भाजपच्या दुध आंदोलनाला त्यांच्या मित्र पक्षांचा हरताळ, राजू शेट्टींची टीका  - Raju Shetty criticizes BJP's milk agitation by his allies | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपच्या दुध आंदोलनाला त्यांच्या मित्र पक्षांचा हरताळ, राजू शेट्टींची टीका 

संपत मोरे
रविवार, 2 ऑगस्ट 2020

राजू शेटटी यांना विचारले असता ते म्हणाले की," मी स्वाभिमानी दुध संघाचा चेअरमन जरी असलो तरी पहिल्यांदा शेतकरी नेता आहे. 

पुणे: भाजप महायुतीने काल राज्यात दुध आंदोलन केले. या दुध आंदोलनास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेटटी यांच्या स्वाभिमानी दुध संघाने पाठिंबा देऊन भाजप नेत्यांनाच आव्हान दिले.

भाजपसह त्यांच्या घटकपक्षांनी राज्यात दुध आंदोलनांचे महाएल्गार पुकारल्यानंतर भाजपने सर्व दुध संघाना व दुध उत्पादक शेतकऱ्यांना एक दिवस दुध संकलन बंद करून पाठिंबा देण्याचे आवाहन केले. 

या आवाहनास प्रतिसाद देत संपुर्ण राज्यात फक्त राजू शेटटी यांच्या स्वाभिमानी दुध संघाने संपुर्ण दुध संकलन बंद ठेवून पाठिंबा दिला. 

मात्र भाजपसह त्यांच्या मित्रपक्षाच्या ताब्यात असणाऱ्या महाडिकांचा गोकुळ , विनय कोरे यांचा वारणा , समरजित घाटगे यांचा शाहू , हरिभाऊ बागडे यांचा औरंगाबाद जिल्हा दुध संघ या संघानी मात्र राजरोसपणे संकलन करत भाजपच्या या आंदोलनाला हरताळ फासल्याचे पत्रक स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यालयाने प्रसिद्ध केले आहे. 

याबाबत माजी खासदार राजू शेटटी यांना विचारले असता ते म्हणाले की," मी स्वाभिमानी दुध संघाचा चेअरमन जरी असलो तरी पहिल्यांदा शेतकरी नेता आहे. 

जर कोणताही पक्ष ,संघटना शेतकऱ्यांच्या दुधास दरवाढ देण्यासाठी आंदोलन करत असेल आणि दुध संकलन बंद करण्याचे आवाहन करत असेल तर शेतकरी हित डोळ्यांसमोर ठेवून मी आज भाजपने केलेल्या या आंदोलनास संकलन बंद ठेवून पाठिंबा दिला आहे.

मात्र भाजपच्या नेत्यांच्या ताब्यात असणा-या दुध संघानी राजरोसपणे दुध संकलन करत आंदोलनातील पुतणा मावशीचे प्रेम दाखवून दिले."

काही दिवसापूर्वी स्वाभिमानी संघटनेने याच मुद्यावर महाराष्ट्रात आंदोलन केले होते. स्वाभिमानीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत दुधाचे टॅंकर्स अडविले होते आणि दुध रस्त्यावर ओतले होते. काही ठिकाणी गरीबांनाही दुधाचे वाटत केले होते. दुधप्रश्‍नावर राजू शेट्टी नेहमीच आक्रमक असतात. त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली होती. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख