स्टॅलिनने शेतकऱ्यांवर रणगाडे घातले; पण, मोदी शेतकऱ्यांसह पुढच्या पिढ्यांवरही रणगाडे चालवत आहेत!  - Raju Shetty criticizes Modi government over price hike of chemical fertilizers | Politics Marathi News - Sarkarnama

स्टॅलिनने शेतकऱ्यांवर रणगाडे घातले; पण, मोदी शेतकऱ्यांसह पुढच्या पिढ्यांवरही रणगाडे चालवत आहेत! 

संतोष शेंडकर
शनिवार, 15 मे 2021

कोरोना काळात जीव धोक्यात घालून देशाची अन्नधान्याची गरज भागविणाऱ्या आणि अर्थव्यवस्था सावरणाऱ्या शेतकऱ्याला केंद्र सरकारने खताच्या दरवाढीचे ‘बक्षीस’ दिले आहे.

सोमेश्वरनगर (जि. पुणे)  ः कोरोना काळात जीव धोक्यात घालून देशाची अन्नधान्याची गरज भागविणाऱ्या आणि अर्थव्यवस्था सावरणाऱ्या शेतकऱ्याला (farmer) केंद्र सरकारने खताच्या दरवाढीचे ‘बक्षीस’ दिले आहे. आजपर्यंत कधीही झाली नव्हती, अशी साठ टक्के दरवाढ करणाऱ्या सरकारची कृती स्टॅलिनसारखी (Stalin) आहे. स्टॅलिनने शेतकऱ्यांच्या अंगावर रणगाडे घातले होते. मोदी सरकारने (Modi government) तर शेतकरी आणि त्याच्या पुढच्या पिढ्यांवरही रणगाडे चालविले आहेत, अशी जळजळीत टीका माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी केली. (Raju Shetty criticizes Modi government over price hike of chemical fertilizers)   

केंद्र सरकारने खतांच्या दरात प्रचंड वाढ केली आहे. आजपर्यंतच्या इतिहासात दरवाढीची इतकी टक्केवारी कुठल्याही सरकारने गाठली नव्हती. डीएपीच्या (१८-४६-००) किमती ११८५ रूपयांहून १९०० रूपयांवर तर १०-२६-२६ च्या किंमती ११७५ रूपयांवरून १७७५ रूपयांवर गेल्या आहेत. याशिवाय पोटॅश, सुपर फॉस्फेटसह अन्य खतांच्याही दरात मोठी वाढ झाली आहे. ही दरवाढ साठ टक्क्यांच्या पुढे जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. 

हेही वाचा : बबनदादा, संजयमामा कोणाचेही समर्थक नाहीत, ते पवारांचीही दिशाभूल करत आहेत

याबाबत शेतकऱ्यांचे नेते राजू शेट्टी म्हणाले, मोदी सरकारने स्वामीनाथन आयोगाप्रमाणे उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देऊ असे गाजर दाखवले. नंतर उत्पन्न दुप्पट करण्याचे आमिष दाखविले. त्यावर कळस म्हणजे मागणी केलेली नसतानाही तीन कृषी विधेयके लादून शेतकऱ्यांना उद्योगपतींच्या दावणीला बांधले आहे. आता खतांची दरवाढ करून उरलीसुरली ताकदही संपवून टाकली आहे.

 
शेतकऱ्याची लंगोटी काढून केंद्रसरकारला काय मिळणार आहे? शेतकऱ्यांनी दिगंबर अवस्थेत शेती करावी, अशी पंतप्रधान मोदींची अपेक्षा आहे का? असा सवाल करून शेट्टी म्हणाले, देशाची अर्थव्यवस्था कोरोनाकाळात पूर्णपणे कोसळत असताना ज्या शेतीने अर्थव्यवस्था टिकवून ठेवली आणि कोरोना संकटाशी दोन हात करत रात्रंदिवस राबून जनतेची अन्नधान्याची गरज भागविली, त्याच शेतकऱ्याला हेच बक्षीस दिले का? या कृतीची तुलना स्टॅलिनशी करावीशी वाटते. या केंद्र सरकारच्या कृत्यांमुळे शेतकरी तर मरणारच पण त्याच्या पुढच्या पिढ्याही बरबाद होतील. त्यांच्यापाठोपाठ शेतमजुरांचाही रोजगार नष्ट होईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. 

निवडणूक डोळ्यासमोर ठेवून निर्णय लांबवला 

एप्रिलमध्येच खतांची दरवाढ करण्याचे सूतोवाच केले होते. दर किती वाढणार हेही जाहीर झाले होते. मात्र, पश्चिम बंगालसह चार राज्यांच्या निवडणुका असल्याने ती दरवाढ करणार नाही, असा शब्द सरकारने दिला. मात्र, निवडणुका होताच डिझेल वाढवून शेतकऱ्याचे कंबरडे मोडलेच. वर पुन्हा खतांची दरवाढ केली. आताचे दरवाढीचे आकडे आणि एप्रिलमध्ये जाहीर झालेले आकडे तेच आहेत. याचाच अर्थ केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मोदी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे, असा आरोपही राजू शेट्टी यांनी केला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख