पुण्यात तीन मे नंतरही लाॅकडाऊनच; किमान दोन आठवडे मुदतवाढ शक्य

एकदा लॉकडाउन शिथील केला, की नागरीकांच्या येण्या-जाण्यास प्रतिबंध करता येणार नाही. अशावेळी कोणत्या परिसरातून नागरीक कोणत्या परिसरात जातील, यावर काहीही नियंत्रण राहणार नाही. परिणामी, काही विशिष्ट भागापुरता मर्यादित असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव संपूर्ण शहरभर पसरण्याचा धोका आहे
Pune Lock Down will Continue after Third May
Pune Lock Down will Continue after Third May

पुणे : पुणे शहरातील लॉकडाउन तीन मेनंतर कायम राहील, अशी शक्यता महापालिका वर्तुळात व्यक्त होते आहे. तीन मेनंतर किमान एक ते दोन आठवडा लॉकडाउन सुरू राहील, असे दिसते आहे. 

पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या तेराशेंहून अधिक झाली आहे. भवानी पेठ, कसबा पेठ-विश्रामबागवाडा, शिवाजीनगर-घोले रोड, ढोले पाटील या चार प्रभागांमध्ये प्रत्येकी दीडशेहून अधिक रुग्ण आहेत. रुग्णांची सर्वाधिक संख्या भवानी पेठेत आहे. तेथे 263 रुग्णांची नोंद झाली आहे. त्या खालोखाल ढोले पाटील प्रभागात 190 रुग्ण आहेत. शिवाजीनगर प्रभागात 175 आणि कसबा-विश्रामबागवाडा प्रभागात 154 रुग्ण आहेत. 

कोथरूड-बावधन, औंध-बाणेर आणि वारजे-कर्वेनगर या प्रभागात कोरोना रुग्णांची संख्या तुरळक आहे. कोथरूड-बावधन प्रभागात इतक्या दिवसातं केवळ दोन रुग्ण आढळले आहेत. औंध-बाणेर प्रभागात चार आणि वारजे-कर्वेनगर प्रभागात नऊ रुग्ण आहेत. 

अंशतः लाॅकडाऊन असा विचार नाही

पुण्यात नऊ मार्च रोजी कोरोनाच्या पहिल्या रुग्णाची नोंद झाली होती. पुण्याच्या अन्य प्रभागांमध्ये धनकवडी-सहकारनगर प्रभागात सर्वाधिक 62 रुग्ण आहेत. पुण्याच्या काही भागात लॉकडाउन अंशतः कमी होईल, अशी चर्चा गेल्या आठवड्यात सुरू झाली. त्याला या आकडेवारीचा आधार होता. ज्या भागात रुग्णसंख्या कमी आहे, त्या भागात संपूर्ण लॉकडाउन राहणार नाही, असे चर्चेचे स्वरूप होते. प्रत्यक्षात, प्रशासकीय पातळीवर अंशतः लॉकडाउन असा काही प्रकार विचाराधीन नाही, असे समजते. लॉकडाउनची तीव्रता कमी केल्यास अन्य प्रभागात कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता बळावेल, अशी प्रशासनाला भीती आहे. 

'एकदा लॉकडाउन शिथील केला, की नागरीकांच्या येण्या-जाण्यास प्रतिबंध करता येणार नाही. अशावेळी कोणत्या परिसरातून नागरीक कोणत्या परिसरात जातील, यावर काहीही नियंत्रण राहणार नाही. परिणामी, काही विशिष्ट भागापुरता मर्यादित असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव संपूर्ण शहरभर पसरण्याचा धोका आहे. त्यामुळे, लॉकडाउनमध्ये अंशतः शिथीलता आणण्याचा कोणताही विचार नाही,' असे महापालिकेच्या एका जबाबदार पदाधिकाऱ्याने अनौपचारिक बैठकीत सांगितले. 

लाॅकडाऊन उठवण्याची केंद्रीय पथकाबरोबरही चर्चा नाही

प्रशासकीय पातळीवरही लॉकडाउनचा शिथील होण्याबाबत कोणतेही संकेत अद्याप दिले गेलेले नाहीत. कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक नुकतेच पुण्यात येऊन गेले. पुणे, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्याच्या भागात पथकाने पाहणी केली. शिवाय, पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील सरकारी रुग्णालयांनाही भेट दिली. या पथकासमोर केलेल्या सादरीकरणामध्ये पुण्यातील लॉकडाउनवर चर्चा झाली; तथापि लॉकडाउन तीन मेनंतर उठविण्याबाबत अथवा दरम्यानच्या काळात शिथील करण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. 

'तीन मेनंतर एक किंवा दोन आठवडे पुण्यात आजच्यासारखाच लॉकडाउन राहू शकतो. एका दिवशी शंभर रुग्ण आढळले, की त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांपर्यंत पोहोचावे लागते. एक रुग्ण किमान चार लोकांच्या संपर्कात आला आहे, असे गृहीत धरले, तर रोज चारशेहून अधिक लोकांना शोधून त्यांना क्वारंटाइन करावे लागते. या परिस्थितीत लॉकडाउन शिथील झाला, तर परिस्थिती बिघडेल, अशी भीती आहे. त्यामुळे, लॉकडाउन वाढला तर आश्चर्य वाटू नये,' असे पदाधिकाऱ्याने सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com