भूमाता महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांना जाहीर प्रश्न!

ब्रिगेडचे वार्षिक अधिवेशन, मासिक बैठका होतात का? ब्रिगेडचा वार्षिक जमाखर्च हिशोब आणि लेखापरीक्षण दरवर्षी होत असल्यास त्याबाबत धर्मादाय आयुक्तांकडे सादर केला जातो का?
  Tripti Desai .jpg
Tripti Desai .jpg

पुणे : महिलांचा मंदिर प्रवेश आणि महिला अत्याचाराविरोधात सतत लढणाऱ्या भूमाता महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून काही प्रश्न विचारले आहेत. नियमीत इतरांना प्रश्न विचारणाऱ्या देसाई यांनाच आता प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश उत्तमराव विटेकर यांच्यावर  लग्नाचे आणि नोकरीचे अमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप परभणी येथील एका महिलेने केला होता. पिडित महिलेने कुटुंबियासह देसाई यांच्या उपस्थितीत पुणे येथे पत्रकार परिषद घेतली होती. राज्यात पिडितेला न्याय का मिळत नाही, असा सवाल देसाई यांनी केला होता. राजकारण्यांना आणि इतर माणसांना वेगळा न्याय का? राजेश विटेकर आणि त्यांच्या इतर साथिदारांवर गुन्हा दाखल झाला नाही, तर परभणीत जाऊन आंदोलन करणार असल्याचा इशारा देसाई यांनी दिला होता. त्यानंतर लवांडे यांनी देसाई यांच्या भूमाता महिला ब्रिगेडवर काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

लवांडे म्हणाले, आपली भूमाता महिला ब्रिगेड ही स्वयंसेवी संस्था आहे की संघटना याची माहिती मिळावी, ब्रिगेडची अधिकृत नोंदणी असेल तर त्याबाबतची रजिस्टर नंम्बर, सदर ब्रिगेडची संस्थापक सदस्य, राष्ट्रीय कार्यकारीणी, राज्य कार्यकारिणी, पुणे कार्यकारिणी, संस्थापक सदस्य, ब्रिगेडचे मुख्य कार्यालयाचा पत्ता, इत्यादी सर्वांचे नाव पत्ते संपर्क नंम्बर कुठे मिळेल व याची माहिती कोण देईल? आपल्या जाहिरात स्वरूपाच्या संकेतस्थळावर ही सर्व माहिती का दिलेली नाही? असे सवाल लवांडे यांनी केले आहेत.  

ब्रिगेडचे वार्षिक अधिवेशन, मासिक बैठका होतात का? ब्रिगेडचा वार्षिक जमाखर्च हिशोब आणि लेखापरीक्षण दरवर्षी होत असल्यास त्याबाबत धर्मादाय आयुक्तांकडे सादर केला जातो का? भूमाता महिला ब्रिगेडचा दैनंदिन, मासिक, वार्षिक सर्व प्रकारचा खर्च कसा भागवला जातो त्याबाबत माहिती मिळावी, मिळेल का असा प्रश्न लवांडे यांनी केला आहे. 

आपल्याकडे महिला अत्याचार प्रकरण आल्यास त्याबाबतची कार्यपद्धती काय असते ? आलेल्या तक्रारीबाबत खऱ्या खोट्याची वास्तवाची शहानिशा करण्याची आपल्याकडे काही विशिष्ट यंत्रणा किंवा पद्धत आहे काय? असेल तर त्याबाबत स्पष्टीकरण मिळेल का? आणि ब्रिगेडचे सदस्यत्व घेण्यासाठी नियम अटी फी इत्यादी काय आहेत. आजपर्यंत महिला अत्याचार प्रकरणात ब्रिगेडच्या प्रयत्नामुळे किती व कोणत्या आरोपींना शिक्षा मिळाली आहे. कोणत्याही पत्रकार परिषदेत किंवा तुमच्या तथाकथित आंदोलनात राष्ट्रीय नेत्या तृप्ती देसाई वगळता इतर मुख्य पदाधिकारी कुणीही कधीच दिसत नाहीत, याचे कारण काय आहे. 

भूमाता ब्रिगेडचे मुख्य ध्येय, धोरण उद्दिष्ट व आपली राष्ट्रीय विचारधारा काय आहे? आपण हिंसा मानता किंवा अहिंसा मानता, आपल्या संकेतस्थळावर मोघम स्वरूपाची व जाहिरात स्वरूपाची माहिती आहे. ब्रिगेडबाबत संघटनात्मक सर्व तांत्रिक व कायदेशीर सविस्तर माहिती संकेतस्थळावर उपलब्ध का नाही.

आपल्या ब्रिगेडला शासन यंत्रणा, पोलिस यंत्रणा, महिला आयोग, न्यायव्यवस्था यांवर विश्वास आहे का? भूमाता महिला ब्रिगेडकडे महिलांच्या प्रश्नांवर कार्यरत असलेल्या पदाधिकारी व सदस्यांचे अधिकृत प्रशिक्षण झालेले का, प्रशिक्षित महिला किती आहेत? आपल्याकडे कुणीही पीडित स्त्री पुरुष न्याय मागायला येतात तेव्हा त्यांचेकडून फी स्वरूपात किती पैसे घेतले जातात किंवा कसे?

आपल्या ब्रिगेडचा स्त्री पुरुष विषयक दृष्टिकोन कसा व कोणता आहे? त्याबाबत काही स्पष्ट विचारधारा आहे का?  भूमाता ब्रिगेडच्या राष्ट्रीय नेत्या सन्मानीय तृप्तीताई देसाई यांनी वरील सर्व प्रश्न व मुद्यांची सविस्तर अधिकृत माहिती विषयाला अजिबात फाटे न फोडता व कसलीही चिडचिड न करता जगजाहीर देणे त्यांची नैतिक व कायदेशीर जबाबदारी, असल्याचे लवांडे यांनी म्हटले आहे. 

Edited By - Amol Jaybhaye 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com