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख