राष्ट्रवादीच्या आमदारकीच्या आॅफरबद्दल राजू शेट्टी म्हणाले.... - Raju Shetty Statement about Governor Nominated MLA Post | Politics Marathi News - Sarkarnama

राष्ट्रवादीच्या आमदारकीच्या आॅफरबद्दल राजू शेट्टी म्हणाले....

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 28 ऑक्टोबर 2020

आमदारकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने मला दिलेल्या आॅफरबाबत माझ्या वक्तव्याची विपर्यास्त बातमी एका वाहिनीने केली. राज्यपालांना नावे पाठविणे हा मंत्रिमंडळाचा निर्णय असे म्हणालो असताना व जूननंतर यासंदर्भात कुणालाही भेटलो नाही, असे बोललो असताना या वाहिनीने चुकीची बातमी प्रसिध्द केली आहे, असे ट्वीट राजू शेट्टी यांनी केले आहे.  

पुणे : आमदारकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने मला दिलेल्या आॅफरबाबत माझ्या वक्तव्याची विपर्यास्त बातमी एका वाहिनीने केली. राज्यपालांना नावे पाठविणे हा मंत्रिमंडळाचा निर्णय असे म्हणालो असताना व जूननंतर यासंदर्भात कुणालाही भेटलो नाही, असे बोललो असताना या वाहिनीने चुकीची बातमी प्रसिध्द केली आहे, असे ट्वीट राजू शेट्टी यांनी केले आहे.  

राजू शेट्टी हे शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या मुद्द्यावर एनडीए सोडून गेले. काही दिवसांपूर्वी राजू शेट्टी यांनी बारामतीमध्ये शरद पवार यांची भेट घेतली होती. दूध दरवाढीसाठी बारामतीत मोर्चा साधणाऱ्या राजू शेट्टी यांनी जून महिन्यात बारामती येथेगोविंदबागेत शरद पवारांची भेट घेतली होती. 

राज्यपाल नियुक्त आमदारांच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या नावाचा विचार केला होता. स्वत: पक्षाध्यक्ष शरद पवार हे राजू शेट्टी यांच्या नावासाठी आग्रही असल्याचे सांगण्यात आल होते.. शेट्टींसारखा शेतकरी नेता सभागृहात पाहिजे, अशी त्यांची भुमिका असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी शरद पवारांचे म्हणणे जून महिन्यात राजू शेट्टींच्या घरी जावून त्यांच्यापर्यंत पोहचवले होते. राजू शेट्टी हे स्वत: आमदारकी स्वीकारणार असतील तर राष्ट्रवादी आपल्या कोट्यातील एक जागा द्यायला तयार आहे, असे त्यांना सांगण्यात आले होते.  

यावर एका वृत्तवाहिनीने आपणाला विचारले असता राज्यपालांना नावे पाठविणे हा मंत्रिमंडळाचा निर्णय आहे व जून महिन्यानंतर मी कुणाला भेटलेलो नाही, असे आपण या वाहिनीला सांगितले होते. मात्र, या वाहिनीने माझ्या बोलण्याचा विपर्यास केला असे ट्वीट राजू शेट्टी यांनी केले आहे. 

राजू शेट्टी हे 2009 साली स्वपक्षाच्या बळावर खासदार झाले होते. 2014 ला गोपीनाथ मुंडे यांनी त्यांच्यापुढे महायुतीचा प्रस्ताव ठेवला. त्यानुसार शेट्टी 2014 ला भाजप - शिवसेना युतीसोबत गेले. पुन्हा ते खासदार झाले. पुढे विधानसभा निवडणुकीनंतर स्वाभिमानीला सत्तेत वाटा देण्याची वेळ आल्यानंतर तत्कालिन प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांना आमदार- मंत्री करण्यात आले. याचदरम्यान शेट्टी- खोत संघर्ष वाढला. खोत थेटपणे भाजपच्या सोयीची भुमिका घेवू लागल्याने शेट्टींना एनडीएतून बाहेर पडण्याशिवाय पर्याय राहिला नाही. त्यानंतर शेट्टींनी मोदी सरकारच्या विरोधात आघाडी उघडली. आक्रमक आंदोलने करून संघटना सक्रिय ठेवली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस- राष्ट्रवादीने शेट्टींना बरोबर घेतले. लोकसभेच्या दोन जागा शेट्टींच्या स्वाभिमानी पक्षाला सोडण्यात आल्या. मात्र त्या दोन्ही जागा पराभूत झाल्या. स्वत: शेट्टी हातकणंगल्यात हारले. तिथे कास्ट फॅक्टर निर्णायक राहिला. 

लोकसभा निवडणुकीनंतर सहा महिन्यांत विधानसभा निवडणूक झाली. त्यात काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीने स्वाभिमानी पक्षासाठी जागा सोडल्या, त्यातील फक्त एक जागा निवडून आली. या दोन्ही निवडणुकांत राजू शेट्टी हे आघाडीचे महत्वाचे नेते राहिले. त्यांना त्या दर्जाचा मान मिळत होता. या पार्श्वभुमीवर नव्या समीकरणानुसार शिवसेना-राष्ट्रवादी- काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये शेट्टी मंत्री होतील, अशी कार्यकर्त्यांना अपेक्षा होती. मात्र तसा प्रस्ताव शेट्टींकडे कुणी पाठवलाच नाही. प्रत्यक्ष सत्तेच्या प्रक्रियेने काँग्रेस- राष्ट्रवादीने राजू शेटटींना दुर्लक्षित ठेवले. याउपरही शेट्टींनी संयमाची भुमिका ठेवली होती.
Edited By - Amit Golwalkar

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख