तुमच्याच लोकांमुळे पूरस्थिती आली; महापौरांचा सुप्रिया सुळेंना टोला - Pune Mayor Murlidhar Mohol Answers Allegations of MP Supriya Sule | Politics Marathi News - Sarkarnama

तुमच्याच लोकांमुळे पूरस्थिती आली; महापौरांचा सुप्रिया सुळेंना टोला

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2020

वारंवार स्थानिक नगरसेवकांनी पाठपुरावा करूनही पुणे महापालिकेकडून निधी दिला जात नसल्यामुळे पावसामुळे शहरात पूरस्थिती उद्भवल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला होता, त्याला महापौर मुरलीधर मोहोळ यांनी उत्तर दिले आहे

पुणे : ''खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात पूरस्थिती उद्भवलेल्या ज्या भागाचा उल्लेख केला आहे, त्याच भागातून त्यांच्याच पक्षाचे महापौर, स्थायी समिती अध्यक्ष आले होते. त्यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी विकासकामासाठी नेला. त्यांनी दूरदृष्टी ठेवली असती तर आजची परिस्थिती उद्भवली नसती,'' असा टोला पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सुप्रिया सुळे यांना उद्देशून प्रसारित केलेल्या व्हिडिओत केला आहे.

 
वारंवार स्थानिक नगरसेवकांनी पाठपुरावा करूनही पुणे महापालिकेकडून निधी दिला जात नसल्यामुळे पावसामुळे शहरात पूरस्थिती उद्भवल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला होता.  पुणे महापालिका काही करत नसल्यामुळे आता पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे या संदर्भामध्ये दाद मागणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मुसळधार पावसामुळे कालपासून पुण्यात अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली . खासदार सुप्रिया सुळे यांनी या पूरस्थितीचा आढावा घेऊन पाहणी केली. कात्रज परिसरात पुरामुळे उद्भवलेल्या परिस्थितीला पुणे महापालिका जबाबदार असल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी यावेळी केला होता. त्याला महापौर मोहोळ यांनी उत्तर दिले आहे. 

याबाबत बोलताना महापौर मोहोळ म्हणाले, "पुण्यात कमी वेळाता जास्त पाऊस ९७ मिमी पाऊस पडला. गेल्या वर्षी आंबील ओढ्याच्या परिसरात पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी मोठी हानी झाली होती. त्या दिवशी एका दिवसात ७० मिलीमीटर पाऊस पडला होता. याचा अर्थ पुण्यात परवा झालेला पाऊस हा त्यापेक्षा जास्त होता. गेल्या सहा महिन्यांमध्ये पालिकेने चांगले का केले. कात्रजपासून आंबील ओढ्यापर्यंत काम केले. त्यामुळे गेल्या वर्षी घडला तसा प्रकार नक्की घडला नाही. पण शहरात इतरत्र रस्त्यांच्या कडेला असलेल्या घरांमध्ये सोसायट्यांमध्ये पाणी घुसले. त्या त्या भागातले वाॅर्ड अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांनी चांगली काळजी घेतली आहे.''

तु पुढे म्हणाले, "कमी वेळात जादा पाऊस पडतो आहे. परवा संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राला या पावसाने झोडपले. पुण्यात काही वेगळे झाले असे म्हणता येत नाही. परंतु, खासदार सुप्रियाताई सुळेंनी असे आरोप केले की याला महापालिका व सत्ताधाऱ्यांचा भोंगळ कारभार कारणीभूत आहे. पण मला असे वाटते की ताईंना हे माहिती आहे की गेली अनेक वर्षे पुणे महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीचीच सत्ता होती. त्यामुळे तीन वर्षांत भारतीय जनता पक्षाच्या काळातच हे घडले असे म्हणता येणार नाही,''

''विशेषतः ज्या भागाचा त्या उल्लेख करतात, त्या कात्रज, धनकवडी या भागातून यांचे महापौर, स्थायी समिती अध्यक्ष निवडले गेले होते. जर हजारो शेकडो कोटी या लोकांनी विकासकामांसाठी नेले तर मग आताच्या सत्ताधाऱ्यांवर याची जबाबदारी ढकलू नये, अशी माझी सुप्रियाताईंना विनंती राहील. त्यावेळी सत्ताधाऱ्यांनी दूरदृष्टी ठेवली नसती तर आजची परिस्थिती उद्भवली नसती,'' असाही टोला महापौरांनी लगावला. 
Edited By- Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख